देशद्रोही ‘न्‍यूज क्‍लिक’!

चीन इतका भांडवलशाही देश झाला आहे की, तो त्‍याच्‍या साम्‍यवादी विचारसरणीच्‍या बळावर साम्राज्‍यविस्‍तार आणि भारताला पोखरण्‍यासाठी क्रूर अन् धूर्त नीतीचा वापर करत आहे, याला सीमाच राहिलेली नाही. याचे एक छोटे उदाहरण हे भारतातील ‘न्‍यूज क्‍लिक’ हे प्रसारमाध्‍यम आहे. चीनचा भारताला खिळखिळे करण्‍याच्‍या अतीव्‍यापक षड्‌यंत्रातील हे हिमनगाचे एक टोक आहे. याची व्‍याप्‍ती समजून घेतली, तर अनेक वर्षांपासून भारतातील सर्वच राज्‍यांमध्‍ये साम्‍यवादी विचारसरणी पसरवण्‍याच्‍या माध्‍यमातून चीन भारताशी कसे भयंकर छुपे युद्ध खेळत आहे, हे लक्षात येईल. त्‍यामुळे ‘न्‍यूज क्‍लिक’वर देहली पोलिसांची धाड ही केवळ ‘हिंदुत्‍वाच्‍या विचारांचे शासन असल्‍याने त्‍याच्‍या विरोधात लिहिणार्‍या माध्‍यमांवर ते कारवाया करत आहे’, अशा अपप्रचारापर्यंत ही घटना मर्यादित नाही, तर या माध्‍यमातून ‘न्‍यूज क्‍लिक’सारख्‍या माध्‍यमांना हाताशी घेऊन चीन भारतविरोधी डावपेच उघडपणे कसे खेळत आहे’, हे उजेडात आणणारी ही घटना आहे. ३ ऑक्‍टोबरला देहली पोलिसांनी ‘न्‍यूज क्‍लिक’चे पत्रकार अभिजित शर्मा यांसह अन्‍य पत्रकार आणि प्रमुख संपादक प्रबीर पुरकायस्‍थ यांच्‍या घरी धाडी घातल्‍या. त्‍यांना पोलीस ठाण्‍यात चौकशीसाठी बोलावण्‍यात आले आहे. त्‍यांचे भ्रमणभाष, भ्रमणसंगणक, ‘हार्डडिस्‍क’ आदी साहित्‍य जप्‍त करण्‍यात आले आहेत. यापूर्वी वर्ष २०२१ मध्‍ये, तसेच फेब्रुवारी २०२३ मध्‍ये या ऑनलाईन माध्‍यमाच्‍या कार्यालयावर ‘ईडी’ने धाड घातली होती. तेव्‍हा ३८ कोटी रुपयांचा निधी चीनमधील नेव्‍हल राय सिंघम याने ‘न्‍यूज क्‍लिक’ला दिल्‍याचे पुढे आले होते. चीनमधून ‘न्‍यूज क्‍लिक’ला काही संदेश येतात. त्‍यानुसार वृत्ते प्रसारित केली जातात. कोरोना काळात ‘चीनने चांगले काम कसे केले आणि अमेरिका कशी अपयशी ठरली’ यावर लिखाण करण्‍याचा संदेश आल्‍यावर ‘चीनने कशी चांगली परिस्‍थिती हाताळली’ यावर ३ लेख प्रसिद्ध करण्‍यात आले. पूर्वी ‘न्‍यूज क्‍लिक’च्‍या कार्यालयावर धाडी घातल्‍यावर माध्‍यमातील पुरोगामी आणि साम्‍यवादी पत्रकारांनी एकच हल्लाबोल केला होता. त्‍यात मोदी शासनाच्‍या काळात पत्रकारांना स्‍वातंत्र्य नसल्‍याची ओरड झाली. सागरिका घोष, राजदीप सरदेसाई यांसारखे सारे साम्‍यवादी त्‍यात सहभागी होते. जेव्‍हा शासन एखाद्यावर कारवाई करते, तेव्‍हा त्‍याविरोधात प्रसार करणे म्‍हणजे एकप्रकारे शासनाला खोटे ठरवण्‍यासारखेच नव्‍हे का ?

‘न्‍यूज क्‍लिक’ची चिनी पार्श्‍वभूमी

चीनमध्‍ये नेव्‍हल राय सिंघम नावाचा एक प्रसिद्ध भारतद्वेषी उद्योगपती आहे. तो आणि त्‍याची पत्नी यांना हाताशी धरून चीन त्‍याचा कुटील हेतू साध्‍य करून घेत आहे. चीन सरकारने अमेरिकेसह जगातील मोठ्या प्रकाशन संस्‍थांमध्‍ये त्‍यांचे विचार पसरवण्‍यासाठी भागीदारी केल्‍याचे उघड झाले आहे. सिंघम हा केवळ भारतीय प्रसारमाध्‍यमेच नव्‍हे, तर जगभरातील अनेक देशांतील प्रसारमाध्‍यमांना हाताशी धरून, त्‍यांना चिनी सरकारकडून पैसे पुरवून संबंधित देश आणि सरकार यांच्‍या विरोधात वृत्ते प्रसारित करवून घेतो. वर्ष २०२० मध्‍ये भारतातील प्रकाश करात यांच्‍यासारखे साम्‍यवादी नेते आणि चिनी उद्योजक यांचे संबंध उघड झाल्‍यानंतर गलवान येथे चिनी सैनिकांशी झालेल्‍या चकमकीत भारताचे २० सैनिक ठार झाले होते. हा केवळ योगायोग कसा असेल ? (त्‍याचा सूड भारतीय सैनिकांनी घेतला हा भाग वेगळा.) त्‍यानंतर राहुल गांधी गुपचूप चीनच्‍या राजदुतांना जाऊन भेटले आणि इकडे मोदी शासनावर चीन प्रकरणावरून टीका करत राहिले. काँग्रेस आणि चीन यांचे अनेक वर्षांचे संबंधही लपून राहिलेले नाहीत. सिंघम हा इतका कट्टर साम्‍यवादी आहे की, त्‍याच्‍या कार्यालयात सर्वांना ‘कॉम्रेड’ संबोधले जाते. सिंघम याची पत्नी जोडी एवन्‍स हिच्‍या स्‍त्रियांच्‍या संघटनेने ‘चीन जगाचा शत्रू कसा नाही ?’ याचा प्रसार जगभर केला. हा सर्व कार्यक्रम चीन सरकारप्रणीत आहे. सिंघम याने भारतात निर्माण केलेला ‘पीपल्‍स आर्कायव्‍ह ऑफ रूरल इंडिया’ (परी) हा प्रकल्‍प भारतातील ‘आदिवासी जमातींचा अभ्‍यास करतो’; म्‍हणजे थोडक्‍यात त्‍यांच्‍यात फूट पाडणे, त्‍यांचे धर्मांतर होण्‍याला साहाय्‍य करणे, त्‍या माध्‍यमातून समान नागरिकत्‍वाच्‍या कायद्याला विरोध करणे आदी गोष्‍टी करतो.

‘न्‍यूज क्‍लिक’ची देशद्रोही पार्श्‍वभूमी

‘न्‍यूज क्‍लिक’ एक प्रकारे चीनच्‍या हातातील बाहुले झाले आहे, एवढ्यावरच हेे थांबत नाही; कारण त्‍याचे सहसंस्‍थापक गौतम नवलखा हे कोरेगाव भीमा दंगल भडकावण्‍यात महत्त्वाचा सहभाग असल्‍याचा आरोप असणारे आणि शहरी नक्षलवादी म्‍हणून ‘प्रसिद्ध’ आहेत. पाकिस्‍तानशी संबंध असणारे, फुटीरतावादी आणि आतंकवादी यांना पाठिंबा देऊन भारतीय सैन्‍याच्‍या विरोधात प्रचार करणारे, अशी त्‍यांची पार्श्‍वभूमी आहे. अर्थातच या नवलखांशी सिंघमचे घनिष्‍ठ संबंध आहेत. ‘जगभरातील सगळे साम्‍यवादी कसे एकमेकांना मिळालेले असतात’, हे पुनःपुन्‍हा लक्षात येते. ‘न्‍यूज क्‍लिक’चे अभिसार शर्मा यांना चीनच्‍या कम्‍युनिस्‍ट पक्षाकडून पैसा पुरवण्‍यात येतो’, असा आरोप आहे. ‘न्‍यूज क्‍लिक’ त्‍याच्‍या चीनच्‍या पैशाला कसे ‘इमान राखत’ आहे, ते पुढील उदाहरणांतून लक्षात येईल. भारताने भारत आणि चीन यांच्‍यामधील संपर्काचे एकमेव माध्‍यम ‘टिक टॉक’वर बंदी आणली, तेव्‍हा ‘न्‍यूज क्‍लिक’ने चीनला पाठिंबा दिला. आज सर्व जग परराष्‍ट्रमंत्री जयशंकर यांच्‍या परराष्‍ट्र धोरणाचे कौतुक करत असतांना त्‍यांच्‍या परिणामकारक कामाविषयी त्‍याने प्रश्‍नचिन्‍ह उपस्‍थित केले होते. काश्‍मीरमधील स्‍थानिक दगडफेक आतंकवाद्यांची बाजू घेणारे वृत्त ‘न्‍यूज क्‍लिक’ने प्रसारित केले होते. भारताच्‍या कोरोनावरील लसीविषयी शंका उपस्‍थित करणारे लिखाण यातून केले गेले. पत्रकारितेचा अशा प्रकारे धंदा करून देशविरोधी मोहीम चालवणारी ही माध्‍यमे देशाची शत्रूच होत. ‘न्‍यूज क्‍लिक’सारखी माध्‍यमे एकप्रकारे देशाच्‍या विरोधात चीनकडून सुपारी घेऊनच काम करत आहेत. लोककल्‍याणकारी नव्‍हे, तर देशविघातक पत्रकारिता करणार्‍या अशा माध्‍यमांना कायमचे बंदच करायला हवे !

चीनकडून ‘सुपारी’ घेऊन देशविरोधी पत्रकारिता करणार्‍यांची तोंडे सरकारने कायमची बंद करायला हवीत !