कुडाळ : जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा, झाराप क्रमांक १ ही इयत्ता ७ वी पर्यंतची शाळा असून तेथे पटसंख्या (विद्यार्थ्यांच्या संख्या) ६४ आहे. असे असतांना या शाळेत एकच शिक्षक कार्यरत असल्याने विद्यार्थ्यांची शैक्षणिक हानी होत आहे. याकडे शिक्षण विभाग दुर्लक्ष करत असल्याने येथील पालकांनी ९ ऑक्टोबरपासून ‘शाळा बंद’ आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या ३ मासांत पालकांनी ‘शाळा बंद’ आंदोलन करण्याची ही दुसरी वेळ असणार आहे.
झाराप येथील या शाळेत २ पदवीधर आणि २ उपशिक्षक, अशी एकूण शिक्षकांची ४ पदे संमत आहेत; मात्र या शाळेमध्ये दोनच शिक्षक कार्यरत होते. यातील एका शिक्षकाचे काही मासांपूर्वी स्थानांतर झाल्याने येथे एकच शिक्षक कार्यरत आहे. शाळेत त्वरित शिक्षक नेमावा, यासाठी जुलै मासात येथील पालकांनी ‘शाळा बंद’ आंदोलन केले होते. त्यानंतर एका शिक्षकाची नियुक्ती करण्यात आली होती. नियुक्तीनंतर अवघ्या काही दिवसांतच आजारपणामुळे या शिक्षकाला कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे आता या शाळेत केवळ एकच शिक्षक आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, शिक्षणाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. असे असतांना जिल्हा परिषदेच्या शाळांची अवस्था मात्र बिकट होत चालली आहे. त्यामुळे शिक्षणमंत्र्यांना मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेविषयी काहीच वाटत नाही का ? असा संतप्त प्रश्न झाराप येथील पालकांनी उपस्थित केला आहे.
संपादकीय भूमिकाशिक्षकांच्या मागणीसाठी पालकांना सातत्याने आंदोलन करावे लागणे, हे प्रशासनाला लज्जास्पद ! |