विश्वचषक क्रिकेट स्पर्धेमधील घटनांचे जागतिक पडसाद आणि भारताकडून अपेक्षित असणारी राष्ट्रहितैषी भूमिका !

सध्या भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळाने (‘आयसीसी’ने) आयोजित केलेली ‘एक दिवसाची विश्वचषक क्रिकेट’ स्पर्धा चालू आहे. स्पर्धेत सहभागी १० संघांपैकी पाकिस्तान संघाचे खेळाडूही भारतात आले आहेत. पाक संघाला भारतातील मुसलमानांकडून मिळणारा पाठिंबा, पाकिस्तानच्या सामन्याच्या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या दिल्या जाणार्‍या घोषणा, पाक खेळाडू महंमद रिझवान याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात केलेल्या शतकानंतर ते शतक इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धामध्ये गाझा पट्टीतील इस्रायलविरुद्ध लढणार्‍या लोकांना (आतंकवाद्यांना) समर्पित करण्याचे केलेले विधान या पार्श्वभूमीवर भारताचे खेळाडू, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय), आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियामक मंडळ (आयसीसी) यांची भूमिका कशी असावी, यावर दृष्टीक्षेप टाकणारा हा लेख !

१. पाक संघाला भारतीय मुसलमानांचा पाठिंबा !

पाकिस्तानचा संघ भारतात विश्वचषक खेळण्यासाठी आला आहे. पाकचे माजी क्रिकेटपटू मुश्ताक अहमद यांनी ‘पाकला भाग्यनगर (हैद्राबाद) आणि कर्णावती (अहमदाबाद) येथे मुसलमानांची संख्या अधिक असल्याने तेथून पाक संघाला भरपूर पाठिंबा मिळेल’, असे स्पर्धेच्या आधी काही दिवस सांगितले होते. झालेही तसेच ! भाग्यनगर येथे झालेल्या पाक-श्रीलंका सामन्याच्या वेळी पाकसमर्थनार्थ ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या घोषणा कुणी दिल्या, हे वेगळे सांगायची आवश्यकता नाही; पण या घोषणा देणार्‍यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. स्पर्धेच्या कालावधीत पाकच्या सामन्यांच्या वेळी मुसलमानबहुल प्रदेशात पाकिस्तानला उघड पाठिंबा मिळणार, हे सत्य आहे.

२. पाक खेळाडूची आतंकवादप्रेमी मानसिकता !

भाग्यनगर येथे झालेल्या पाक-श्रीलंका सामन्यात पाकिस्तानचा खेळाडू महंमद रिझवान याने शतक केले. सामन्यानंतर त्याने ट्वीट केले, ‘हे शतक मी माझ्या गाझा पट्टीतील बहीण-भावांना समर्पित करतो.’ याच ट्वीटमध्ये त्याने पाकिस्तानच्या सामन्याच्या वेळी पाकला पाठिंबा दिल्याविषयी भाग्यनगर येथील मुसलमानांचे आभारही मानले आहेत. पॅलेस्टाईनमधील आतंकवादी संघटना ‘हमास’ने इस्रायलवर क्षेपणास्त्रे टाकून केलेल्या आक्रमणांनंतर सध्या इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात घनघोर युद्ध चालू आहे. पॅलेस्टाईनमधील आतंकवाद्यांनी इस्रायलमधील पुष्कळ नागरिक, लहान मुले आणि स्त्रिया यांना ओलीस ठेवले आहे. आतंकवाद्यांकडून त्यांच्यावर अत्याचार करून त्यांना ठार मारणे, लहान मुली आणि महिला यांना नग्न करून त्यांची धिंड काढणे, त्यांच्यावर बलात्कार करून त्यांची अतिशय क्रूरपणे हत्या करणे अशा घटना घडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर पाक खेळाडूने केलेले वरील विधान, म्हणजे हमाससारखी आतंकवादी संघटना आणि जिहादी मानसिकता यांना दिलेला उघड पाठिंबाच होय.

३. ‘आयसीसी’चा दुटप्पीपणा आणि हिंदुद्वेष !

अ. महंमद रिझवान याच्या ट्वीटला लोकांनी आक्षेप घेऊन कारवाईची मागणी केल्यावर ‘आयसीसी’ने मात्र ‘रिझवान याने केलेले विधान हे मैदानाबाहेरील आहे. त्यामुळे त्याचा आमच्याशी काही संबंध नाही’, असे सांगून हात झटकले. ‘हा आयसीसीचा हिंदुद्वेष नव्हे का ?’ त्याने जरी मैदानाबाहेरून ट्वीट केले असले, तरी त्यांनी गाझा येथील लोकांना, म्हणजेच हमाससारख्या क्रूर आतंकवादी संघटनेला दिलेले समर्थन ही त्याची जिहादी मानसिकता दर्शवते.

आ. वर्ष २०१९ मध्ये झालेल्या एक दिवसाच्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघाचा तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने एका सामन्यात घातलेल्या ग्लोव्हजवर देशाच्या सैन्याचे चिन्ह होते. ‘आयसीसी’ने त्यावर आक्षेप घेतल्याने धोनी यांना ते ग्लोव्हज पुढील सामन्यांमध्ये वापरता आले नाहीत. खरेतर महेंद्रसिंह धोनी यांना भारतीय सैन्यामध्ये ‘लेफ्टनंट कर्नल’ हे पद दिले आहे. त्यामुळे ‘आयसीसी’ने धोनी यांच्या ग्लोव्हजवर घेतलेला आक्षेप, म्हणजे भारतीय सैन्याचाही अवमान आहे.

इ. रिझवान याने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात ‘ड्रिंक्स ब्रेक’च्या (पेयपानाच्या) वेळी मैदानातच नमाजपठण केले. त्याची छायाचित्रे सामाजिक संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाली आहेत. त्याने याआधीही अनेकदा सामन्यांच्या काळात नमाजपठण केले; पण त्याला कुणीच आक्षेप घेतला नाही. ‘आयसीसी’ही त्याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करते. तथाकथित ‘सर्वधर्मसमभाव’वाले त्याच्या या कृतीचे कौतुक करतात. मैदानात नमाजपठण केल्याने भारतीय अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी रिझवान याच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली आहे, ही चांगली गोष्ट आहे.

४. भारत-पाक क्रिकेट सामने म्हणजे जणू मैदानावरील युद्धच !

श्री. संदेश नाणोसकर

पाकिस्तान हा भारताचा सर्वांत मोठा शत्रूदेश आहे. त्यामुळे भारत-पाक क्रिकेट सामने नेहमीच चर्चेत रहातात; कारण प्रत्येक भारतियासाठी तो केवळ क्रिकेटचा सामना न रहाता एक युद्धजन्य प्रसंग होऊन जातो. पाक आतंकवाद्यांनी मुंबईवर केलेल्या २६.११.२००८ या दिवशीच्या आक्रमणानंतर दोन्ही देशांतील बिघडलेल्या संबंधांमुळे प्रत्येकच राष्ट्रप्रेमी हिंदूंमध्ये ती भावना या कालावधीत जागृत असते. आतापर्यंत झालेल्या क्रिकेटच्या विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तानविरुद्धच्या प्रत्येक सामन्यात भारतीय संघाने विजय मिळवला आहे. त्यामुळे सामन्यांच्या काळात पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाक खेळाडू खेळत असतात. मैदानावरील वाद, खेळाडूंमध्ये होणारी वादावादी यांमुळे या सामन्यांना युद्धाचेच स्वरूप प्राप्त होते. (१९.१०.२०२३) (क्रमशः)

– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.

पाक खेळाडूंची रानटी प्रवृत्ती आणि पराकोटीचा भारत अन् हिंदु द्वेष !

पाक खेळाडू सामन्यांच्या काळात भारतीय खेळाडूंना घायाळ किंवा त्यांना गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न करतात. प्रत्येक पाकिस्तानी खेळाडू हा भारताविरुद्ध खेळतांना हिंदुद्वेषी आणि जिहादी मानसिकतेतूनच खेळत असतो. हे सिद्ध करणार्‍या काही घटना पुढे दिल्या आहेत.

१. पाकचा माजी क्रिकेटपटू शोएब मलिक याने वर्ष २००७ आणि वर्ष २०२० मधील विश्वचषक अंतिम सामन्यात भारताविरुद्ध खेळतांना मुसलमानांसाठी खेळत असल्याचे सांगितले होते.

२. माजी पाक क्रिकेटपटू शोएब अख्तर याने काही दिवसांपूर्वीच मान्य केले होते की, त्याने भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांना दुखापत करण्यासाठी जाणूनबुजून ‘बीमर’ (चेंडू जाणूनबुजून अंगावर टाकण्याचा एक प्रकार) टाकला होता, तसेच एका सामन्यात सचिन तेंडुलकर यांनाही ‘बाऊंसर’ (थेट डोक्यावर आपटेल, अशा पद्धतीने चेंडू टाकण्याचा प्रकार) टाकून घायाळ केल्यानंतर ‘सचिन यांचा मृत्यू व्हावा’, अशी इच्छा व्यक्त केली होती.

३. पाकिस्तानी खेळाडूंनी हिंदूंमध्ये नमाजपठण केल्याने पाक खेळाडू वकार युनूस याला आनंद झाला होता.

४. पाक खेळाडू सोहेल तन्वीर हा वर्ष २००८ मध्ये भारतात झालेल्या ‘आय.पी.एल्.’ क्रिकेट सामन्यांमध्ये खेळला होता. त्याच वर्षी मुंबईवर झालेल्या आतंकवादी आक्रमणानंतर जेव्हा पाक खेळाडूंना भारतात खेळण्यावर बंदी घालण्यात आली, तेव्हा त्याने हिंदूंना शिवीगाळ केली होती.

५. पाक खेळाडू जावेद मियांदाद याच्या मुलाचे लग्न कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या मुलीशी झाले आहे.

६. शाहिद आफ्रिदीने तालिबानला पाठिंबा दिला होता आणि ‘भारतियांचे हृदय मोठे नाही’, असे म्हटले होते.

वरील सर्व उदाहरणे गेल्या काही वर्षांतीलच आहेत. सध्याची स्थितीही काही वेगळी नाही. भारत-पाक क्रिकेट सामन्यांमध्ये भारत जिंकला की, पाकमधील हिंदूंचा मोठ्या प्रमाणात छळ केला जातो, तसेच पाक जिंकला, तरी विजयाचा आनंद साजरा करतांना धर्मांधांकडून हिंदूबहुल भागातील वस्त्या आणि हिंदूंना लक्ष्य करून त्यांना त्रास दिला जातो. इतकेच काय, तर भारतातील धर्मांध मुसलमानांकडूनही हिंदूंच्या घरांची तोडफोड करून हानी केली जाते.

– श्री. संदेश नाणोसकर