‘आश्विन कृष्ण चतुर्थी (करवा चौथ (१.११.२०२३)) या दिवशी देहली सेवाकेंद्रात साधना करणारे श्री. प्रणव मणेरीकर यांचा ४४ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त मला त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
श्री. प्रणव मणेरीकर यांना ४४ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. साधिका प्रवासाला जातांना तिची बहिणीप्रमाणे प्रेमाने काळजी घेणे : वर्ष २०१९ मध्ये माझा आध्यात्मिक त्रास पुष्कळ वाढल्यामुळे मला रामनाथी आश्रमात नामजपादी उपायांसाठी जायचे होते. प्रणवदादा मला देहली रेल्वेस्थानकावर रेल्वेत बसवून देण्यासाठी आले होते. त्यांनी माझे सर्व साहित्य माझ्या रेल्वेतील ‘सीट’खाली ठेवून ते साखळीने बांधले. माझ्याजवळ एक महिला प्रवासी बसली होती. त्यांनी तिला सांगितले, ‘‘या ताईंची प्रकृती थोडी बरी नाही. तुम्ही तिच्याकडे लक्ष द्यावेे.’’ प्रणवदादा मला रेल्वेत बसवून गेल्यानंतर त्या महिलेने मला विचारले, ‘‘ते कोण आहेत ?’’ मी सांगितले, ‘‘माझा भाऊ आहे.’’ तेव्हा ती महिला मला म्हणाली, ‘‘तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात ! ईश्वराने तुम्हाला असा भाऊ दिला आहे.’’
२. साधिकेला आध्यात्मिक त्रास होत असतांना तत्त्वनिष्ठतेने तिच्या चुका सांगून अयोग्य कृतीचे चिंतन करायला सांगणे : कधी कधी काही प्रसंगांत माझ्या मनात विचारांचे प्रमाण फार वाढते किंवा माझे स्वभावदोष उफाळून येतात. तेव्हा मला वाटते, ‘आता मला त्रास होत आहे; म्हणून कुणी मला काही सांगायचे नाही.’ मला त्रास होत असतांना प्रणवदादा मला आवश्यक ते सर्व साहाय्य करतात आणि नंतर त्या प्रसंगात माझा ‘कुठला स्वभावदोष उफाळून आला ?’ अन् ‘अयोग्य विचारप्रक्रिया कशी झाली ?’, याचे माझ्याकडून चिंतन करून घेतात.
३. इतरांना साहाय्य करणे
३ अ. ग्रंथवितरण कक्षावर सेवा करतांना कक्ष आवरण्यास पुष्कळ साहाय्य करणे : प्रतिवर्षी देहलीमध्ये ‘विश्व पुस्तक मेळावा’ भरतो. वर्ष २०१८ मध्ये आमची दिवसभराची सेवा पूर्ण झाल्यानंतर प्रणवदादा आम्हाला प्रतिदिन वितरणकक्ष आवरणे आणि इतरही सर्व प्रकारचे साहाय्य करत होते. हे पाहून आमच्या वितरणकक्षाच्या शेजारी असलेल्या एका संप्रदायाच्या साधिका म्हणाल्या, ‘‘तुम्ही सर्व जण पुष्कळ भाग्यवान आहात ! तुम्हाला असा भाऊ लाभला आहे.’’
३ आ. साधकांना व्यष्टी (वैयक्तिक) साधनेसाठी केलेले साहाय्य
३ आ १. साधकांना मनमोकळेपणे बोलण्यासाठी साहाय्य करणे : प्रणवदादा देहली सेवाकेंद्रातील साधकांच्या व्यष्टी साधनेचा आढावा (टीप) घेतात. कधी काही प्रसंग झाला, तर ते त्या साधकाला मनमोकळेपणे बोलण्यासाठी साहाय्य करतात.
(टीप – साधक प्रतिदिन साधनेसाठी करत असलेले प्रयत्न, उदा. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया, नामजप, प्रार्थना, कृतज्ञता, भावजागृती इत्यादी जाणून घेऊन त्यांना आवश्यक तिथे योग्य दिशा देणे)
३ आ २. बुद्धीचा अडथळा दूर करण्यासाठी करायला सांगितलेले प्रयत्न ! : एकदा प्रणवदादांनी एक सूत्र सांगितले, ‘अनेक वेळा उत्तरदायी साधक आपल्याला काही गोष्टी सांगतात, तेव्हा आपली बुद्धी त्यांचे विश्लेषण करू लागते. त्या वेळी आपण बुद्धीला दटावले पाहिजे, ‘तू शांत रहा. तुला जे काही करायला सांगितले आहे, तेच तू कर.’
४. इतरांचा विचार करणे
४ अ. साधिकेला शारीरिक त्रासामुळे सेवा करता येत नसेल, तेव्हा स्वतःची सेवा थांबवून तिला सेवेत साहाय्य करणे : काही वेळा शारीरिक त्रासामुळे मला माझ्याकडे असलेल्या सेवा करणे शक्य होत नाही. त्यामुळे मला त्या सेवा करण्यासाठी साहाय्य लागते. प्रणवदादांकडे अनेक प्रकारच्या सेवा असल्यामुळे ते पुष्कळ व्यस्त असतात, तरीही जेव्हा मला काही साहाय्य हवे असते, तेव्हा ते त्यांच्या हातातील सेवा बाजूला ठेवून मला साहाय्य करतात.
४ आ. स्वतः रुग्णाईत असतांना साधिकेचे साहित्य उचलणे : एकदा माझी प्रकृती बरी नसल्यामुळे मी प्रणवदादांसह एका आधुनिक वैद्यांकडे गेले होते. तेव्हा प्रणवदादांचीही पाठ पुष्कळ दुखत होती, तरीही त्यांनी माझे आणि त्यांचे स्वतःचे साहित्य एकट्यानेच उचलले.
४ इ. साधिकेच्या मनातील विचार जाणून तिला प्रार्थना पाठवणे : एकदा माझी प्रकृती बरी नव्हती. तेव्हा माझ्या मनात विचार आला, ‘मला सद़्गुरु राजेंद्र शिंदे यांनी सांगितलेली प्रार्थना मिळायला हवी.’ मी त्याविषयी प्रणवदादांना काही सांगितले नव्हते; पण त्यांनी माझ्या भ्रमणभाषवर तीच प्रार्थना पाठवली.
५. कुणी चुका सांगितल्यास, लगेच त्या चुका स्वीकारून संबंधित साधकांची क्षमा मागणे : ‘एखाद्या साधकाने प्रणवदादांना त्यांची चूक लक्षात आणून दिली किंवा कुणी साधक म्हणाले, ‘प्रणवदादांच्या बोलण्यामुळे माझे मन दुखावले’, तर ते त्वरित स्वतःकडे न्यूनपणा घेऊन क्षमायाचना करतात.
६. प्रत्येक कृती करतांना साधनेचाच विचार करणे : एकदा आम्ही प्रवास करत होतो. आमच्याकडे दही होते. प्रणवदादा त्या दह्याचे ताक करतांना आम्हाला म्हणाले, ‘‘आपण स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनप्रक्रियेचे असे मंथन केले, तर ईश्वर आपल्याला गुणांचे लोणी खायला देईल.’
७. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे आज्ञापालन करणे : प्रणवदादांना कधी कधी काही साधकांचा पाठपुरावा करून सेवा पूर्ण करायला वेळ लागतो. तेव्हाही ते ‘त्या साधकाला आधार आणि उत्साह वाटेल’, असे त्याच्याशी बोलतात. सद़्गुरु पिंगळे यांनी ती सेवा त्या साधकाकडून करून घ्यायला सांगितली असल्यामुळे आज्ञापालन करून ते त्याच साधकाकडून ती सेवा पूर्ण करून घेतात.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावरील श्रद्धेने सर्व सेवा करणे : वर्ष २०२३ मध्ये देहली सेवाकेंद्रात साधकांची संख्या अल्प होती. त्यामुळे प्रणवदादांकडे पुष्कळ सेवा होत्या. माझा त्रास वाढल्यामुळे माझीही सेवा त्यांच्याकडेच हस्तांतरित करण्यात आली. तेव्हा मी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही एवढ्या सर्व सेवा कशा करणार ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘गुरुदेव आहेत, तेच माझ्याकडून सर्व सेवा करून घेणार आहेत.’’
९. प्रणवदादांची समाजातील लोकांना जाणवलेली वैशिष्ट्ये !
९ अ. प्रणवदादांच्या प्रेमळ वागण्यामुळे साधिकेच्या नातेवाइकांना त्यांच्याविषयी आदर वाटणे : माझा चुलत भाऊ देहली सेवाकेंद्रापासून काही अंतरावर रहातो. एकदा माझे प्रणवदादांच्या समवेत त्यांच्याकडे जाणे झाले. तेव्हा प्रणवदादांमधील प्रेमभाव आणि आपुलकी या गुणांमुळे त्या नातेवाइकांच्या मनात त्यांच्याविषयी आदर निर्माण झाला.
९ आ. समष्टीतील प्रसंग हाताळण्याची क्षमता !
९ आ १. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी झाल्यामुळे प्रवाशांना साहित्य ठेवण्यास अडचण होणे, त्यासाठी प्रवासी आपसात भांडत असतांना प्रणवदादांनी त्यांना शांत करून सर्वांचे साहित्य जागा करून नीट लावून देणे : वर्ष २०१८ मध्ये आम्ही एका शिबिरासाठी देहलीहून गोव्याला जायला निघालो होतो. रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होती आणि सर्व प्रवाशांकडे पुष्कळ साहित्य होते. ते सर्व जण साहित्य ठेवण्यावरून आपसात भांडत होते. तेव्हा प्रणवदादाने सर्व प्रवाशांना शांत बसवले आणि त्यांचे सर्व साहित्य व्यवस्थित लावून दिले.
१०. कृतज्ञता आणि प्रार्थना : ‘गुरुकृपेने आम्हा साधकांना प्रणवदादांसारखे अनमोल साधकरत्न लाभले आहे’, यासाठी मी गुरुदेवांच्या श्री चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते. ‘गुरुदेवा, प्रणवदादांमधील गुण आम्हा सर्व साधकांना शिकता येऊ देत’, हीच आपल्या चरणी प्रार्थना करते.’
– कु. पूनम चौधरी, देहली सेवाकेंद्र, देहली. (६.१०.२०२३) ॐ