सध्या चालू असलेल्या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने…
‘सनातन धर्म नेहमी शक्ती उपासक राहिला आहे. वैदिक साहित्य, यजुर्वेद आणि अथर्ववेद यांमध्ये शक्तीपूजा केल्याचा उल्लेख आहे. देवही देवीची उपासना करतात की, जी करुणेचा सागर आहे. जी लीला करण्यासाठी देह धारण करते. जी भक्तांना आनंद देणारी आणि प्रसन्न चित्त असते. देवी म्हणजे माता, माऊली, आदिमाता, आदिशक्ती, चैतन्यशक्ती, मूळशक्ती अशी देवी अनादि काळापासून मान्यता पावलेली आहे. शक्ती ही मूळतत्त्वाची, म्हणजे सत्त्व, रज, तम या तीन गुणांनुसार महासरस्वती, महालक्ष्मी, महाकाली अशी तिची रूपे आहेत. देवी भागवतामधील उल्लेखाप्रमाणे साक्षात् देवीनेच भक्तांना नवरात्र उत्सव करण्यास सांगितले आहे. सर्व देवांच्या ठिकाणी असलेली शक्ती हीच आदिमाया, जगदंबा अशा अनेक नावांनी गौरवली गेली. देवीची उग्र आणि सौम्य अशी २ रूपे पहायला मिळतात. सौम्य रूपामध्ये उमा, गौरी, पार्वती, तर उग्र रूपे काली, दुर्गा, चंडी ही आहेत. चैत्र मासात करण्यात येणार्या नवरात्राला ‘चैत्र नवरात्र’, ‘वसंत नवरात्र’; आषाढ आणि पौष मासात येणार्या नवरात्राला ‘गुप्तनवरात्र’, तर आश्विन मासातील नवरात्राला ‘शारदीय नवरात्र’ म्हणतात.
१. दुर्गेची ३ प्रमुख रूपे
महाकाली, महालक्ष्मी आणि महासरस्वती अशी दुर्गेची ३ प्रमुख रूपे आहेत. महाकाली ही तमोगुणी, महालक्ष्मी ही रजोगुणी आणि महासरस्वती ही सत्त्वगुणी आहे.
२. नवरात्रीची ९ रहस्ये
अ. पहिले रहस्य : नवरात्र म्हणजे ३६ रात्री नवरात्री (चैत्र, आषाढ, पौष आणि आश्विन या ४ मासांत येणार्या ९ नवरात्रींच्या एकूण ३६ रात्री).
आ. दुसरे रहस्य : आपल्या शरिरात ९ छिद्र आहेत. दोन डोळे, दोन कान, नाकाची दोन छिद्र, दोन गुप्तांग आणि एक तोंड या ९ अंगांना पवित्र शुद्ध केले की, मन निर्मळ होईल. झोपेमध्ये सगळी इंद्रिये (छिद्रे) लुप्त होतात आणि मन जागृत असते. उपवास केल्याने अंग-प्रत्यांगांची सफाई होते.
इ. तिसरे रहस्य : या ९ दिवसांमध्ये मद्यपान, मांस भक्षण, स्त्रीसंग वर्जित मानलेला आहे. ९ दिवस केलेल्या साधनेमुळे मनोकामना पूर्ण होते.
ई. चौथे रहस्य : या पवित्र रात्री विशेष शक्तींचा बोध होतो. नवरात्रीच्या रात्रींमध्ये केलेले शुभ संकल्प सिद्ध होतात.
उ. पाचवे रहस्य : ९ देवींचे पूजन विविध अंगांनी करतात. कात्यायनीदेवीने महिषासुर राक्षसाचा वध केला; म्हणून तिला ‘महिषासुरमर्दिनी’ म्हणतात.
ऊ. सहावे रहस्य : विविध औषधी वनस्पती. शैलपुत्री – हिरडा, ब्रह्मचारिणी – ब्राह्मी; चंद्रघंटा – चवळी, कुष्मांडा – पेठा, स्कन्दमाता – तांदुळ, आळसी; कात्यायनी – हिरव्या भाज्या, कालरात्री – काळीमिरी, तुळस; सिद्धीदात्री – आवळा, शतावरी, या वनस्पती होत.
ए. सातवे रहस्य : आदिशक्ती अंबिका सर्वाेच्च असून सर्व रूपे तिचीच आहेत.
ऐ. आठवे रहस्य : दशमहाविद्या – नवदुर्गांमध्ये दशमहाविद्यांची पूजा होते. काली, तारा, छिन्नमस्ता, भैरवी, भुवनेश्वरी, त्रिपुरासुंदरी, धुमावती, बगलामुखी, मातंगी आणि कमला या दशमहाविद्या आहेत.
ओ. नववे रहस्य : देवीची ओळख ही प्रत्येक देवीचे वाहन, भुजा आणि शस्त्र यांमुळे ओळखले जाते.
३. भगवतीची प्रसिद्ध स्थाने
कोल्हापूरची अंबाबाई, तुळजापूरची तुळजाभवानी, वणीची सप्तशृंगी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध स्थाने आहेत. वणीची सप्तशृंगी या साडेतीन पिठांमध्ये माहूरचे मूळपीठ आहे. देवीची ५१ पिठे श्रेष्ठ आहेत. ‘सती’च्या शरिराचे अंग जिथे जिथे पडले, तिथे शक्तिपीठ निर्माण झाले.
४. घटस्थापना
नवरात्र बसवतांना घट बसवणे (यालाच देव बसणे), असे म्हटले जाते. घट बसवल्यावर प्रतिदिन नवीन माळ बांधावी. प्रतिदिन गोड नवीन पदार्थ देवाच्या नेवैद्यासाठी करावा. कुणाकडे उपवासाचा नेवैद्य असतो. सर्वांनी एकत्ररित्या प्रतिदिन सकाळी आणि संध्याकाळी आरती करावी. संपूर्ण नवरात्रात अखंड नंदादीप लावावा. समईला गंध, अक्षता, फुल, हळद-कुंकू वाहून नमस्कार करावा. सवाष्ण, कुमारिका, ब्राह्मण जेवायला सांगावेत. नवरात्रात अष्टमीला काही ठिकाणी जोगवा मागण्याची प्रथा असते. आश्विन शुक्ल अष्टमीला आणि नवमीला ‘महातीर्था’ असे म्हणतात.
५. ललिता पंचमी
याला उपांग ललितेचे व्रत म्हणतात. ४८ सूर्वांची एक जुडी, अशा ४८ दूर्वांच्या जुड्या वाहाव्यात. नेवैद्य दाखवून सवाष्ण, ब्राह्मण जेवायला सांगतात. संध्याकाळी हळदी-कुंकू करतात. या दिवशी कुमारिकेला जेवायला सांगावे आणि तिची ओटी भरावी.
६. अष्टमी
नवरात्रीमध्ये अष्टमीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी महालक्ष्मी पूजन असते. संध्याकाळी घागरी फुंकण्याचा कार्यक्रम होतो. त्या वेळी महालक्ष्मी उभी करतात. सध्या सार्वजनिक ठिकाणी महालक्ष्मीची पूजा होते. देवीच्या तीर्थक्षेत्री अष्टमीला चंडियाग करतात. षड्रिपूंचा नाश व्हावा, यासाठी चंडियागात कोहळा देण्याची प्रथा आहे.
७. नवमी
या तिथीला ‘खंडेनवमी’ म्हणतात. महिषासुराशी झालेल्या युद्धात याच दिवशी देवीचा विजय झाला.
८. दसरा (विजयादशमी)
साडेतीन मुहूर्तांतील एक शुभ दिवस. या दिवशी शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्त पहावा लागत नाही. या दिवशी शमी आणि आपटा या वृक्षांची पूजा करतात. शस्त्रपूजा, ग्रंथ, पोथ्या, हत्यारे, राजचिन्हे यांचीही पूजा करतात. संध्याकाळी गावाच्या सीमेवर जाऊन आपट्याची पाने आणतात. देवापुढे ती आपट्याची पाने ठेवून देवाला नमस्कार करतात. वडीलधार्या व्यक्तींना आपट्याची पाने देतात आणि त्यांच्याकडून आशीर्वाद घेतात. रावणाचा पुतळा सिद्ध करून तो पुतळा रात्री पेटवतात. परक्या स्त्रीवर कुदृष्टी आणि विनाशकारक अपमान करण्यामुळे रावणाचा नाश झाला.
कुलदेवतेच्या मूर्तीला देवत्व अधिकाधिक प्रभावी व्हावे, आपल्या घरादारावर देवीची कृपा छत्र असावे. या हेतूने नवरात्रीची पूजा केली जाते.’
– सौ. सुलभा शिवराम कोल्हटकर, मध्यप्रदेश
(साभार : मासिक ‘धनुर्धारी’, जुलै २०१९)
कुमारिका पूजनकुमारी मुलीची पूजा हा नवरात्र व्रताचा प्राण आहे. शक्य असल्यास नवरात्र संपेपर्यंत प्रतिदिन किंवा सप्तमीच्या दिवशी कुमारिकेचे पाय धुऊन तिला मिष्ठान्न भोजन द्यावे. ‘स्कन्दपुराणा’त कुमारिकेच्या वयानुसार तिचे सांगितलेले प्रकार असे आहेत – १. २ वर्षाची कुमारी २. ३ वर्षांची त्रिमूर्तीणी ३. ४ वर्षांची कल्याणी ४. ५ वर्षांची रोहिणी ५. ६ वर्षांची काली ६. ७ वर्षांची चंडिका ७. ८ वर्षांची शांभवी ८. ९ वर्षांची दुर्गा ९. १० वर्षांची सुभद्रा. |
– ज्योतिषी श्री. ब. वि. तथा चिंतामणी देशपांडे (गुरुजी), पुणे
(साभार : ‘धार्मिक’, दिपावली विशेषांक २०१७)