उशिरा सुचलेले शहाणपण !
छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्त कार्यालयातील कामाची व्यापकता लक्षात घेत निवेदने स्वीकारणे, निवेदक आणि शिष्टमंडळे यांच्याशी चर्चा करणे यामध्ये अधिक सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा आणण्यासमवेतच वेळेची बचत आणि प्रश्नांना न्याय देण्यासाठी यामध्ये पालट करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदने स्वीकारण्यासाठी विविध विषयांशी संबंधित १० अधिकार्यांच्या नियुक्तीचे आदेश देण्यात आले आहेत.
अतिरिक्त आयुक्त-१ हे विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय अधिकारी यांच्या कार्यपद्धतीशी संबंधित सर्व निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (महसूल) हे महसूल विभागाविषयी, कनिष्ठ महसूल अधिकारी, कर्मचारी यांच्याविषयी, गौण खनिज, इनाम, कुळ, अतिक्रमणे, गावठाण विस्तार, धार्मिक, सिलिंग इत्यादी विषयी सर्व निवेदने स्वीकारतील. उपायुक्त (सामान्य) हे पोलीस कायदा आणि सुरक्षा, सर्व बैठका, विभागीय आयुक्तालयाविषयी सर्व निवेदने, तसेच कोणत्याही अधिकार्यांना प्राधिकृत न केलेल्या सर्व विषयांची निवेदने स्वीकारतील.
कार्यालयातील यंत्रणेकडे प्राप्त निवेदनांवर निवेदकांच्या शिष्टमंडळासमवेत चर्चा करून नियमानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. निवेदनाविषयी केलेल्या कार्यवाहीसंदर्भात निवेदकांना लेखी कळवण्यात येणार आहे. नियुक्त अधिकार्यांच्या अनुमतीविना निवेदन देणार्यास कॅमेरा आणि भ्रमणभाष यांचा वापर करता येणार नाही. निवेदनाविषयी माहिती वेळोवेळी विभागीय आयुक्त यांना सादर करण्यात येणार आहे. एखाद्या निवेदनात एकाहून अधिक शाखांचे विषय असल्यास निवेदनातील पहिल्या विषयासंबंधित अधिकारी निवेदन स्वीकारणार आहेत, तसेच इतर विषयांविषयी संबंधित शाखांना कार्यवाहीसाठी प्रत देणार आहेत.