१. समुद्रात चीनची पानबुडी बुडणे धोकादायक
‘चीनची पाणबुडी नुकतीच बुडाली. ती तैवानच्या समुद्रामध्ये गस्त घालत होती. या अपघातात त्यांचे ५० हून नाविक मारले गेले आहेत. याला महत्त्व यासाठी आहे की, चीनकडे अनेक आण्विक पाणबुड्या आहेत. अणू शक्तीवर चालणार्या पाणबुड्या या अधिक काळ पाण्याखाली राहू शकतात. त्यामुळे त्यांना पाण्याखाली काम करणारे अत्यंत संहारक शस्त्र समजले जाते. चीनचे नौदल हे जगात सर्वांत मोठे समजले जाते. चीनकडे अनेक पाणबुड्या असल्या, तरी ती चालवण्याची क्षमता त्यांच्याकडे नाही. त्यांच्या नौदलातील सैनिकांचे प्रशिक्षण अल्प दर्जाचे आहे. त्यामुळे हा अपघात झाला असण्याची शक्यता आहे. अशा प्रकारच्या पाणबुड्या बुडणे अत्यंत धोकादायक आहे; कारण या पाणबुड्यांवर क्षेपणास्त्रे किंवा आण्विक शस्त्रे असू शकतात. या पाणबुडीवर असणारी शस्त्रे ही पारंपरिक होती ? कि आण्विक होती ? याची आपल्याला निश्चिती नाही. एवढे मात्र निश्चित की, चिनी सैनिकांकडे कौशल्य नसल्याने ती बुडाली आहे. अर्थात्च भारताने या पाणबुडीच्या अपघाताचा अभ्यास करावा; कारण भारताकडेही ‘अरिहंत’ नावाची आण्विक पाणबुडी आहे. या घटनेवरून भारताने या पाणबुडीमध्ये काही त्रुटी असल्यास त्या सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.
२. चिनी पाणबुडी अपघाताचा संबंध चीनच्या बेपत्ता संरक्षणमंत्र्याशी ?
चिनी पाणबुडीच्या अपघाताविषयी अन्य देशांमधून बातम्या आल्या; परंतु या पाणबुडीतील कर्मचार्यांचे चीनमधील नातेवाइक म्हणतात की, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांना त्यांच्या नातेवाइकांशी संवाद साधता आला नाही. ‘ही पाणबुडी बुडाली ? कि बुडवली गेली ? हे सांगता येत नाही. तसेच याचा संबंध चिनी संरक्षणमंत्री बेपत्ता होण्याशी आहे का ? यापूर्वी चीनचे अंतराळ विभागाचे मुख्य असलेल्या दोघांना गायब करण्यात आले. याचाही संबंध या पाणबुडीशी असावा का ?’, असेही प्रश्न उभे रहातात. चीनमध्ये सरकारला सोयिस्कर नसलेले लोक रहस्यमय बेपत्ता होतात. ही एक जुनी परंपरा आहे. चीनमधील अनेक कोट्यधीश किंवा उद्योगपती अचानक बेपत्ता झाले होते. उदा. त्यांचे सर्वांत मुख्य उद्योजक ‘अलिबाबा’चे प्रमुख जॅक मा हे बेपत्ता झाले होते. चीनची एक प्रसिद्ध टेनिसपटू हिने चीनच्या उपराष्ट्रपतींवर लैंगिक शोषणाचे आरोप लावले होते. तीही अचानक बेपत्ता झाली होती. ती नंतर परत आली आणि तिने तिचे सर्व आरोप मागे घेतले होते. असे अनेक नामवंत लोक बेपत्ता झालेले आहेत. ते चीनच्या कम्युनिस्ट (साम्यवादी) पक्षाला सोयिस्कर नव्हते, तसेच चीनला त्यांचे महत्त्व न्यून करायचे होते. त्याच मालिकेत चीनचे संरक्षणमंत्रीही बेपत्ता आहेत. यापूर्वी चीनचे परराष्ट्रमंत्री बेपत्ता झाले होते. नंतर कळले की, त्यांचे अमेरिकेतील निवेदिकेशी प्रेमसंबंध होते.
३. चोरलेल्या तंत्रज्ञानातून चीनच्या पाणबुड्यांची निर्मिती
आज चीनकडे १०० हून अधिक पाणबुड्या आहेत. त्या सर्व पाणबुड्यांचे डिझाईन हे रशियाकडून ‘कॉपी’ (नक्कल) केले आहे. चीनने मागील दशकात ज्ञानाची प्रचंड चोरी केली आहे. चीनने साम, दाम, दंड आणि भेद यांचा वापर करून अमेरिका, रशिया अशा देशांकडून तंत्रज्ञान चोरले अन् त्यांचा वापर करून स्वत:चे तंत्रज्ञान पुढे आणण्याचा प्रयत्न केला. चिनी शस्त्रास्त्रांचा दर्जा एकदम वाईट आहे. अनेक देशांनी चिनी बनावटीची शस्त्रे खरेदी केली होती. आता ते या शस्त्रांविषयी तक्रारी करत आहेत. त्याच प्रकारे या पाणबुडीचे डिझाईन सदोष असू शकते. तसेच पाणबुडी चालवण्यासाठी लागणारे कौशल्य चांगले नसावे. त्यामुळेच चीनच्या युद्धनौका खोल समुद्रात जाण्याचे धाडस करत नाहीत. त्या केवळ किनारपट्टीवरच फिरत असतात. जेव्हा त्या आत जाण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा त्यांच्यासमवेत जीवरक्षक जहाज असते. या समवेतच त्यांचे खलाशी आणि सैनिक यांचाही दर्जा वाईट आहे. यावरून आपण सैनिकांच्या दर्जावर भर देत त्यांचे प्रशिक्षण चालू ठेवले पाहिजे. तसेच भारतीय बनावटीच्या शस्त्रांचा दर्जाही आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगला ठेवला पाहिजे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे