रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) झालेले त्रास आणि आलेल्‍या अनुभूती

१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्‍निहोत्र’ (टीप १) घेतले. त्‍या वेळी त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. कल्‍याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्‍या अडचणी, वेळोवेळी त्‍यांना देवाने कुणाच्‍या तरी माध्‍यमातून केलेले साहाय्‍य आणि ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतल्‍यावर आलेल्‍या अनुभूती येथ दिल्‍या आहेत. १ ऑक्‍टोबरच्‍या अंकात आपण ‘श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍यापूर्वी (व्रत अंगीकारण्‍यापूर्वी) आणि श्रौत घेतांना (अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती’ पाहिल्‍या. आज त्‍यापुढील भाग पाहूया.

टीप १ – श्रौत अग्‍निहोत्र : श्रुतींमध्‍ये म्‍हणजे वेदांमध्‍ये सांगितलेल्‍या ३ अग्‍नींच्‍या साहाय्‍याने करावयाच्‍या यज्ञांच्‍या स्‍वरूपातील ‘धर्म’ म्‍हणजे ‘अग्‍निउपासना’.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/724301.html

आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे

५. श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍यापूर्वी (अंगीकारण्‍यापूर्वी) झालेले त्रास

५ अ. गुरुजींनी ‘चांगला दिवस नसल्‍याने श्रौत अग्‍निहोत्र घेता येणार नाही’, असे सांगणे; परंतु देवाच्‍या कृपेने योग्‍य तो मार्ग मिळणे : आम्‍ही श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍याचे ठरवले. तेव्‍हा एका गुरुजींनी ‘या वर्षी गुरु अस्‍त आहे. त्‍यामुळे श्रौत अग्‍निहोत्र घेता येईल, असे वाटत नाही’, असे सांगितले. म्‍हणजे ‘चांगला दिवस नसल्‍याने श्रौत अग्‍निहोत्र घेता येणार नाही’, असे त्‍यांचे मत होते; परंतु देवाच्‍या कृपेने या अडचणीवर मात करून योग्‍य तो मार्ग मिळाला.

(‘श्रौत अग्‍निहोत्र वसंत ऋतूतच घ्‍यावा’, असा नियम आहे. वसंत ऋतू हा चैत्र आणि वैशाख असे दोनच मास असतो आणि या वर्षी त्‍याच दरम्‍यान गुरु ग्रहाचा अस्‍त असणार होता. [सूर्याभोवती फिरतांना पृथ्‍वी आणि अन्‍य ग्रह यांच्‍यामधे सूर्य येतो, त्‍या वेळी ते ग्रह पृथ्‍वीवरून दिसत नाहीत. याला ग्रह अस्‍त होणे, असे म्‍हणतात.])

५ आ. आहिताग्‍नी वेदमूर्ती चैतन्‍य काळेगुरुजी यांनी कार्यक्रमाला येण्‍याची सिद्धता दर्शवणे : एका गुरुजींना विचारल्‍यानंतर पुष्‍कळ दिवसांनी त्‍यांनी ‘जमणार नाही’, असे कळवले. देवाच्‍या कृपेने आहिताग्‍नी वेदमूर्ती चैतन्‍य काळेगुरुजी यांना विचारल्‍यावर त्‍यांनी लगेच येण्‍याची सिद्धता दर्शवली आणि कार्यक्रम व्‍यवस्‍थित पार पडला.

५ इ. या काळात घरात आणि आम्‍हा दोघांत बर्‍याच लहान सहान गोष्‍टींवरून पुष्‍कळ मतभेद होत होते.

५ ई. प्रारंभी अनेक लहान-मोठ्या कारणांनी कामे अडकून रहात होती. कधी कुणाची प्रकृती ठीक नसे, तर कधी ऐन वेळी दुसरे काही काम यायचे.

५ उ. पायाला जंतूसंसर्ग झाल्‍यामुळे सूज येऊन बसण्‍या-उठण्‍यास त्रास होणे; पण देवाच्‍या कृपेने कार्यक्रमाच्‍या दिवसापर्यंत थोडे बरे वाटून सर्व कार्यक्रम निर्विघ्‍नपणे पार पडणे : माझ्‍या पायाच्‍या त्‍वचेला जंतूसंसर्ग झाला होता. श्रौत घेण्‍याच्‍या कालावधीत तो पुष्‍कळ प्रमाणात वाढला आणि पायाला सूज येऊन मला साधी मांडी घालून बसता येणेही अशक्‍य झाले. त्‍यामुळे तयारीचा सर्व भार श्री. केतन यांच्‍या एकट्यावरच पडला. देवाच्‍या कृपेने कार्यक्रमाच्‍या दिवसापर्यंत थोडे बसता आणि उभे रहाता येऊ लागले अन् सर्व कार्य निर्विघ्‍नपणे पार पडले.

५ ऊ. श्री. केतन यांना छातीत दुखू लागणे; परंतु औषधोपचार आणि नामजपादी उपाय केल्‍यावर ८ दिवसांनी त्‍यांना बरे वाटू लागणे : श्री. केतन यांना अकस्‍मात् छातीत दुखण्‍याचा त्रास होऊ लागला. आधुनिक वैद्यांकडेे जाऊन औषधे घेतली; पण काहीच फरक पडला नाही. नंतर एका हृदयरोग तज्ञांना (‘हार्ट स्‍पेशालिस्‍ट’ला) दाखवले. तेव्‍हा त्‍यांनी ‘वातामुळे त्रास होत आहे’, असे सांगितले. नंतर औषधोपचार आणि नामजपादी उपाय केल्‍यावर ८ दिवसांनी त्‍यांना बरे वाटू लागले.

५ ए. दोघांचीही शारीरिक दुखणी वाढणे आणि विकल्‍प येणे : एकंदरीतच आम्‍हा दोघांचीही शारीरिक दुखणी वाढली. उष्‍णता होणे, पोट साफ न होणे, वात आणि कफ यांचा त्रास, असे अनेक त्रास होत होते. तेव्‍हा क्षणभरासाठी ‘आपण घेतलेला निर्णय योग्‍य आहे ना ?’, असा विकल्‍पही आमच्‍या मनात आला; पण वेळोवेळी उपाय विचारून घेतल्‍याने त्‍यावर मात करता आली.

५ ऐ. अग्‍नी घेण्‍याच्‍या कार्यक्रमाच्‍या वेळी ज्‍यांना ज्‍यांना आम्‍ही बोलावले होते, त्‍या सर्वांना पुष्‍कळ अडचणी येत होत्‍या; पण सर्वांच्‍या अडचणी सुटल्‍या आणि सर्व जण ठरलेल्‍या वेळेत कार्यक्रमाला पोचू शकले.

५ ओ. पू. शहाणेआजींची प्रकृती खालावणे, तरीही कार्यक्रम निर्विघ्‍नपणे पार पडणे : आम्‍ही कार्यक्रमाच्‍या सिद्धतेला आरंभ केल्‍यावर काही दिवसांतच पू. शहाणेआजींच्‍या पायाला मांजराचे नख लागल्‍याने त्‍या रुग्‍णाईत झाल्‍या; पण काही दिवसांतच त्‍यांना बरे वाटू लागले. (श्री. केतन यांची आजी आणि सनातन संस्‍थेच्‍या ५५ व्‍या (व्‍यष्‍टी) संत पू. (कै.) सुशीला शहाणेआजी.) आमचा मुख्‍य कार्यक्रम होता, त्‍याच्‍या एक दिवस आधी पू. आजींना उलट्या होणे, पोटात दुखणे इत्‍यादी त्रास होऊ लागले. त्‍यामुळे त्‍या रात्रभर नीट झोपू शकल्‍या नाहीत. तेव्‍हा सगळ्‍यांनाच चिंता वाटू लागली. कार्यक्रमाच्‍या दिवशी आजींची प्रकृती अजून खालावल्‍याने ‘त्‍यांना रुग्‍णालयात दाखल करावे लागेल’, असे गावातील आधुनिक वैद्यांनी सांगितले; पण कार्यक्रम निर्विघ्‍नपणे पार पडला आणि त्‍यानंतर पू. आजींना रुग्‍णालयात न्‍यावे लागले. त्‍यांची प्रकृती खालावत गेली आणि साधारण एक मासाने पू. आजींनी देह ठेवला.

५ औ. या कालावधीत वाईट स्‍वप्‍ने पडणे, डोके जड होणे, काही न सुचणे, अनावश्‍यक विचार येणे, चिडचिड होणे इत्‍यादी त्रास होत होते. घरातही एक प्रकारचा दाब जाणवत होता.

५ अं. श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितलेले विविध उपाय केल्‍यावर मूळ घरी जाणवणारा दाब न्‍यून होणे आणि त्रासदायक वातावरण पालटणे : आमच्‍या नाटे येथील मूळ घरी कुंड बनवण्‍याचे काम चालू करण्‍यापूर्वी तेथे पुष्‍कळ दाब आणि त्रासदायक वातावरण जाणवत होते; पण श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘विभूती फुंकरणे, प.पू. भक्‍तराज महाराजांची भजने लावणे, अग्‍निनारायणाला प्रार्थना करणे’, असे उपाय सांगितले होते. ते उपाय केल्‍यावर दाब न्‍यून झाला आणि वातावरणही चांगले झाले.

(क्रमश:)

– सौ. कल्‍याणी केतन शहाणे, रत्नागिरी (२२.६.२०२३)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/724953.html