पुणे येथील श्री. अरविंद सहस्रबुद्धे हे मागील १८ वर्षांपासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना आणि सेवा करत आहेत. ते १२ वर्षांहूनही अधिक काळ साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा अचूकपणे करत आहेत. त्यांच्याविषयी पत्नी सौ. मंगला सहस्रबुद्धे आणि त्यांचे सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये अन् त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट पुढे दिले आहेत.
१. सौ. मंगला सहस्रबुद्धे (श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांच्या पत्नी, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे)
१ अ. जाणवलेले पालट
१ अ १. ‘यजमान पूर्वी क्वचित् नातवंडांवर चिडचिड करत असत; परंतु पूर्वीच्या तुलनेत आता ते शांत वाटतात.
१ अ २. पूर्वी ‘त्यांच्यावर वाईट शक्तीचे आवरण आहे’, असे मला वाटायचे; पण आता त्यांच्या चेहर्याकडे पाहिल्यावर शांत वाटून आनंद जाणवतो.
१ अ ३. बोलण्यात नम्रता येणे : पूर्वी काही प्रसंगी ते प्रतिक्रियात्मक बोलायचे; पण या ६ – ७ मासांत त्यांचे प्रतिक्रियात्मक बोलणे न्यून झाले असून त्यांच्या बोलण्यात पुष्कळ नम्रता आणि प्रीती जाणवते.
१ अ ४. अंतर्मुख होणे : पूर्वी मी यजमानांना चूक सांगितली, तर ते स्वीकारत नसत; पण आता ते चूक स्वीकारून गुरुदेवांकडे क्षमा मागतात. आता ते अंतर्मुख झाले आहेत.
१ अ ५. ‘दिवसभर सतत सेवा, त्यानंतर प्रार्थना आणि नामजप’, असा यजमानांचा नित्यक्रम झाला आहे.
१ अ ६. सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असणे : ‘ते सतत गुरुदेवांच्या अनुसंधानात असतात’, असे मला वाटते. ते मला म्हणतात, ‘‘आता माझ्या मनामध्ये नामजप, प.पू. गुरुदेवांशी अनुसंधान आणि त्यांच्याविषयी कृतज्ञता एवढेच आहे’, असे मला वाटते.’’
१ अ ७. अनुभूती : यजमानांना घरात असलेल्या श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्राविषयी अनुभूती आल्या आहेत. त्यांना कधी श्रीकृष्णाचे सुदर्शनचक्र फिरतांना, तर कधी श्रीकृष्णाच्या मुकूटातील मोरपीस हलतांना दिसते.’
२. पुणे येथील साधकांना श्री. अरविंद सहस्रबुद्धे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये
२ अ. सौ. राधा सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.
२ अ १. प्रेमभाव
अ. ‘सहस्रबुद्धेकाका त्यांच्या संपर्कातील प्रत्येक साधकाला त्याच्या वाढदिवसानिमित्त आपुलकीने शुभेच्छा देतात. काकांनी केवळ साधकांच्याच नाही, तर साधकांच्या जवळच्या नातेवाइकांच्याही वाढदिवसाच्या नोंदी ठेवल्या आहेत. काका साधकांच्या नातेवाइकांनाही त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून शुभेच्छा देतात.
आ. महाशिवरात्रीला काकांचा वाढदिवस असतो. त्या दिवशी सिंहगड रस्ता येथे ग्रंथप्रदर्शन कक्ष असतो. तेव्हा काका सेवेसाठी आलेल्या सर्वांसाठी आवर्जून खाऊ पाठवतात.
इ. ते साधकांच्या सेवेचा पाठपुरावाही अतिशय प्रेमाने घेतात.
२ आ. उत्तम स्मरणशक्ती : काकांचे वय ७६ वर्षे असूनही त्यांची स्मरणशक्ती पुष्कळ चांगली आहे. अनेक सूत्रे त्यांच्या लक्षात असतात.
२ इ. सेवेची तीव्र तळमळ
१. काकांचे वय अधिक असूनही ते मनापासून अनेक घंटे बसून सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. त्यांच्या सेवेचा कधीही पाठपुरावा घ्यावा लागत नाही.
२. काकांना ‘सेवा लवकर पूर्ण व्हावी’, असा ध्यास असतो. त्यामुळे त्यांची प्रकृती बरी नसली, तरी ते सेवा करतात.
३. ‘सेवेतील सूत्रे सहसाधकांना नीट समजावीत’, यासाठी काका ती सूत्रे व्यवस्थित लिहून देतात.
२ ई. भाव : सेवा करतांना काकांच्या भोवती साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेच्या संदर्भातील वह्या असतात. ‘त्या वह्यांतून मला चैतन्य मिळते’, असा त्यांचा भाव असतो.’
३. सौ. शारदा हुमनाबादकर, सिंहगड रस्ता, पुणे.
३ अ. दिवसभर कार्यरत असणे : ‘काका प्रतिदिन पहाटे ४.३० – ५ वाजता उठतात. तेव्हापासून ते रात्री ९ – १० वाजेपर्यंत ‘नामजप करणे, प्रार्थना करणे, स्तोत्रे म्हणणे आणि सेवा करणे’, यांमध्ये अखंड कार्यरत असतात.
३ आ. पत्नीला घरकामात आनंदाने साहाय्य करणे : सौ. मंगलावहिनींना (सौ. मंगला सहस्रबुद्धे यांना) कधी बरे नसले किंवा थकवा असला, तर काका त्यांना स्वयंपाकात पुष्कळ साहाय्य करतात. ते प्रतिदिनही त्यांना घरकामांत आनंदाने साहाय्य करतात.
३ इ. वहीत लिहिलेल्या प्रार्थना प्रतिदिन वाचणे : नियतकालिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध होणार्या संत आणि साधक यांच्या लेखांमधील प्रार्थना काका वहीत लिहितात अन् त्या प्रतिदिन वाचतात. काकांनी अशा १०० प्रार्थना वहीत लिहिल्या असून ते त्या प्रार्थना दिवसातून न्यूनतम ३ वेळा वाचतात.
३ ई. भाव
१. सहस्रबुद्धेकाका-काकू या दोघांनीही घर आश्रमाप्रमाणेच ठेवले आहे. काकांच्या घरी अनेक वेळा संत वास्तव्यास येत असत.
२. काकांच्या मनात सद़्गुरु स्वातीताई (सद़्गुरु स्वाती खाडये) यांच्याप्रती अपार आदर, श्रद्धा आणि प्रेम आहे. त्यांच्या बोलण्यात अनेक वेळा सद़्गुरु स्वातीताई यांचा उल्लेख येतो.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.३.२०२३)
(‘हे लिखाण पू. अरविंद सहस्रबुद्धेकाका यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वीचे असल्याने त्यांच्या नावाआधी ‘पू.’ लावलेले नाही. – संकलक)
सनातनचे १२५ वे संत पू. अरविंद सहस्रबुद्धे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्यात झालेले पालट
१. प्रेमळ
‘मला सहस्रबुद्धेकाका आणि काकू यांचा सहवास पुष्कळ आधीपासून मिळाला आहे. सर्वच साधिकांना काका-काकूंचे घर म्हणजे माहेरघर वाटते, इतका प्रेमभाव त्या दोघांमध्येही आहे. त्यांनी मला साधनेमध्ये अनेक टप्प्यांवर पुष्कळ साहाय्य केले आहे.
२. दृढनिश्चयी
काका साधनेत येण्यापूर्वी नास्तिक होते. साधनेत आल्यानंतर त्यांनी बुद्धीने दृढनिश्चय करून साधना केली आणि त्यांची आध्यात्मिक प्रगतीही झाली.
३. परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करणे
३ अ. अचूक सेवा करणे : काका मागील १२ वर्षांहून अधिक काळ पुण्यातील सिंहगड रस्ता येथील साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या संदर्भातील सेवा करतात. त्यांचे एवढे वय (७६ वर्षे) झाले असूनही ते ती सेवा अतिशय परिपूर्ण करतात. त्यांच्या सेवेमध्ये कधीच चुका नसतात. त्यांच्यातील सेवेच्या तळमळीमुळे सिंहगड रस्ता येथील सेवांची घडी बसायला पुष्कळ साहाय्य झाले.
३ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांना अपेक्षित अशी सेवा करण्याचा प्रयत्न करणे : काका इतकी वर्षे सेवा करत असूनही त्यांच्या मनात कधीच प्रतिक्रिया आल्या नाहीत किंवा त्यांच्याकडून कधी चूकही झाली नाही. सर्व वर्गणीदारांना साप्ताहिकाचे अंक वेळेत नियमित मिळतात. मी त्यांना विचारले, ‘‘काका, सेवा करतांना तुमच्या मनात काय भाव असतो ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘प.पू. गुरुदेवांनी मला ही सेवा दिली आहे. ही सेवा मला त्यांना अपेक्षित अशी परिपूर्णच करायची आहे, असाच माझा भाव असतो.’’
३ इ. सेवेशी एकरूप होणे : काकांना स्वप्नेही साप्ताहिक ‘सनातन प्रभात’च्या सेवेविषयी पडतात. ‘काका सेवेशी पूर्ण एकरूप झाले आहेत’, असे मला जाणवते.
४. काकांची प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा आहे.
५. काकांमध्ये मागील काही मासांपासून जाणवलेले सकारात्मक पालट
५ अ. स्थिरता वाढणे : काका नेहमीच आनंदी असतात; पण आता त्यांच्यात स्थिरता जाणवते. काका शारीरिकदृष्ट्या थकले आहेत, तरीही ते स्थिर असतात. त्यांच्या मनात कुठलीही काळजी किंवा चिंता नसते.
५ आ. मृत्यूबद्दल आदर्श दृष्टीकोन : काका काकूंना नेहमी सांगतात, ‘‘आपल्या दोघांपैकी कुणीतरी एक जण आधी जाईल. तेव्हा मागे रहाणार्याने दुःख न करता आपली साधना आणि सेवा चालूच ठेवायची.’’
५ इ. काका घरातील किंवा स्वतःच्या आयुष्यातील सगळ्या प्रसंगांकडे साक्षीभावाने पहातात.
५ ई. वयामुळे शारीरिक मर्यादा आल्या असूनही त्याविषयी त्यांचे कधीच गार्हाणे नसते. ते सतत आनंदी आणि उत्साही असतात.’
– (पू.) सौ. मनीषा महेश पाठक (सनातनच्या १२३ व्या संत), पुणे (३०.३.२०२३)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |