Netanyahu on Hezbollah : हिजबुल्लाने चूक केली, तर त्याला अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची त्याने कल्पनाही केली नसेल !

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची चेतावणी

तेल अविव (इस्रायल) – इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाला आता एक मास होत आला असून लेबनॉनची आतंकवादी संघटना हिजबुल्लाचा प्रमुख हसन नसरल्ला याने इस्रायल अन् अमेरिका यांना थेट विनाशाची धमकी दिली. यानंतर काहीच वेळात इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी त्यास प्रत्युत्तर देत म्हटले, ‘आमचे शत्रू, तसेच हिजबुल्ला यांना हे लक्षात ठेवावे की, जर त्यांनी काही दुष्टपणा केला, तर त्यांना अशी किंमत मोजावी लागेल, ज्याची त्यांनी कल्पनाही केलेली नसेल.’

या वेळी नेतान्याहू यांनी अमेरिकेच्याही युद्धबंदीच्या आवाहनाला नाकारले. ते म्हणाले की, मी अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांशी बोललो आहे. जोपर्यंत सर्व ओलिसांची सुटका होत नाही, तोपर्यंत आम्ही युद्धविरामाचा विचारही करू शकत नाही. इस्रायली रणगाडे गाझाकडे सरकत आहेत.

इस्रायलचा पूर्ण विजय पिढ्यान्पिढ्या लक्षात राहील !

अमेरिका, संयुक्त राष्ट्रे आणि अनेक देश इस्रायलकडे गाझामध्ये इंधन पाठवण्याची अनुमती देण्याची मागणी करत आहेत. यावर नेतान्याहू यांनी इस्रायली नागरिकांना संबोधित करतांना म्हटले की, आम्ही गाझामध्ये इंधन जाऊ देणार नाही. या वेळी इस्रायल पूर्ण विजय मिळवेल आणि तो पिढ्यान्पिढ्या लक्षात राहील ! शत्रूंना आपला देश नष्ट करायचा आहे. त्यांचा पराभव होईल. हमास आणि इतर शत्रू कायमचे नष्ट होतील. आपल्या नागरिकांनी आणि सैनिकांनी केलेल्या बलीदानासाठी शत्रूला उत्तरदायी धरावे लागेल.

पॅलेस्टाईनला तात्काळ १.२ अब्ज डॉलर्सची आवश्यकता ! – संयुक्त राष्ट्रे

याआधी संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते जेन्स लार्के म्हणाले की, पॅलेस्टाईन आणि गाझा यांना साहाय्य करण्यासाठी आम्हाला तात्काळ १.२ अब्ज डॉलर्सची आवश्यकता आहे. लाखो लोक बेघर आणि भुकेले आहेत. गाझा आणि वेस्ट बँकमधील परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. प्रतिदिन परिस्थिती अशी होत आहे की, आपण कल्पनाही करू शकत नाही. माणुसकी म्हणून आपण लोकांना साहाय्य केले पाहिजे.