ललित पाटीलच्या मैत्रिणींना ४ दिवसांची पोलीस कोठडी !

पुणे पोलीस ललित पाटीलच्या टोळीवर मकोका नोंदवण्याच्या सिद्धतेत !

पुणे – ललित पाटीलच्या मैत्रिणी अर्चना किरण निकम आणि प्रज्ञा अरुण कांबळे यांना न्यायालयात उपस्थित केल्यानंतर दोघींना २३ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी या दोघींना नाशिकमधून १८ ऑक्टोबरच्या रात्री अटक केली होती. अन्वेषण अधिकार्‍यांनी ७ दिवसांची पोलीस कोठडी मागितली; मात्र न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलीस ललित पाटीलसह त्याच्या टोळीवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी कायदा) नोंदवण्याच्या सिद्धतेत आहे. ललित पाटील याच्याशी अटक केलेल्या महिला आरोपींचा संबंध असल्याचे, तसेच त्यांनी ललित पाटीलला २५ लाख रुपयांचे साहाय्य केल्याचे समोर आले आहे.

ड्रगमाफिया ललित पाटीलच्या अटकेनंतर पुणे पोलिसांचे एक पथक मुंबईला आले, तर दुसरे पथक नाशिकला पोचले आणि ललित पाटीलच्या २ मैत्रिणींना अटक केली. ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेल्यानंतर या दोघी ललित पाटीलच्या संपर्कात होत्या, तसेच त्याला पळून जाण्यासाठी या दोघींनीच साहाय्य केल्याचे लक्षात आले आहे. ललित पाटीलने कमावलेला काळा पैसाही त्याने या दोघींकडे ठेवायला दिला होता.