गोव्यात आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी आणण्याचा विचार ! – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे वक्तव्य

पणजी, २९ सप्टेंबर (वार्ता.) : सरकार राज्यात काही आक्रमक कुत्र्यांच्या जातींवर बंदी घालण्याचा गांभीर्याने विचार करत आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. ‘जागतिक रेबीज दिना’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री डॉ. सावंत बोलत होते.

भटक्या कुत्र्यांमुळे राज्यात प्रतिदिन  १-२ गंभीर स्वरूपाचे अपघात

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले, ‘‘लोक पाळत असलेले काही कुत्रे आक्रमक असतात आणि ते थेट लोकांवर आक्रमण करतात. हा प्रकार जीवघेणा असतो. मोकाट कुत्र्यांमुळे राज्यात प्रतिदिन १-२ गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. कुत्र्यांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याची आवश्यकता आहे. गोवा हे देशातील एकमेव ‘रेबीज’मुक्त राज्य आहे. कुत्र्यांचे लसीकरण करण्यासह ‘मिशन रेबीज’च्या सहकार्याने गोव्यातील कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठीही मोहीम हाती घेतली जाणार आहे. यासाठी जनतेचे सहकार्य अपेक्षित आहे.’’

करासवाडा, म्हापसा येथे शाळेच्या परिसराच्या बाहेर एका विद्यार्थिनीच्या एक कुत्रा मागे लागल्याने धावतांना पडल्याने तिच्या पायाचे हाड मोडण्याची घटना २ दिवसांपूर्वी घडली होती. या परिसरातील ही गेल्या काही दिवसांतील तिसरी घटना होती.

संपादकीय भूमिका

याचसमवेत सर्वत्र फोफावलेली भटक्या कुत्र्यांची समस्याही सरकारने गांभीर्याने आणि त्वरित सोडवणे अपेक्षित आहे !