गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन २ कोटी रुपयांची उलाढाल !

पणजी, ४ ऑक्टोबर (वार्ता.) : गोव्यात वेश्याव्यवसाय आणि दलाल यांची प्रतिदिन अडीच कोटी रुपयांची उलाढाल होत आहे. अनैतिक मानवी तस्करीच्या प्रकरणी पीडितांचे पुनर्वसन करणार्‍या ‘अर्ज’ संस्थेचे प्रमुख अरुण पांडे यांनी ही माहिती दिली.

(सौजन्य : Goa 365 TV) 

अरुण पांडे यांनी सांगितले की,

१. गोव्यात अनैतिक मानवी तस्करी मोठ्या प्रमाणात चालू आहे. परराज्यातून युवतींना गोव्यात आणून त्यांना बळजोरीने वेश्याव्यवसायात ढकलले जात आहे. अशा मुलींच्या जिवावर दलाल कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहेत. असे करणार्‍या दलालांची साखळीच आहे. अशा दलालांकडे आताच्या घडीला ५ सहस्र युवती आहेत आणि यांपैकी प्रतिदिन किमान २ सहस्र युवतींकडून धंदा करून घेतला जातो.

२. हे दलाल एका युवतीसाठी ५ सहस्र रुपयांपासून २५ सहस्र रुपये ग्राहकाकडून घेतात. एका युवतीसाठी १० सहस्र रुपये असा व्यवहार असल्यास ही उलाढाल २ कोटी रुपयांवर पोचते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत कह्यात घेण्यात आलेल्या दलालांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

३. वेश्याव्यवसायासाठी सर्वाधिक युवती महाराष्ट्रातून आणल्या जातात. त्यानंतर मिझोराम आणि इतर राज्यांचा क्रमांक लागतो. वेश्याव्यवसायात गोव्यातील महिलांचे प्रमाण ७ टक्के आहे. युवती किंवा महिला एकदा वेश्याव्यवसायात उतरल्यानंतर त्या वाईट चक्रातून त्यांची सुटका होणे पुष्कळ कठीण असते. पोलिसांनी कारवाई करून त्यांची सुटका केल्यास दलाल पुन्हा त्यांना जाळ्यात ओढतात. जोपर्यंत त्यांचे पुनर्वसन करून त्यांना स्वावलंबी बनवले जाणार नाही, तोपर्यंत या महिला त्या चक्रातून बाहेर पडणे कठीण आहे.


Government will fight sex trafficking: CM

‘अन्याय रहित जिंदगी’ या स्वयंसेवी संस्थेचे संचालक अरुण पांडे गोव्यातील लैंगिक तस्करीवरील संशोधन अहवाल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना सादर करताना (चित्रावर क्लिक करा)

संपादकीय भूमिका

  • अनैतिक व्यवसायांच्या माध्यमातून राज्यात इतक्या मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल कशी काय होते ? पोलीस आणि प्रशासन काय करत आहेत ?
  • राज्यात चालणारे असे अनैतिक व्यवहार कायमचे बंद होण्यासाठी आता जनतेनेच जागृत आणि सतर्क रहाण्याची वेळ आली आहे !