पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडून चिपळूण येथे कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी

भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची दिली सूचना

उदय सामंत यांनी कोसळलेल्या उड्डाणपुलाची पहाणी केली.

रत्नागिरी – पालकमंत्री उदय सामंत यांनी १८ ऑक्टोबर या दिवशी चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पहाणी केली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या त्रिसदस्यीय तज्ञ समितीकडून तपासणी अहवाल आल्यानंतर दोषींवर कारवाई केली जाईल, तसेच यापुढे चिपळूणकरांना कोणताही त्रास होणार नाही आणि भविष्यात अशी दुर्घटना घडणार नाही, याची दक्षता घेण्याची सूचना केल्याच्याही पालकमंत्री उदय सामंत यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

पालकमंत्री उदय सामंत पुलाची पहाणी करत असतांना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याविषयी सविस्तर माहिती दिली. या वेळी प्रांताधिकारी आकाश लिगाडे उपस्थित होते.

पालकमंत्री सामंत पुढे म्हणाले, ‘‘मुख्य अभियंत्यांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तांत्रिक अडचणीमुळे ही दुर्घटना घडली आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तीन तज्ञ अधिकार्‍यांच्या नेमलेल्या समितीकडून या दुर्घटनेची चौकशी केली जाईल.  त्यांच्या चौकशी अहवालानंतर दोषींवर कारवाई केली जाईल. १० नोव्हेंबरपर्यंत ‘सर्व्हीस रोड’च्या काँक्रीटीकरणाचे काम पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पुलाचे काम चालू राहील.’’