सतत साधनारत असणार्‍या आणि साधकांप्रती प्रेमभाव असणार्‍या सनातनच्या ६० व्या समष्टी संत पू. रेखा काणकोणकर (वय ४५ वर्षे) !

आश्‍विन शुक्ल प्रतिपदा (घटस्थापना), म्हणजेच १५.१०.२०२३ या दिवशी पू. रेखा काणकोणकर यांचा वाढदिवस झाला. त्यानिमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

पू. रेखा काणकोणकर

१. प्रेमभाव

‘पू. ताईंकडून मला प्रेमभाव शिकायला मिळाला. जिथे आम्ही पोळ्या किंवा भाकरी करण्याची सेवा करतो, तिथे त्या मधे मधे येऊन ‘काही अडचण नाही ना ?’, अशी विचारपूस करतात.

२. सतत सेवारत असणे

जेवण गरम करायचे असते किंवा अन्य सेवा असतात, अशा सेवा त्या स्वतः करतात. गेल्या ५ वर्षांत मी त्यांना कधी थकलेले पाहिले नाही. त्या नेहमीच प्रसन्न असतात. त्यांच्याकडे पाहिल्यावर आता पुष्कळ चैतन्य जाणवते. सकाळपासून ते रात्रीपर्यंत त्या स्वयंपाक खोलीतच सेवा करत असतात.

३. मायाबंधमुक्त असणे

कुठल्याच सणाला त्या त्यांच्या घरी जात नाहीत.

४. प्रेमभाव

प्रत्येक साधकाची प्रकृती बघून त्या सर्वांना प्रेमाने सांभाळतात. कुठलाही प्रसंग असो, त्याविषयी मला त्यांच्याशी सहजतेने बोलता येते. समजा सेवेत काही अडचण आली, तर त्या त्वरित उपाययोजना शोधून ती सेवा सोपी करून देतात.

५. साधकांच्या साधनेचा आढावा भावाच्या स्तरावर घेणे

पू. ताई साधकांच्या साधनेचा आढावा पूर्णपणे भावाच्या स्तरावर घेतात. झालेल्या सर्व प्रसंगांविषयी त्यांच्याशी बोलल्यावर मनाला हलके वाटते आणि आढावा झाल्यावर आध्यात्मिक लाभ झाल्याचे मला अनुभवता येते.

६. पू. रेखा काणकोणकर यांच्या कपड्यांना इस्त्री करतांना थकवा जाऊन कपड्यांमधून दैवी सुगंध येणे आणि खोलीत चैतन्य वाढल्याचे जाणवणे

‘१ – २ मासापूर्वी मला त्यांचे कपडे इस्त्री करण्याची संधी मिळाली होती. पू. ताईंच्या कपड्यांना इस्त्री करण्यापूर्वी मला पुष्कळ थकवा जाणवत होता; पण पू. ताईंचे कपडे इस्त्री करतांना मला फार उत्साह जाणवत होता. इस्त्री करतांना आपोआपच ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव ।’, असा नामजप चालू होता. ‘३ पोशाखांची इस्त्री करीपर्यंत वेळ कसा निघून गेला ?’, हे मला कळलेच नाही. सेवा झाल्यावर माझे मन प्रसन्न झाले. मला त्यांच्या कपड्यांमधून एक वेगळाच दैवी सुगंध येत होता. ‘जणू पूर्ण खोलीत चैतन्य वाढत आहे’, असे मला जाणवत होते.

‘हे गुरुमाऊली, आम्हाला पू. रेखाताईंकडून सर्व शिकता येऊ दे’, अशी भावपूर्ण प्रार्थना करते. अशा चैतन्यमय संतांच्या सहवासात मला रहायला मिळते, त्याबद्दल परात्पर गुरु डॉ. आठवले आणि पू. रेखाताईंच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२०.९.२०२३)

तुम्हीच आहात वैकुंठातील अन्नपूर्णामाता ।

कु. शार्दुल चव्‍हाण

तुम्हीच (टीप १) आहात
वैकुंठातील अन्नपूर्णामाता ।
असा भाव असे
आम्हा साधकांचा ।
तुम्हीच शिकवता
अन् घडवता आम्हाला ।
ध्येयाच्या दिशेने
जाण्याकरता ॥ १ ॥

क्षणभर जरी चुकलो आम्ही ।
प्रीतीने समजावणे असते आपुले ।
सेवेतील बारकावे शिकवूनी ।
न्यावे आम्हाला गुरुचरणांपाशी ॥ २ ॥

आपल्या कृतीतून क्षणोक्षणी ।
शिकत असतो आम्ही ।
जेव्हा अनुभवतो प्रीती तुमची ।
तेव्हा आम्हा गुरुदेवांचे दर्शन होई ॥ ३ ॥

जेव्हा सेवेत अस्थिर होतो आम्ही ।
तेव्हा सत्वरी आधार देता तुम्ही ।
स्वयंपाकघरात येता क्षणी ।
माते, तुमचे अस्तित्व अनुभवतो आम्ही ॥ ४ ॥

आम्ही साधनेत पुढे जावे सत्वरी ।
यासाठी तळमळ असते आपुली ।
आपली तळमळ पहाता ।
भावमय होऊन जातो आम्ही ॥ ५ ॥

हे आई, कृपा असावी सतत आपुली ।
ध्येयाच्या दिशेने जाण्याकरता ।
द्यावा आशीर्वाद आम्हा लेकरांना ।
अशी प्रार्थना असे आपुल्या चरणी ॥ ६ ॥

टीप – सनातन संस्थेच्या संत पू. रेखा काणकोणकर

– श्री. शार्दूल चव्हाण (वय २० वर्षे), कुडाळ, सिंधुदुर्ग. (२०.१.२०२२)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक