रोगप्रतिकारक्षमता – आपल्‍या शरिराची ढाल !

रोगांशी लढण्‍याची आपल्‍या शरिराची क्षमता, म्‍हणजे रोगप्रतिकारक्षमता ! याविषयी कोरोना महामारीच्‍या काळात सर्व जणांमध्‍ये जागृती झाली; कारण कोरोना विषाणूचा रोगप्रतिकारक्षमता चांगली असणार्‍या व्‍यक्‍तीला फार त्रास झाला नाही. बहुतांश व्‍यक्‍ती संसर्ग झालेल्‍यांच्‍या संपर्कात येतच असतात; पण प्रत्‍येक वेळी ती व्‍यक्‍ती व्‍याधीग्रस्‍त होतेच, असे नाही, ते तिच्‍यातील रोगप्रतिकारक्षमतेमुळे ! नुकतीच कोरोना महामारी येऊन गेली किंवा अजून पुढेही कोणते नवीन नवीन विषाणू येतील, याविषयी आपल्‍याला ठाऊक नाही; परंतु आपल्‍या शरिराची रोगप्रतिकारक्षमता वाढवणे, हे स्‍वतःच्‍या हातात आहे. त्‍याविषयीची माहिती आपण आजच्‍या लेखामधून जाणून घेणार आहोत.

१. व्‍याख्‍या

व्‍याधिक्षमत्‍वं नाम व्‍याधिबलविरोधित्‍वं
व्‍याध्‍युत्‍पादप्रतिबन्‍धकत्‍वमिति । – चक्रपाणि

अर्थ : ‘व्‍याधिक्षमत्‍व’ म्‍हणजे रोगाची वाढ रोखणारी आणि रोगाच्‍या पुनरावृत्तीला थांबवणारी शरिराची सक्षम प्रतिकारशक्‍ती.

या व्‍याख्‍येनुसार व्‍याधीक्षमत्‍व (रोगप्रतिकारक्षमता), म्‍हणजे रोग निर्माण होण्‍यास प्रतिबंध (मज्‍जाव) करणे, तसेच रोग आपल्‍या शरिरात अधिक बलवान होऊ न देणे; परंतु सगळ्‍यांच्‍याच शरिरामध्‍ये रोगप्रतिकारक्षमता उत्तम असते, असे नाही.

२. कुणाची रोगप्रतिकारक्षमता अल्‍प असते ?

आयुर्वेदानुसार कोणत्‍या व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारक्षमता अल्‍प असते, ते बघूया.

अ. अतिस्‍थूल व्‍यक्‍ती

आ. अतिकृश व्‍यक्‍ती, म्‍हणजे अतिशय बारीक व्‍यक्‍ती.

इ. वृद्ध आणि लहान मुले (कारण वयस्‍कर व्‍यक्‍ती आणि बालक यांच्‍यामध्‍ये शरीर बल अल्‍प असते अन् पर्यायाने रोगप्रतिकारक्षमता अल्‍प असते.)

ई. व्‍यक्‍तींमध्‍ये रस, रक्‍त, मांस, अस्‍थी हे धातू योग्‍य प्रमाणात नसणे अथवा दुर्बल असणे.

उ. आपल्‍या प्रकृतीला अयोग्‍य असा आहार घेणे.

ऊ. मानसिकरित्‍या दुर्बल असणे.

यातून आपल्‍याला असे लक्षात येईल की, आपले शरीरच नाही, तर मनसुद्धा रोगप्रतिकारक्षमता निर्माण होण्‍यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असते.

ज्‍या व्‍यक्‍तींचे शरीर बल चांगले असते, त्‍या व्‍यक्‍तींची रोगप्रतिकारक्षमता चांगली असते. ज्‍या व्‍यक्‍तींमध्‍ये मांस धातूचे प्रमाण योग्‍य असते, ज्‍यांची सर्व इंद्रिये सुदृढ असतात, ज्‍या व्‍यक्‍ती भूक, तहान, उष्‍णता, थंडी, परिश्रम इत्‍यादी सहज सहन करू शकतात; ज्‍या व्‍यक्‍तींचा जठराग्‍नी उत्तम असतो, म्‍हणजेच घेतलेल्‍या आहाराचे पचन योग्‍य होत असेल, अशा व्‍यक्‍तींची रोगप्रतिकारक्षमता उत्तम असते.

३. रोगप्रतिकारक्षमता कशी वाढवायची ?

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

रोगप्रतिकारक्षमता वाढण्‍यासाठी कोणत्‍या गोष्‍टी महत्त्वाच्‍या आहेत, ते समजून घेऊया.

अ. उत्तम शरीर बल असण्‍यासह मानसिक बळही आवश्‍यक आहे. व्‍यक्‍ती मानसिकरित्‍या दुर्बल असल्‍यास व्‍याधी लवकर बरी होत नाही. जे मानसिकरित्‍या सक्षम असतात, त्‍यांना कुठलीही व्‍याधी जरी झाली, तरी ती सकारात्‍मक राहून त्‍यातून सहजरित्‍या बाहेर पडू शकते. चंचल मनाला नियंत्रित करणे, म्‍हणजेच मनात सात्त्विक गुणाची वृद्धी केल्‍यास रोगप्रतिकारक्षमता चांगली रहाते. अध्‍यात्‍म मार्गातील किंवा साधना करणारी व्‍यक्‍ती मानसिकरित्‍या सक्षम होत जाते; म्‍हणूनच मनाची शक्‍ती वाढवण्‍यासाठी साधना आणि ध्‍यानधारणा करणे, हा उत्तम उपाय आहे.

आ. रोगप्रतिकारक्षमता उत्तम रहाण्‍याकरता ‘ओज’ हा घटक महत्त्वाचा असतो. आपल्‍या शरिरात जे ७ धातू (रस, रक्‍त, मांस, मेद, हाडे, मज्‍जा आणि शुक्र हे ७ धातू) आपण बघितले, ते सिद्ध झाल्‍यानंतर शेवटी सारभागातून सिद्ध होणारा शेवटचा घटक, म्‍हणजे ओज होय. आहारापासून पुढे सर्व धातू उत्तरोत्तर सिद्ध होत असतात आणि ते जर सर्व उत्तमरित्‍या सिद्ध झाले, तर सिद्ध होणारा ओजसुद्धा उत्तमच तयार होतो. अशा ओजस्‍वी व्‍यक्‍तींमध्‍ये रोगप्रतिकारक्षमता उत्तम असते. भीती, राग, चिंता या मानसिक अवस्‍था आपल्‍या शरिरातील ओज या घटकाला न्‍यून करतात. त्‍यामुळे व्‍यक्‍तीची रोगप्रतिकारक्षमता न्‍यून होते.

इ. आपला जठराग्‍नीही रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्‍यास महत्त्वाची भूमिका बजावत असतो. महर्षि वाग्‍भट यांनी म्‍हटले आहे की, सर्व रोगांची निर्मिती ही जठराग्‍नी कमकुवत असल्‍यामुळेच होते. तेव्‍हा आपल्‍याला पचनाच्‍या काही तक्रारी असतील जसे की, भूक मंदावणे, खाल्लेले न पचणे, पोट फुगणे, पोटात दुखणे, अशा सर्व तक्रारींवर वेळीच उपचार घेऊन स्‍वतःची पचनक्षमता उत्तम राखण्‍यासाठी प्राधान्‍याने प्रयत्न करायला हवेत. आपल्‍याकडून ही लक्षणे बर्‍याचदा दुर्लक्षित केली जातात आणि पुढे विविध रोग उत्‍पन्‍न झाल्‍यानंतरच वैद्यांकडे धाव घेतली जाते. त्‍यापेक्षा वेळेतच उपाययोजना केल्‍यास पुढे होणारी आरोग्‍याची हानी टाळता येऊ शकते.

इ १. आपण संतुलित आहार कसा घ्‍यायचा ? प्रकृतीनुसार कोणता आहार घ्‍यायचा ? याविषयी आधीच्‍या लेखांमधून माहिती घेतलेलीच आहे. त्‍याप्रमाणे आपण आपल्‍या आहारात सुधारणा केली, तर आपला जठराग्‍नी चांगला ठेवता येऊ शकतो.

ई. नियमित व्‍यायाम केल्‍यास पचनक्षमता सुधारते आणि मन प्रसन्‍न रहाते. व्‍यायामामुळे शरिरात उत्‍साह निर्माण होतो, पर्यायाने मन सकारात्‍मक होते. हे सर्व रोगप्रतिकारक्षमता निर्माण करतात. शरिराचे बळ वाढवल्‍यास रोगप्रतिकारक्षमता आपोआप वाढते.

उ. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी आवळा, मनुके, पपई, डाळिंब, खजूर, बदाम आणि अक्रोड यांचा आहारात समावेश करावा. त्‍यांचा अतिरेक मात्र करू नये.

ऊ. रोगप्रतिकारशक्‍ती वाढवणारी काही औषधे उदाहरणार्थ अश्‍वगंधा, गुळवेल, हळद, तुळस, सुंठ, आवळा, हिरडा, पिंपळी यांसारखी काही औषधे रोगप्रतिकारशक्‍ती वाढवण्‍यासाठी साहाय्‍य करतात. असे असले, तरी कोणते औषध किती प्रमाणात आणि किती दिवस घ्‍यावे ? यासाठी वैद्यकीय सल्ला घेणे आवश्‍यक आहे.

ऊ. रोगप्रतिकारशक्‍ती ही एका दिवसात निर्माण होणारी नसून त्‍यासाठी आपल्‍याला प्रतिदिन प्रयत्न करणे आवश्‍यक आहे. कोरोना महामारीच्‍या काळात ‘अमुक काढा घेतल्‍याने रोगप्रतिकारक्षमता वाढते’, असे कळल्‍यानंतर पुष्‍कळ जणांनी एकदम उष्‍ण असे काढे अन् तेही एप्रिल-मे या मासांच्‍या कालावधीत घेतले. त्‍याने रोगप्रतिकारक्षमता वाढायच्‍या ऐवजी उष्‍णता, मूळव्‍याध, पचन यांसंबंधीचे त्रास नव्‍याने निर्माण झाले. असे प्रयोग करण्‍यापूर्वी आपल्‍या प्रकृतीसाठी हे आवश्‍यक आहे का ? यासाठी वैद्यांचा सल्ला अवश्‍य घ्‍यावा.

आजच्‍या लेखामध्‍ये आपली रोगप्रतिकारक्षमता संतुलित आहार, त्‍याचे होणारे सुयोग्‍य पचन, मनाची सकारात्‍मकता, नियमित व्‍यायाम इत्‍यादी घटकांवर अवलंबून असते, हे लक्षात येते. तेव्‍हा रोगप्रतिकारक्षमता निर्माण करण्‍यासाठी विविध सामाजिक माध्‍यमांवरील उपायांच्‍या आहारी जाऊन स्‍वतःच्‍या शरिरावर प्रयोग करू नयेत, यापेक्षा वैद्यांना भेटून त्‍यांच्‍याकडून योग्‍य ते उपचार घ्‍यावेत.

– वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर, पुणे (९.१०.२०२३)