रत्नागिरी येथील आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे यांना ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतांना (व्रत अंगीकारतांना) आलेल्‍या अनुभूती

१५.५.२०२३ या दिवशी आहिताग्‍नी वेदमूर्ती केतन शहाणे यांनी ‘श्रौत अग्‍निहोत्र’ (टीप १) घेतले. त्‍या वेळी त्‍यांना आणि त्‍यांच्‍या पत्नी सौ. कल्‍याणी शहाणे यांना झालेले त्रास, आलेल्‍या अडचणी, वेळोवेळी त्‍यांना देवाने कुणाच्‍या तरी माध्‍यमातून केलेले साहाय्‍य आणि ‘श्रौत अग्‍निहोत्र’ घेतल्‍यावर आलेल्‍या अनुभूती येथे दिल्‍या आहेत.

टीप १ – श्रौत अग्‍निहोत्र : श्रुतींमध्‍ये म्‍हणजे वेदांमध्‍ये सांगितलेल्‍या ३ अग्‍नींच्‍या साहाय्‍याने करावयाच्‍या यज्ञांच्‍या स्‍वरूपातील ‘धर्म’ म्‍हणजे ‘अग्‍निउपासना’.

वेदमूर्ती केतन शहाणे आणि सौ. कल्‍याणी शहाणे 

१. श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍यापूर्वी (व्रत अंगीकारण्‍यापूर्वी) आलेल्‍या अनुभूती

अ. नोव्‍हेंबर २०२१ मध्‍ये श्री. केतन शहाणे यांना एका सोमयागाला जाण्‍याची संधी मिळाली. तेव्‍हा माझ्‍या (सौ. कल्‍याणी केतन शहाणे यांच्‍या) मनात ‘आपणही ‘श्रौत’ घ्‍यावे’, असा विचार आला होता आणि नेमके तेव्‍हाच श्री. केतन यांना सोमयागाच्‍या ठिकाणी आलेल्‍या गुरुजींनीही ‘तुम्‍ही श्रौत का घेत नाही ?’, असे विचारलेे. तेव्‍हा ‘देवानेच हा विचार माझ्‍या मनात घातला’, असे मला वाटले.

आ. या प्रसंगानंतर आमची याविषयी चर्चा झाली. तेव्‍हा ‘आपल्‍याकडे तेवढी जागा नाही आणि आर्थिकदृष्‍ट्याही जुळत नाही’, असे म्‍हणून आम्‍ही ‘सध्‍या नको’ असा विचार केला; पण देवानेच वेगवेगळ्‍या माध्‍यमातून ‘आम्‍ही कसे करू शकतो ?’, याचे वेगवेगळे पर्याय सुचवले आणि आम्‍ही परत ‘श्रौत’ घेण्‍याचा विचार करू लागलो.

इ. यानंतर आम्‍ही ‘अग्‍निहोत्र घेण्‍यासाठी नेमके काय काय करावे लागेल ?’, याचे मार्गदर्शन घेण्‍यासाठी वेदमूर्ती प्रभाकर जोगळेकर गुरुजींकडे गेलो. त्‍यांनी आम्‍हाला याविषयी चांगले मार्गदर्शन केले.

२. श्रौत अग्‍निहोत्र घेण्‍याची (व्रत अंगीकारण्‍याची) सिद्धता करतांना आलेल्‍या अनुभूती

डिसेंबर २०२२ पासून आम्‍ही ‘अग्‍निहोत्र घेण्‍यासाठी काय काय करावे लागेल ?’, याचा अभ्‍यास करायला आणि त्‍याप्रमाणे सिद्धतेला आरंभ केला.

अ. सिद्धतेला आरंभ करायच्‍या वेळी अकस्‍मात् श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची भेट झाली. त्‍या वेळी श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) गाडगीळ यांनी आम्‍हाला त्‍यांना गणपतीचा प्रसाद म्‍हणून मिळालेला नारळ दिला. तेव्‍हा ‘त्‍यांच्‍या माध्‍यमातून देवानेच आम्‍हाला या कार्यासाठी आशीर्वाद दिला’, असे मला वाटले.

आ. या कार्यासाठी लागणारे साहित्‍य जमवण्‍यासाठी अनेक ओळखीच्‍या व्‍यक्‍तींनी फार चांगले सहकार्य केले. अग्‍निहोत्रासाठी लागणार्‍या यज्ञपात्रांसाठी ‘खैर’ या वृक्षाचे लाकूड लागते.

श्री. केतन यांना त्‍यांच्‍या एका परिचितांकडून काही संपर्क मिळाले आणि खैराच्‍या लाकडाची व्‍यवस्‍था झाली. या लाकडाची वाहतूक करण्‍यासाठी शासनाची अनुमती घ्‍यावी लागते. तेव्‍हा देवाच्‍या कृपेने आम्‍हाला येथेही काही अडचण आली नाही. ते व्‍यवस्‍थित मापात कापण्‍यासाठी एका परिचित लाकडाच्‍या गिरणीमालकाने आम्‍हाला साहाय्‍य केले.

इ. आहिताग्‍नी वेदमूर्ती चैतन्‍य काळेगुरुजी यांनी आम्‍हाला ‘यज्ञपात्र बनवण्‍यासाठी त्‍याची मापे कशी असावीत ?’, यासाठी मोलाचे सहकार्य केले.

ई. रत्नागिरीत असे सुतारकाम करणारे सुतार नसल्‍याने ‘आता कसे करावे ?’, असा आम्‍हाला प्रश्‍न पडला होता; परंतु एका ओळखीच्‍या सुतारांना विचारल्‍यावर त्‍यांनी यज्ञपात्र बनवण्‍यास होकार दिला आणि त्‍यांनी हे काम मनापासून केले.

उ. त्‍यांनी आम्‍हाला यज्ञकुंड बांधण्‍यासही चांगले सहकार्य केले. हे करतांना, ‘तुम्‍ही देवाचे कार्य करत आहात. त्‍यात तुम्‍हाला साहाय्‍य करण्‍याची मला संधी मिळत आहे’, हे माझेे भाग्‍य आहे. ही सेवा देवापर्यंत पोचू दे’, असा त्‍यांचा भाव होता.

ऊ. आमच्‍या मूळ गावी नाटे (जिल्‍हा रत्नागिरी) येथेही अग्‍निहोत्रासाठी कुंड सिद्ध करायचे होते. त्‍या वेळीही या सुतारांनी आम्‍हाला चांगले सहकार्य केले. तेव्‍हा त्‍यांच्‍या साहाय्‍याला कुणीच नव्‍हते, तरीही त्‍यांनी कोणतीच तक्रार न करता काम व्‍यवस्‍थित आणि मनापासून केले. मला त्‍यांच्‍यात साधकत्‍व असल्‍याचे जाणवले.

ए. अग्‍निहोत्र ठेवण्‍याच्‍या अनुषंगाने आमच्‍या रहात्‍या घरीही काही पालट करावे लागले. त्‍यासाठी आम्‍हाला एक ओळखीच्‍या ‘इंटिरिअर डेकोरेटर’ मिळाल्‍या. त्‍यांनी ‘अल्‍प व्‍ययात कसे करू शकतो ?’, हे फार चांगले सांगितले. त्‍याप्रमाणे पालट केल्‍यावर घरातील स्‍पंदनेही पालटली.

३. अग्‍निहोत्रासाठी लागणारी भांड्यांची खरेदी करतांना अडचणी येणे आणि त्‍यातून मार्गही मिळणे

३ अ. कोल्‍हापूर येथे गेल्‍यावर अकस्‍मात् ताप येणे : अग्‍निहोत्रासाठी लागणारी भांडी रत्नागिरीत मिळत नसल्‍याने आम्‍ही ‘कोल्‍हापूरला जाऊन बघूया’, असा विचार केला. मी (सौ. कल्‍याणी शहाणे) आणि श्री. केतन भांडी खरेदीसाठी कोल्‍हापूर येथे गेलो असतांना मला अकस्‍मात् ताप आला. त्‍यामुळे आम्‍ही श्री महालक्ष्मीच्‍या देवळाच्‍या आवारात जाऊनही आम्‍हाला दर्शन घेता आले नाही.

३ आ. दुकानदाराने अग्‍निहोत्रासाठी लागणारी भांडी मिळवून देण्‍यास साहाय्‍य करणे : कोल्‍हापूर येथे आमची व्‍यवस्‍था श्री. केतन यांच्‍या ओळखीच्‍या एका गुरुजींकडे झाली आणि त्‍यांच्‍याकडून आम्‍हाला काही दुकानांची माहिती मिळाली. सर्व वस्‍तू एकाच दुकानात मिळत नव्‍हत्‍या; पण एका दुकानदाराने काही भांडी त्‍यांच्‍या गोदामातून शोधून आणली आणि काही इतर दुकानांतून आणून दिली.

४. श्रौत घेतांना (अंगीकारतांना) अनेक अडचणी येऊनही योग्‍य मार्ग मिळणे आणि देवाची कृपा अनुभवणे

४ अ. ऐनवेळी जोरदार पाऊस पडल्‍याने पाण्‍याची अडचण दूर होणे : अग्‍निहोत्र आधानाचा (टीप २) कार्यक्रम आमच्‍या मूळ घरी नाटे (राजापूर) येथे करण्‍याचे आमचे नियोजन होते; पण ‘मे’ मास असल्‍याने पाण्‍याची टंचाई जाणवू लागली होती. त्‍यामुळे ‘कार्यक्रमाच्‍या वेळी पाण्‍याची अडचण येऊ शकते’, अशी भीती होती; परंतु कार्यक्रमाच्‍या २ दिवस आधी गावाच्‍या परिसरात जोरदार पाऊस पडला आणि देवाच्‍या कृपेने पाण्‍याची अडचण दूर झाली. त्‍या वेळी आमच्‍याकडून देवाच्‍या चरणी कृतज्ञता व्‍यक्‍त झाली.

टीप २ – अग्‍निहोत्र आधानाचा विधी : यजमानाला अग्‍निहोत्र उपासना करण्‍यासाठी विधीपूर्वक यज्ञाची दीक्षा देणे

४ आ. एका ओळखीच्‍या व्‍यक्‍तीने अग्‍निहोत्रासाठी पिंपळाची लाकडे मिळवून देणे : अग्‍निहोत्राच्‍या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात जळाऊ लाकडे लागणार होती. पुष्‍कळ प्रयत्न करूनही ती मिळत नव्‍हती. एक दिवस श्री. केतन त्‍यांच्‍या ओळखीच्‍या व्‍यक्‍तीशी अग्‍निहोत्रासंदर्भात बोलत होते. तेव्‍हा त्‍यांनी सांगितले, ‘‘आताच आम्‍ही आमच्‍या येथील एक पिंपळाचे झाड तोडले आहे. त्‍याची तुम्‍हाला हवी तेवढी लाकडे घेऊन जा.’’ अशा प्रकारे इंधनाची मोठी सोय झाली. (पिंपळाचे लाकूड यज्ञासाठी सर्वोत्तम मानले जाते.)

४ इ. समाजातील लोकांनी पुष्‍कळ साहाय्‍य करणे : कार्यक्रम मोठा होता. त्‍यासाठी देवाने आम्‍हाला वेगवेगळ्‍या माध्‍यमांतून साहाय्‍य केले. कार्यक्रमाला येणार्‍या सर्वांची रहाण्‍याची आणि जेवणाची व्‍यवस्‍था करतांना समाजातील लोकांनी आम्‍हाला पुष्‍कळ साहाय्‍य केले. देवाने वेगवेगळ्‍या व्‍यक्‍तींच्‍या माध्‍यमांतून अग्‍निहोत्रासाठी लागणार्‍या वस्‍तू आणि आर्थिक साहाय्‍य मिळवून दिले.

४ ई. श्री. केतन यांच्‍या काकांनी केलेले साहाय्‍य : या सगळ्‍यांत श्री. केतन यांच्‍या काकांनी त्‍यांचे गावातील भिक्षुकीचे काम सांभाळून आम्‍हाला पुष्‍कळ साहाय्‍य केले. स्‍मार्ताग्‍नीचे (टीप ३) कुंड घालणे, भूमी करून घेणे, अग्‍निहोत्रासाठी लागणार्‍या विविध प्रकारच्‍या समिधा आणणे इत्‍यादी अनेक गोष्‍टींत त्‍यांचे मोठे साहाय्‍य झाले.

टीप ३ – स्‍मार्ताग्‍नी : विवाहाच्‍या वेळी ज्‍या अग्‍नीवरती विवाह होम होतो, त्‍या अग्‍नीचे रक्षण पती-पत्नीने करावयाचे असते. या अग्‍नीला ‘गृह्याग्‍नी’ असे म्‍हणतात. यालाच ‘स्‍मार्ताग्‍नी’ असेही म्‍हणतात. (स्‍मृतींमध्‍ये सांगितल्‍यानुसार या अग्‍नीची सेवा करायची असते. याला ‘स्‍मार्ताग्‍नी’ असे म्‍हणतात.)

(क्रमश:)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक