आंदोलनकर्ते जरांगे पाटील यांचे आमरण उपोषण मागे; साखळी आंदोलन चालूच ठेवणार !

२ जानेवारीपर्यंत समयमर्यादा !

आंदोलनकर्ते जरांगे पाटील

अंतरवली सराटी (जिल्हा जालना) – मराठा समाजाला आरक्षण मिळावे; म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून चालू असलेले आमरण उपोषण अखेर मनोज जरांगे पाटील यांनी मागे घेतले आहे. तथापि मराठा आंदोलनकर्ते साखळी उपोषण चालूच ठेवणार आहेत. २ नोव्हेंबर या दिवशी सरकारच्या शिष्टमंडळाने भेट घेतल्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ देण्याची सिद्धता दर्शवली, तसेच त्यांनी त्यांचे दुसर्‍या टप्प्यातील उपोषण मागे घेतले आहे. मनोज जरांगे यांनी २४ डिसेंबरपर्यंतची समयमर्यादा सरकारला दिली होती. २४ डिसेंबरनंतर सरकारला एकही दिवस वाढवून देणार नाही, असे जरांगे यांनी सांगितले; पण सरकारच्या शिष्टमंडळाने २ जानेवारीपर्यंत वेळ देण्याची विनंती मनोज जरांगे यांना केली होती. ती त्यांनी मान्य केली आहे.

मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आता दिलेला वेळ हा शेवटचा आहे. त्यामुळे वेळ घ्या; पण आता आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार असाल, तर सरकारला वेळ देण्यास सिद्ध आहे. महाराष्ट्रातील सर्व मराठा बांधवांना आरक्षण मिळायला हवे. आता पुढच्या लढाईसाठी सिद्ध रहाण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.