कुर्द विद्रोहींच्या आत्मघातकी आक्रमणांचा सूड घेण्यासाठी तुर्कीयेने २० ठिकाणी केला बाँबचा वर्षाव !

तुर्कीयेच्या दक्षिण पूर्व भागावर कुर्द विद्रोही सांगत आले आहेत त्यांचा अधिकार !

अंकारा (तुर्कीये) – तुर्कीयेची राजधानी अंकारा येथे १ ऑक्टोबर या दिवशी कुर्द विद्रोहींकडून तेथील मंत्रालयाच्या बाहेर करण्यात आलेल्या २ आत्मघातकी आक्रमणांनंतर तुर्कीयेच्या वायूसेनेने सूड उगवण्यास आरंभ केला आहे. वायूसेनेने इराकमधील कुर्द विद्रोहींच्या ठिकाणांवर बाँब वर्षाव करण्यास आरंभले. आतापर्यंत २० ठिकाणी बाँबद्वारे आक्रमण करण्यात आले. यामध्ये अनेक गुहा, बंकर, गोदामे आदी स्थानांचा समावेश आहे. यामध्ये अनेक कुर्द विद्रोही मारले गेल्याचे सांगण्यात येत आहे. तुर्कीयेचे अंतर्गत विषयांचे मंत्री अली यारलीकाया यांनी तुर्कीयेच्या या कारवाईची पुष्टी केली आहे.

१ ऑक्टोबर या दिवशी कुर्द विद्रोहींनी केलेल्या आक्रमणात तुर्कीयेचे दोन पोलीस घायाळ झाले होते. हे आक्रमण अशा वेळी झाले आहे, जेव्हा तुर्कीये इस्लामिक स्टेटच्या विरोधात कठोर कारवाई करत आहे. त्यामुळे आता यारलीकाया म्हणाले की, जोपर्यंत सर्व कुर्द विद्रोही मारले जात नाहीत, तोपर्यंत तुर्कीये शांत बसणार नाही.

तुर्कीये आणि कुर्द यांच्यामधील ऐतिहासिक वाद !

पहिल्या विश्‍वयुद्धाच्या आधी सीरिया, इराक, ईराण, तुर्कीये आणि आर्मेनिया यांसारखे देश ‘ऑटोमन’ म्हणजेच ‘उस्मानिया सल्तनत’चा भाग होते. विश्‍वयुद्धात तुर्कीयेचा पराभव झाल्यावर हे सर्व देश वेगवेगळे झाले. या देशांमध्ये कुर्द लोकांची जवळपास ३ कोटी एवढी लोकसंख्या आहे. हे लोक स्वत:साठी स्वतंत्र ‘कुर्दीस्तान’ची मागणी करत आहेत. तुर्कीयेच्या काही भूभागावर ते स्वत:चा अधिकार असल्याचे सांगतात. यामुळेच त्यांच्यात आणि तुर्कीये यांच्यामध्ये संघर्ष चालू आहे. तुर्कीयेतील ‘कुर्दिस्तान वर्कर्स पार्टी’ कुर्द विद्रोहींची सर्वांत मोठी संघटना असून ते गनिमी काव्याच्या माध्यमातून तुर्कीयेशी युद्ध करत आहेत. कुर्दांना इराकमधील उत्तर पश्‍चिम भागात स्वायत्त राज्य मिळाले असून त्यांना तुर्कीयेच्या दक्षिण पूर्व भूभागावर स्वायत्तता हवी आहे. सीरियाच्या उत्तर पश्‍चिम भागावरही त्यांचा प्रभाव आहे.

संपादकीय भूमिका 

जेव्हा-जेव्हा तुर्कीये काश्मीरवरून पाकिस्तानची बाजू घेतो, तेव्हा-तेव्हा त्याला डोकेदुखी बनलेल्या कुर्द लोकांचे ‘दु:ख’ आणि ते मागणी करत असलेले ‘कुर्दीस्तान’ यांसाठी भारताने आवाज उठवल्यास चूक ते काय ?