कोल्हापूर जिल्ह्यातील निळे ग्रामस्थांच्या पुढाकाराने व्याख्यानाचे आयोजन
मलकापूर (जिल्हा कोल्हापूर)- अनेक जण पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांद्वारे मिळणार्या सुखालाच आनंद समजतात; पण खरा आनंद हा अध्यात्माचे आचरण केल्यानेच प्राप्त होतो. जीवनातील ८० टक्के समस्यांचे मूळ कारण हे आध्यात्मिक असते. त्यामुळे समस्या दूर करण्यासाठी आध्यात्मिक स्तरावरील उपाय म्हणजे ‘साधना’च आवश्यक आहे. कलियुगात नामस्मरण ही सर्वश्रेष्ठ साधना आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु स्वाती खाडये यांनी केले. त्या शाहूवाडी तालुक्यातील निळे येथील जोतिबा मंदिर येथे जिज्ञासूंना मार्गदर्शन करत होत्या. याप्रसंगी सद्गुरु स्वाती खाडये यांनी नामजपाचे महत्त्व सांगून ‘धर्माचरण केल्याने आपण समाधानी आयुष्य जगू शकतो’, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. पूजा कुलकर्णी यांनी केले. या वेळी सदगुरु स्वाती खाडये यांचा सन्मान, तसेच सनातन संस्थेच्या डॉ. (श्रीमती) शिल्पा कोठावळे यांचा सत्कार सौ. ऐश्वर्या देसाई यांनी केला. या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष श्री. युवराज काटकर यांच्यासह १०० जिज्ञासूंनी मार्गदर्शनाचा लाभ घेतला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री. उदयसिंह देसाई यांनी विशेष प्रयत्न केले.