छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना ‘महादेव अ‍ॅप’कडून मिळाले ५०८ कोटी रुपये ! – अंमलबजावणी संचालनालयाचा आरोप

छत्तीसगड येथे एका व्यक्तीकडून जप्त केली ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड

रायपूर (छत्तीसगड) – येथील एका उपाहारगृहाच्या तळघरातील एका चारचाकीतून अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) ३ नोव्हेंबर या दिवशी ५ कोटी ३९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणी असीम दास नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकासाठी येत्या काही दिवसांत मतदान होणार आहे. त्यापूर्वी ही रोकड सापडली आहे. ईडीने या घटनेच्या आधी राज्याचे काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना ५०८ कोटी रुपये मिळाल्याचा दावा केला आहे. मुख्यमंत्री बघेल यांना ही रक्कम ‘महादेव बेटिंग अ‍ॅप’च्या मालकाने दिल्याचे म्हटले आहे.

ईडीने सांगितले की, ‘महादेव अ‍ॅप’चे उच्चपदस्थ अधिकारी शुभम् सोनी यांचे ईमेल आणि असीम याच्या भ्रमणभाषच्या संपर्क नोंदीवरून कळले की, असीम दास छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांना काही काळापासून पैसा पोचवत होता. हा पैसा आर्थिक गैरव्यवहाराचा आहे.’ या दाव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील एका सभेत बघेल यांच्यावर आरोप केला आहे.

मुख्यमंत्री बघेल यांनी महादेवाचे नावही सोडले नाही ! – पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी

राज्यातील दुर्ग येथे एका प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, छत्तीसगडमध्ये काँग्रेसने घोटाळे आणि भ्रष्टाचार यांखेरीज काहीही केले नाही. ईडीने ५ कोटी रुपयांची रक्कम जप्त केली, तेव्हा मुख्यमंत्र्यांना धक्का बसला. त्यांनी महादेवाचे नावही सोडले नाही. दुबईत बसलेल्या घोटाळ्यातील आरोपींशी काँग्रेसच्या नेत्यांचा काय संबंध ? त्यांचे पैसे ईडीने का जप्त केले आणि मुख्यमंत्री नाराज का आहेत ? एकापाठोपाठ एक धाडी टाकून ईडीने कोट्यवधी रुपये जप्त केले. येथून पैसे देहली न्यायालयात पाठवले जात होते. छत्तीसगड त्यांच्यासाठी एटीएम् बनले आहे. २ सहस्र कोटी रुपयांचा दारू घोटाळा, ५ सहस्र कोटी रुपयांचा तांदूळ घोटाळा करण्यात आला. छत्तीसगडला लुटण्याची एकही संधी काँग्रेसने सोडली नाही. छत्तीसगडमध्ये भाजपचे सरकार आल्यानंतर घोटाळ्यांची चौकशी होणार आहे. आरोपींना कारागृहात पाठवले जाईल.

अज्ञाताच्या विधानावरून माझ्यावर आरोप केले जात आहेत !  – मुख्यमंत्री बघेल

मुख्यमंत्री बघेल

पंतप्रधान मोदी यांच्या आरोपानंतर मुख्यमंत्री बघेल म्हणाले, ‘पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा काँग्रेसला टक्कर देऊ शकत नसल्याने निवडणुकीपूर्वी त्यांनी अज्ञात व्यक्तीच्या वक्तव्याच्या आधारे माझ्यावर आरोप केले. सध्या सर्व काही निवडणूक आयोगाच्या हाती आहे. ही रक्कम ईडीचे अधिकारी आणि केंद्रीय यंत्रणा यांसह विशेष विमानाने आणलेल्या पेट्यांमधून आणली का ?, असा प्रश्‍न निर्माण होतो. मी एखाद्याला पकडून त्याला मोदींचे नाव घेण्यास सांगितले, तर ईडी चौकशी करील का?’, असा प्रश्‍नही त्यांनी उपस्थित केला.