नवी देहली – भारत संरक्षण क्षेत्रातील विविध प्रणाल्या कार्यान्वित करण्यामध्ये आत्मनिर्भर होत आहे. यातीलच एक अत्यंत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे भारत रशियाच्या ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम’ आणि इस्रायलच्या ‘आयर्न डोम’ यांच्या पार्श्वभूमीवर स्वत:ची संरक्षण यंत्रणा सिद्ध करत आहे. या प्रकल्पाला ‘कुश’ असे नाव देण्यात आले असून वर्ष २०२८-२९ पर्यंत भारतीय बनावटीची ही यंत्रणा सिद्ध होईल. याद्वारे शत्रूची क्षेपणास्त्रे आणि बाँब हवेतच नष्ट करणे शक्य होणार आहे.
वर्ष २०१८ मध्ये भारत आणि रशिया यांच्यात झालेल्या करारानुसार भारताने ४५.२ सहस्र कोटी रुपये खर्च करून ५ ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम्स’ खरेदी केले आहेत. यांपैकी आतापर्यंत ३ यंत्रणा भारताला पुरवण्यात आल्या असून उर्वरित यंत्रणाही लवकरच पुरवण्यात येणार आहेत. या संरक्षण यंत्रणा ४०० किलोमीटर व्यासापर्यंत कार्य करण्यास सक्षम आहेत. ‘एस् ४०० एअर डिफेन्स सिस्टम’ ही सध्या केवळ ४ देशांकडेच आहे. रशियाने या यंत्रणा भारत, चीन आणि तुर्कीये यांनाच विकले आहे.
#India plans to deploy the indigeneous LR-SAM (Project Kusha) by 2028-2029, to have a max range of 350 km. pic.twitter.com/WotEXTiokh
— Indian Aerospace Defence News – IADN (@NewsIADN) October 30, 2023
‘कुश’ संरक्षण प्रणालीची वैशिष्ट्ये !
‘कुश’ या संरक्षण यंत्रणा ३५० किलोमीटरच्या व्यासापर्यंत कार्य करण्यास सक्षम आहे. या माध्यमातून एवढ्या मोठ्या क्षेत्रात शत्रूची युद्धविमाने, क्षेपणास्त्रे अथवा ड्रोन घुसले, तर ही यंत्रणा त्वरित कार्यान्वित होऊन संबंधित लक्ष्याला भेदेल. एवढ्या मोठ्या अंतरापर्यंत ही यंत्रणा कार्यरत असल्याने लक्ष्याचा अचूक भेद घेण्यासाठीही यंत्रणेला पुरेसा वेळ मिळणार आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था, म्हणजेच ‘डी.आर्.डी.ओ.’ ही यंत्रणा बनवत आहे.