काश्मीरमध्ये आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट, तर परदेशी पर्यटकांच्या संख्येत ८ पटींनी वाढ !

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – गेल्या ५ वर्षांत काश्मीरमधील जिहादी आतंकवादी घटनांत ५९ टक्क्यांनी घट झाली आहे. स्थानिक तरुण आतंकवादी संघटनांपासून दूर रहात असल्याने नवीन आतंकवादी निर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. त्यामुळे काश्मीरमध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. गेल्या वर्षी काश्मीरमध्ये ४ सहस्र १०० विदेशी पर्यटक आले. यावर्षी सप्टेंबरपर्यंत ३२ सहस्र विदेशी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली आहे. म्हणजेच गेल्या वर्षीच्या तुलनेत ८ पट अधिक विदेशी पर्यटक काश्मीरमध्ये आले.   अमेरिका, कॅनडा आणि काही युरोपीय देशांतून हे पर्यटक काश्मीरमध्ये आले आहेत. ‘काश्मीरमध्ये प्रवास करू नका’, असे अनेक देशांनी त्यांच्या नागरिकांना सतर्क केले असले, तरी विदेशी पर्यटक काश्मीरला भेट देत आहेत, हे विशेष आहे. यावर्षी आतापर्यंत देशातील सुमारे दीड कोटी पर्यटकांनी भेट दिली आहे. गेल्या वर्षी १ कोटी ८८ लाख देशी पर्यटकांनी काश्मीरला भेट दिली होती. काश्मीरसाठीचे कलम ३७० हटवल्यानंतर गेल्या ४ वर्षांत काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणातील मृत्यूंच्या घटनांंतही ७७ टक्क्यांनी घट दिसून आली आहे.

संपादकीय भूमिका

असे असले, तरी काश्मीरमधील जिहादी मानसिकता अद्याप संपलेली नाही. त्यामुळे पलायन करण्यास भाग पाडण्यात आलेले हिंदू अद्यापही तेथे परतू शकत नाहीत, ही वस्तूस्थिती आहे. जेव्हा हिंदू तेथे पूर्वी प्रमाणे राहू शकतील, तेव्हाच ‘काश्मीरची स्थिती पालटली’, असे म्हणता येईल !