मुंबई – उपनगरांमध्ये गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात राजकीय लोकप्रतिनिधींचे फ्लेक्स फलक लागले आहेत. गणेशभक्तांच्या स्वागताचे हे फलक लावण्यासाठी बंदी आहे. असे असूनही सर्वच पक्षांकडून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी हे फलक सर्वत्र लावण्यात आले आहेत. त्यामुळे शहराचे विद्रूपीकरण होत असल्याची चर्चा अनेक ठिकाणी होत असते. या फलकांवर स्थानिक कार्यकर्त्यांपासून पक्षाच्या सर्वोच्च नेत्यापर्यंत अनेकांची छायाचित्रे असतात. उच्च न्यायालयाने राजकीय फलक लावण्यास खरे तर बंदी घातली आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतांना मुंबई महानगरपालिकेने कारवाई करून दोन दिवसांमध्ये मुंबई ‘बॅनरमुक्त’ केली होती; मात्र आता दहीहंडी आणि नंतर गणेशोत्सवाच्या काळात परत सर्वत्र मोठ्या प्रमाणात हे अनधिकृत फलक लागले आहेत. काही नेतेमंडळी रस्त्याच्या मध्यभागीही स्वतःच्या नावाच्या कमानी उभारतात.
हे फलक हटवणार्या महापालिकेच्या कर्मचार्यांना कांदिवली येथे मारहाण झाल्याचेही समजते. त्यामुळे ‘आता कुणी कारवाई करण्यास धजावणार नाही’, अशी चर्चा आहे. ‘न्यायालयाच्या आदेशापेक्षा नेतेमंडळी मोठी आहेत कि काय ?’ असा प्रश्न निर्माण होत आहे.
संपादकीय भूमिकालोकप्रतिनिधींनो, प्रसिद्धीचा हव्यास बाळगण्यापेक्षा सामाजिक कर्तव्याचे भान जोपासून शहराचे विद्रूपीकरण टाळा ! |