अयोध्येतील श्रीराममंदिराच्या तळमजल्याचे काम अंतिम टप्प्यात !

अयोध्या (उत्तरप्रदेश) – येथील श्रीरामजन्मूभीवर बांधण्यात येणार्‍या भव्य श्रीराममंदिराची काही छायाचित्रे श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे सरचिटणीस श्री. चंपत राय यांनी प्रसारित केली आहेत. त्यात मंदिराच्या तळमजल्यावरील गर्भगृहाच्या मुख्य दाराचेही छायाचित्र आहे. हे दार १५ फूट उंच, तर १० फूट रुंद आहे. दाराच्या खाली कमळाचे फूल, मध्यभागी सोंड उंचावलेला हत्ती आणि वरच्या भागात स्वागत करणारी स्त्री कोरण्यात आली आहे. ३ मजली श्रीराममंदिराचा तळमजला पूर्ण होत आला आहे. तळमजला १७० खांबांवर उभा आहे. या मजल्याचे सर्व १४ दरवाजे सिद्ध करण्यात आले आहेत. न्यासाच्या म्हणण्यानुसार खांबांवर देवांच्या मूर्ती कोरल्या जात आहेत. तळमजल्याची ही सर्व कामे नोव्हेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पहिल्या मजल्याचे काम ५० टक्के पूर्ण

न्यासाच्या म्हणण्यानुसार पहिल्या मजल्यावरील ५० टक्के काम पूर्ण झाले आहे. डिसेंबरपर्यंत या मजल्याचे बांधकाम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. मंदिराच्या दरवाजासाठी लाकूड महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातून आणण्यात आले आहे.