आज असलेल्‍या कोजागरी पौर्णिमेचा इतिहास अन् महत्त्व !

‘कोजागरी पौर्णिमेच्‍या दिवशी विद्या जागृत ठेवावी. संरक्षण करणार्‍यांनी स्‍वतःची शस्‍त्रे जागृत ठेवावीत. व्‍यापार्‍यांनी धान्‍याविषयी जागृती ठेवावी. जे जागे असतात, तेच विजयी होऊ शकतात. श्रीलक्ष्मी स्‍वतः मोठ्याने म्‍हणते, ‘कोण जागे आहे ‘कोजागर्ति’ ?’, असे विचारत संचार चालू करते आणि जागा स्‍वच्‍छ असेल तिथे अन् विचारयुक्‍त कष्‍ट घेण्‍याची सिद्धता असणार्‍या व्‍यक्‍तींकडे ती वास करते, तसेच जागेे असणार्‍याला भरभरून लाभ करून शुद्ध, अचूक तेच प्रदान करते.

‘कोजागरी पौर्णिमेला चंद्राची पूजा करून आटवलेेले दूध पिणे आणि रात्री जागरण करणे’, असे साधारण रूढ स्‍वरूप सध्‍या दिसते. वास्‍तविक ‘जागरण नव्‍हे, तर ‘जागर’ करावा’, अशी धर्मशास्‍त्रकारांची अपेक्षा आहे. धनाची इच्‍छा असणार्‍याने किंवा धन सुरक्षित रहावे, असे वाटणार्‍याने हे करावे; पण हा विधी साजरा करणार्‍या वृत्तीमुळे तो सकाम नैमित्तिक विधी झाला आहे. भेळ, पाणीपुरी, पार्टी इत्‍यादींमुळे शास्‍त्रशुद्ध कोजागरी हरवत आहे. या दिवशी लक्ष्मी, इंद्रपूजन आणि जागर (चंद्रपूजेचा मूळ विधीमध्‍ये समावेश नाही.) करावा.

‘धर्मसिंधु’कारांच्‍या मते विद्वान गुरुजी आणि इतर ज्‍येष्‍ठ यांना निमंत्रित करून मित्रपरिवारास बोलवावे. पूजा साहित्‍य आणावे. खोबरे घालून, पोहे करून त्‍याचा नैवेद्य दाखवावा. मध्‍यरात्रीच्‍या सुमारास श्रीलक्ष्मीदेवी आणि इंद्रदेवता यांची पूजा करावयाची असते. पाटावर तांदुळाचे (अक्षता) दोन पुंज करून त्‍यावर सुपारी किंवा प्रतिमारूप इंद्र आणि लक्ष्मी यांना आवाहन करून पूजा करावी. आपणास जे जमेल त्‍याचा संकल्‍प करावा.

‘या दिवशी भगवान श्रीकृष्‍णाने वज्रमंडळात रासोत्‍सव साजरा केला’, असे श्रीमद़्‍भागवतात म्‍हटले आहे. या दिवशी चंद्र पृथ्‍वीच्‍या सर्वांत जवळ असतो आणि त्‍यामुळे तो मोठा दिसतो. मूळ चंद्रतत्त्वाचे म्‍हणजे ‘चंद्रमा’चे प्रतिनिधित्‍व करून आपल्‍याला चंद्रासारखी शीतलता ईश्‍वराच्‍या अवतारांपासून अनुभवता येते. म्‍हणूनच रामचंद्र, कृष्‍णचंद्र अशीही नावे रामकृष्‍णांना दिली गेली. चंद्राच्‍या या गुणांमुळेच ‘नक्षत्रांमध्‍ये मी चंद्र आहे’, असे भगवान श्रीकृष्‍णाने श्रीमद़्‍भगवद़्‍गीतेत म्‍हटले आहे.’

– ज्‍योतिषी श्री. ब.वि. तथा चिंतामणि देशपांडे (गुरुजी), पुणे

(साभार : मासिक ‘धार्मिक’, ऑक्‍टोबर २०१८)