श्री गणेशोत्सवातील मंडप अजूनही रस्त्यावरच !
पुणे – श्री गणेशोत्सव संपल्यानंतर २ दिवसांमध्ये सार्वजनिक मंडळांनी उभारलेले मंडप काढून घ्यावेत. रस्ता वाहतुकीसाठी खुला करणे आवश्यक आहे; मात्र अद्यापही अनेक मंडळांनी मंडप रस्त्यावरच उभे केलेले आहेत. अशा मंडळांना क्षेत्रीय कार्यालयाद्वारे नोटीस (सूचना) पाठवण्यात येत आहे. मंडप उभारण्यासाठी रस्त्यावर खोदलेले खड्डे ७ ऑक्टोबर या दिवसापर्यंत बुजवावेत, असे आदेशही आयुक्त विक्रम कुमार यांनी दिलेले आहेत.
गणेशोत्सव मंडळांकडून श्री गणेशोत्सवामध्ये देखावे सादर करण्यासाठी मोठे मंडप उभारले जातात; परंतु श्री गणेशोत्सव संपल्यानंतरही मंडप, देखावा, रथावरील सजावट काढली गेली नसल्याचे दिसून येत आहे. काही मंडळांनी मंडप काढण्याचे काम चालू केले आहे; पण त्याकरिता मंडळासमोरचा रस्ता पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. त्यामुळेही वाहतूककोंडी होत आहे.
अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपायुक्त माधव जगताप म्हणाले की, ‘‘२२ मंडळांनी रनिंग (रस्त्याच्या दोन्ही बाजूला खांब उभे करून त्यावर रंगीत झालर (कापड) लावणे) मंडप काढण्यास विलंब केल्याने महापालिकेने त्यावर कारवाई केली आहे. २ दिवसांमध्ये ज्यांनी पूर्ण मंडप उतरवलेला नाही, त्यांना नोटीस (सूचना) देण्याचे काम चालू आहे.’’