छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे सातारा येथे आणणार ! – आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले

सातारा, १८ सप्‍टेंबर (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज यांची ऐतिहासिक वाघनखे लंडन येथील वस्‍तूसंग्रहालयामध्‍ये आहेत. ती वाघनखे भारतात आणण्‍याची घोषणा महाराष्‍ट्राचे सांस्‍कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. २ मासांत ती वाघनखे भारतात येणार आहेत. मुंबई, पुणे, कोल्‍हापूर आणि नागपूर या शहरातील वस्‍तूसंग्रहालयात ही वाघनखे शिवप्रेमींना पहाण्‍यासाठी ठेवण्‍यात येणार होती; मात्र सातारा येथील शिवप्रेमींना आणि समस्‍त सातारावासियांना छत्रपती शिवरायांची वाघनखे पहाता यावीत, यासाठी ती सातारा येथे आणण्‍यात यावीत, अशी मागणी आम्‍ही मंत्री मुनगंटीवार यांच्‍याकडे केली. याला सकारात्‍मक प्रतिसाद देत मंत्री मुनगंटीवार यांनी सहमती दर्शवली आहे, अशी माहिती भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.

सातारा जिल्‍ह्यातील प्रतापगड येथे अफझजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्‍वराज्‍यावर आलेले संकट परतवून लावले होते. त्‍या वेळी महाराजांनी वाघनखांचा उपयोग केला होता. ती वाघनखे वर्ष १८२४ मध्‍ये इंग्रजांनी लंडनला नेली. १९९ वर्षानंतर आता ही वाघनखे पुन्‍हा भारतात येणार आहेत. पुढील केवळ ३ वर्षे हा अनमोल ठेवा भारतात रहाणार आहे.