दर्शन मंडपाची जागा स्थानिकांना विश्वासात घेऊन निश्चित करावी ! – स्थानिकांची मागणी
तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – श्री तुळजाभवानी मंदिर विकास प्रारूप आराखड्यातील दर्शन मंडपाच्या सूत्रावरून येथे ११ ऑक्टोबर या दिवशी पुजारी आणि व्यापारी यांच्याकडून कडकडीत बंद पाळण्यात आला. ‘मंदिर प्रशासनाने स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊन विकास आराखडा सिद्ध करणे अपेक्षित होते. घाडशीळ येथे दर्शन मंडप उभारणे भक्तांसाठी गैरसोयीचे होणार आहे. भक्तांना अल्प वेळेत दर्शन होण्यासाठी मंदिर प्रशासनाच्या इमारतीच्या ठिकाणी दर्शन मंडप उभारता येईल. घाटशीळ येथे दर्शन मंडप उभारल्यास श्री भवानीदेवीच्या मंदिरातील मुख्य महाद्वाराचे महत्त्व अल्प होऊ शकते. त्यामुळे तुळजापूरचे ऐतिहासिक महत्त्व न्यून होण्याची शक्यता नाकारता येणार नाही’, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.
तुळजापूर येथे अधिकतर भाविक कुलाचार करण्यासाठी येतात; मात्र कुलाचाराचे स्थळ प्रशासनाकडून निश्चित करण्यात आलेले नाही. ‘आमचा विकासाला विरोध नाही; मात्र पुजारी आणि व्यापारी यांना विश्वासात घेऊनच विकास आराखडा सिद्ध करावा’, अशी मागणीही स्थानिक पुजारी आणि व्यापारी यांनी केली आहे.