१. महर्षींनी नवनरसिंह याग करण्यास सांगणे, तो याग रामनाथी आश्रमात चालू होणे
‘महर्षींनी १६४ क्रमांकाच्या नाडीवाचनातून आम्हाला कोळ्ळीमलई पर्वतावर रहायला जाण्यास सांगितले होते. महर्षींनी सांगितले, ‘१५.१.२०२१ पासून नवनरसिंह याग करण्यास आरंभ करावा. सनातनच्या तीन गुरूंना (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना) होणार्या करणीच्या त्रासापासून आता नरसिंंहच त्यांचे रक्षण करील.’ त्यानुसार रामनाथी आश्रमात नवनरसिंह यागाला आरंभ झाला.
२. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनीही कोळ्ळीमलई पर्वतावर नवनरसिंह यागाचे मंत्र म्हणून छोटे हवन करणे
या यागात प्रधान आहुती दगडफुलाची होती. आम्ही कोळ्ळीमलई पर्वतावर जेथे राहिलो होतो, तेथे मी पू. डॉ. ॐ उलगनाथन् यांच्या माध्यमातून महर्षींनी सांगितलेले नवनरसिंहाचे मंत्र म्हणून छोटे हवन केले. देवाच्या कृपेने मला तेेथे दगडफूल मिळाले. आम्हाला अन्य हवनीय द्रव्ये मिळाली नाहीत; म्हणून मी अग्नीहोत्र पात्रात तुपाची आहुती दिली.
३. अनुभूती
३ अ. हवनात सिंहाचे जबडा उघडलेले मुख दिसणे; मात्र ते उग्र रूप असूनही त्याकडे पाहून भावजागृती होणे : श्री देव नरसिंहाने ते हवन माझ्याकडून भावपूर्ण पद्धतीने करवून घेतले आणि मला अनुभूतीही दिली. हवन करतांना मला अग्नीत सिंहाचे जबडा उघडलेले मुख दिसत होते. खरे म्हणजे ते उग्र रूप होते, तरीही माझी त्या सिंहाकडे पाहून भावजागृती होत होती. तेव्हा माझ्या लक्षात आले, ‘नरसिंह हे तर विष्णूचे रूपच आहे.’
३ आ. गळ्यातील श्री यंत्रातून अग्नीची ज्योत बाहेर पडतांना दिसणे, त्या वेळी ‘या अग्नीच्या माध्यमातून नरसिंहानेच त्याचे अस्तित्व जाणवून दिले’, असे वाटणे : त्या वेळी मी सहज श्री. विनायक शानभाग यांना म्हटले, ‘‘दादा, बर्याचदा ‘श्रीलक्ष्मीनरसिंह’, असेच म्हणतात ना ? म्हणजे जेथे लक्ष्मी आहे, तेथे नरसिंह असणारच ना !’’ मी असे म्हणून हसून विषय सोडून दिला; मात्र देवाने मला या वाक्याची प्रचीती दिली. माझ्या गळ्यात गुरुदेवांनी दिलेले लक्ष्मी यंत्र (श्री यंत्र) आहे. मी केलेल्या हवनाचे छायाचित्र काढले आहे. त्यात या लक्ष्मी यंत्रातून प्रत्यक्ष अग्नीची ज्योत बाहेर पडतांना दिसत आहे, म्हणजेच नरसिंहाने मला सांगितले, ‘अगं, जेथे श्री म्हणजे लक्ष्मी आहे, तेथे अग्नीच्या ज्वाळांच्या रूपात मीसुद्धा आहे !’
अशा प्रकारे साक्षात् लक्ष्मीनरसिंह रूपाची देवाने मला अनुभूती दिल्याबद्दल मी त्याच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, चेन्नई, तमिळनाडू. (१७.१.२०२१)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |