‘लोकसत्ता’ नावाचे (धर्म)संकट !

फुटीरतावादी आणि राष्ट्रघातकी विचारसरणी असलेले स्टॅलिनपुत्र उदयनिधी यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्मावर गरळओक केली. त्याचा योग्य तो वैचारिक समाचार सनातन धर्मीय घेत आहेतच; मात्र उदयनिधी यांच्या नादाला लागून लोकसत्ताकारांनी ‘सनातनी (धर्म) संकट’ या अग्रलेखाद्वारे सनातन धर्मियांची जी हेटाळणी केली आहे, ती चीड आणणारी आहे. तसे पाहिले, तर लोकसत्ताकारांना सनातन धर्म, परंपरा, संस्कृती यांचे वावडे आहेच. त्यांच्या मनात खदखदत असणारा हा द्वेष व्यक्त करण्यासाठी ते संधीच शोधत असतात. ती संधी त्यांना उदयनिधी यांच्या माध्यमातून मिळाली. सनातन धर्मियांना ‘कट्टरतावादी’, ‘बुरसटलेले’, ‘दांभिक’ अशा विविध उपमा देऊन त्यांनी हिंदुद्वेषाचा कंड शमवून घेण्याचा अश्लाघ्य प्रकार लोकसत्ताच्या अग्रलेखाद्वारे केला. ‘सनातन धर्म म्हणजे कर्मकांड’, ‘स्त्रीला चूल आणि मूल यांच्यापर्यंत सीमित ठेवणारा’, ‘जातीव्यवस्था जोपासणारा’, ‘विज्ञानद्रोही’ असे चित्र रंगवून पुरो(अधो)गामी भाषेत धर्मचिकित्सा करण्याचा भाबडा प्रयत्न केला आहे. असे करून ते स्वतःची पाठ थोपटून घेत असले, तरी यातून त्यांचे सनातन धर्माविषयीचे घोर अज्ञान दिसून आले. इंग्रज किंवा मार्क्सवादी यांनी हिंदु धर्माविषयी धूर्तपणे लिहिलेली ४ पुस्तके वाचून ‘मला हिंदु धर्म समजला’, अशा आविर्भावात वावरणारी टोळी भारतात कार्यरत आहे. लोकसत्ताकार हे याच टोळीतील एक सदस्य ! सनातन धर्माविषयी असे काहीतरी कागदावर गिरवण्याआधी धर्म समजून घेण्याची तसदी त्यांनी घेतली असती, तर त्यांच्या हातून असे पापकर्म निश्चितच घडले नसते; पण पुरोगामित्वाच्या डबक्यात वावरणार्‍यांना यासाठी वेळ कुठे आहे ? असो. सनातन धर्माचे अनेक शत्रू आहेत. हातात एके-४७ घेऊन हिंदूंना संपवण्याच्या भावनेने पछाडलेले जिहादी आतंकवादी घातकच; मात्र त्याहून अधिक हिंदूंच्या मनात त्यांच्या चिरंतन, समृद्ध आणि चैतन्यदायी धर्माविषयी संभ्रम अन् न्यूनगंडाची भावना निर्माण करणारे लोकसत्ताकारांसारखे वैचारिक आतंकवादी अधिक घातक आहेत. त्यामुळे समाजावर ‘सनातनी धर्मसंकट’ नव्हे, तर ‘लोकसत्ता’ नावाचे धर्मसंकट आले असून त्याचे वैचारिक पद्धतीने निवारण करणे, हे प्रत्येक हिंदूचे धर्मकर्तव्य आहे.

होय, आम्ही सनातनीच !

सनातन धर्म किंवा हिंदु धर्म ज्याला समजला, उमगला तो विशाल अशा धर्मसागरात डुंबून आनंदी झाला. ही या धर्माची किमया ! ज्याला धर्म समजतो, त्याचे जीवन धन्य होते. धर्म समजण्याची प्रक्रिया ही साधना करूनच पूर्ण होऊ शकते. ही प्रक्रिया म्हणजे सुंदर आणि आनंददायी प्रवास आहे. धर्म ज्याला समजला, त्याच्यासाठी धर्म हाच देव असतो, धर्म हाच माता आणि पिता असतो. यास कारण म्हणजे धर्माने सांगितलेली अमूल्य तत्त्वे अंगीकारल्याने त्याच्या आयुष्यातील अंधकार जाऊन तो प्रकाशमान होतो. धर्म आणि धर्मी यांचे असे हे अतूट नाते आहे. ही महती समजून घेण्यासाठी लोकसत्ताकारांनी थोडे कष्ट घेतले असते, तर त्यांचे आयुष्य नक्कीच समृद्ध झाले असते. हिंदु धर्माचे हे मर्म पॉल ब्रंटन, कॉनराड एल्स्ट आणि मारिया वर्थ यांनाही समजले. त्यामुळे परदेशी असूनही ते या धर्मासमोर नतमस्तक झाले. तो न समजणारे नतद्रष्टच होत !

धर्माला ग्लानी येते, हे साक्षात् भगवान श्रीकृष्णानेही सांगितले आहे. या काळात ज्या ठराविक लोकांकडून समाजविरोधी कृती झाल्या, त्या निंदनीयच होत्या. सनातन धर्मीय त्याचे समर्थन करत नाहीत. या कालावधीत ‘सनातन्यांनी किती जणांवर शेण फेकले ?’,

‘किती जणांवर दगड मारले ?’, ‘किती जणांना झिडकारले आणि अव्हेरले ?’ यांचा पाढा वाचून लोकसत्ताकार जर हिंदूंना झोडपण्याचा प्रयत्न करत असतील, तर त्याचा प्रतिवाद हा होणारच. लोकसत्ताकारांच्या मते सनातन धर्म म्हणजे स्त्रीविरोधी !

गांधीवादी विचारसरणीचे धर्मपाल यांनी लिहिलेल्या ‘द ब्युटीफूल ट्री’ या पुस्तकात पेशवेकाळात स्त्रियांना शिक्षण दिले जात असल्याचा उल्लेख आहे. जर या काळापर्यंत मुलींना शिक्षण दिले जात होते, तर मधल्या काही शतकांत असे काय घडले ? ज्यामुळे स्त्रीकडे बघण्याचा सामाजिक प्रवाह पालटला, याचा विचार स्त्रीवादी लोकसत्ताकार करणार का ? काळाच्या ओघात धर्माच्या नावाखाली काही अपप्रकार घडले; मात्र ‘तो म्हणजेच ‘सनातन धर्म’ असा जाणूनबुजून हेका धरून धर्माची महती नाकारणार्‍यांना काय म्हणावे ?

अशांचा वैचारिक पराभव आवश्यक !

आद्य शंकराचार्य

या महाशयांनी मदर तेरेसा यांचे खरे स्वरूप उघड करणारा ‘असंतांचे संत’ अग्रलेख लिहिला. त्यानंतर विरोधकांसमोर सपशेल लोटांगण घालून हा अग्रलेख मागे घेतला. अशांच्या पत्रकारितेविषयी आम्ही काय बोलावे ? प्रेम आणि शांती यांचे तत्त्वज्ञान झोडणार्‍यांनी दाखवलेली कट्टरता अन् असहिष्णुता पाहून त्यांच्यावर शाब्दिक प्रहार करण्याचे धारिष्ट्य लोकसत्ताकारांना का झाले नाही ? कि उपदेशाचे डोस केवळ हिंदूंनाच पाजण्याची सुपारी त्यांनी घेतली आहे ? हिंदूंच्या सहिष्णुतेचा अपलाभ उठवत त्यांना हिणवणे सोपे जाते आणि पुरोगाम्यांच्या टोळीतील स्वतःचे स्थानही अधिक बळकट करता येते. अशी एकांगी आणि हिंदुद्वेषी पत्रकारिता समाजाला घातक आहे.

‘लोकमान्य, लोकशक्ती’ असा ‘टॅग’ मिरवून ‘आम्हीच समाजाला दिशा देणारे’, अशा गुंगीत वावरणार्‍यांचा वैचारिक पराभव करण्यासाठी हिंदू काय करणार ?’, हा कळीचा प्रश्न आहे. कधी काळी सहिष्णुता हे हिंदूंचे बलस्थान होते, ती आज दुर्गुण विकृती बनली आहे. वैचारिक स्तरावर झालेला आघात योग्य वेळी परतवून लावला नाही, तर विरोधकांमध्ये अधिक बळ संचारून ते धर्माच्या मुळावर उठण्याचा प्रयत्न करतात, हा इतिहास आहे. आद्य शंकराचार्यांनी त्या काळात धर्मावर वैचारिक आघात करणार्‍यांना वाद-विवादात पराभूत करून धर्माची ध्वजा पुन्हा एकदा उंचावली होती. त्यांचाच आदर्श घेण्याची वेळ हिंदूंवर आली आहे. सनातन धर्माला डेंग्यू आणि मलेरिया म्हणणार्‍यांची एकप्रकारे तळी उचलणार्‍यांना वैध मार्गाने खडसावून हिंदुशक्तीची झलक दाखवण्याची वेळ आली आहे !