गणेशोत्सव जवळ आला की, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाने एक वाक्य सगळीकडे प्रसारित होते. ते वाक्य म्हणजे ‘खरेतर तो कुठेच जात नाही, इथेच असतो. प्रतिष्ठापना, विसर्जन हे आपल्या मनाचे खेळ ! अनादी अनंत आणि असीम अशा काळावर अधिराज्य गाजवणार्यांना आपण काय बसवणार आणि विसर्जित करणार ? श्री गणेश, महादेव ही तत्त्वे सृष्टीतील आहेत. विसर्जन माणसांचे असते, आपल्यासारख्या. तत्त्व चिरंतन असतात.’ प्रत्यक्षात हे वाक्य सावरकरांचे नसून सारंग भोईरकर यांचे आहे. वाक्य जरी चांगले आणि सावरकरांच्या विचारसरणीशी निगडित असले, तरीही ते त्यांचे स्वतःचे नाही. सावरकर काय म्हणतात, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत. (Ganeshotsav, Ganesh Chaturthi, Ganapati)
१. गणपति म्हणजे हिंदूसंघटनेची मूर्ती ! : ‘गणेशोत्सव हा प्रथमपासूनच प्रवृत्तीपर आहे. त्याचे स्वरूप सार्वजनिक आहे. त्याची अधिष्ठात्री देवताच मुळी राष्ट्रीय आहे. गणांचा जो पती तोच गणपति ! ही देवता म्हणजे वैयक्तिक मूर्ती नसून ती गणशक्तीची, राष्ट्र्रीय जीवनाची, हिंदूसंघटनेची मूर्ती आहे.’
२. राष्ट्रीय महोत्सव : ‘धूमधडाक्यासह सहस्रावधी नरनारींच्या राष्ट्रीय जयघोषात मिरवत चाललेली ती गणराजाची स्वारी ! या महोत्सवातील सारे विधिविधान, परंपरा नि प्रक्रिया सार्वजनिक, प्रवृत्तीपर आणि राष्ट्रीय आहे.’
३. गणेशाचे वेदगीत : ‘आमच्या हिंदु राष्ट्राच्या संघटनेची, तसेच गणशक्तीची परंपरागत मूर्ती म्हणजेच गणपति ! तिला आम्ही भावभराने पुजून ‘गणांना त्वां गणपतिं हवामहे ।’ हे राष्ट्रगीत, हे वेदगीत कोटी-कोटी कंठनिनादात गातो !’
– स्वातंत्र्यवीर सावरकर (किर्लोस्कर, सप्टेंबर – १९३५) (स.सा.वा., २००१, खंड – ५, पृ. ३३४)