श्रीमद्भगवद्गीतेचे गाढे अभ्यासक, तसेच सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू आणि सनातनचे १०१ वे संत ज्ञानयोगी पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांची गुणवैशिष्ट्ये उलगडणार्या ‘पू. अनंत आठवले यांचे चरित्र : खंड १ (पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये)’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन ५.१०.२०२१ या दिवशी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात करण्यात आले होते. या कार्यक्रमात श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पू. अनंत आठवले यांची त्यांना मिळणार्या ज्ञानाविषयी मुलाखत घेतली.
काल निज श्रावण कृष्ण एकादशी (१० सप्टेंबर २०२३) या दिवशी पू. अनंत आठवले यांचा ८८ वा वाढदिवस झाला. १० सप्टेंबर २०२३ या दिवशीच्या अंकात या मुलाखतीचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/718738.html
८. ज्ञान मिळत असतांना शंका येणे; पण विकल्प न येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : तुम्हाला ज्ञान मिळत असतांना त्यात संकल्प-विकल्प (नकारात्मक विचार) येतात का ? तशी अवस्था असते का ?
पू. अनंत आठवले : असे २५ – ३० वर्षांपूर्वी झाले असेल कदाचित्; पण आता नाही. एकदा तुम्हाला ब्रह्माचे स्वरूप समजले, तर विकल्प कुठून निर्माण होईल ? मला शंका आल्या; पण विकल्प आले नाहीत. मला वाटायचे, ‘गीता आणि उपनिषदे यांमध्ये भगवंताने जे सांगितले आहे, त्याचा अर्थ आपल्याला कळला नाही, तर उणीव ग्रंथांमध्ये नसून आपल्यात आहे.’ त्यामुळे जोपर्यंत आपल्याला ग्रंथ समजत नाहीत, तोपर्यंत चिंतन-मनन करून ते समजून घेतले पाहिजेत.
९. तीव्र जिज्ञासेमुळे ग्रंथ वाचत असतांना मन एकाग्र होणे आणि हीच ध्यानावस्था असल्याचे लक्षात येणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : अनेक लोक नामजप करता करता ध्यानावस्थेत जातात. तुमची ध्यानावस्था कशी असते ?
पू. अनंत आठवले : मी कधी ध्यान लावण्याचा प्रयत्न केला नाही. मी ग्रंथ वाचत असतांना तीव्र जिज्ञासेमुळे माझे मन त्यातच लागून रहायचे. ‘मन एकाग्र करणे’, म्हणजेच ध्यान असते. आपण जेव्हा एखाद्या विषयामध्ये मन एकाग्र करतो, तेव्हा आपले ध्यानच लागलेले असते.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : आम्हाला एकदा परात्पर गुरुदेवांचे ध्यानावस्थेतील छायाचित्र काढायचे होते. याविषयी मी गुरुदेवांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘तुम्ही माझे जागृतावस्थेतील ध्यानावस्थेचे छायाचित्र कसे काढाल ?’’ तेव्हा समजले की, केवळ डोळे बंद करणे, म्हणजे ध्यान नाही.
पू. अनंत आठवले : त्या स्थितीमध्ये ‘यत्र यत्र मनो याति तत्र तत्र समाधयः ।’ (चाणक्यनीति, अध्याय १३, श्लोक १२) म्हणजे ‘जेथे जेथे मन जाते, ती समाधी जाणावी.’ जेथे जेथे तुमचे मन रमते, ती समाधीच असते. जेथे आपले मन एकाग्र होते, तीच समाधी आहे. त्यामुळे वेगळे बसून ध्यान किंवा समाधी लावण्याची आवश्यकता नाही.
१०. देवता म्हणजे विविध कार्यानुरूप व्यक्त होणार्या चैतन्याची विविध नावे असणे आणि चैतन्यातून ज्ञान स्फुरत असल्याने विविध शक्ती किंवा देवता यांचे दर्शन न होणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : तुम्ही मोठमोठे ग्रंथ वाचले आहेत. आम्ही जेव्हा मोठमोठ्या ग्रंथांकडे पहातो, तेव्हा आम्हाला वाटते, ‘हे आपण कधी वाचणार ?’ तुम्हाला असे कधी वाटले नाही का किंवा समोर मोठे ग्रंथ पाहून कंटाळा आला नाही का ?
पू. अनंत आठवले : बरोबर आहे ना ? आम्हाला ईश्वराकडून ज्ञान प्राप्त होत नव्हते. तुम्हाला ईश्वराकडून ज्ञान मिळत होते. तुम्हाला ग्रंथ वाचण्याची काय आवश्यकता आहे ?
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : काही जणांना गुरुदेवांकडून ज्ञान मिळते, काहींना गणपति, श्रीकृष्ण किंवा अन्य इष्ट देवता यांच्या माध्यमातून ज्ञान मिळते. तुम्ही जेव्हा लिखाण करता, तेव्हा ‘आपल्याशी श्रीकृष्ण बोलत आहे’, असे जाणवते का किंवा एखादी इष्ट देवता तुमच्या ज्ञानाच्या प्रेरणेमागे असते का ?
पू. अनंत आठवले : तुम्हाला वाटते, तशी माझी स्थिती नाही. चैतन्य एकच आहे. जेव्हा आपण शक्तीची उपासना करतो, तेव्हा आपल्याला हनुमान आठवतो. जेव्हा चैतन्य ज्ञानाच्या स्वरूपात व्यक्त होते, तेव्हा आपण त्याला ‘सरस्वती’ किंवा ‘गणपति’ म्हणतो. विविध देवता, म्हणजे विविध कार्यानुरूप व्यक्त होणार्या चैतन्याची विविध नावे आहेत. त्यामुळे मला विविध शक्ती किंवा देवता दिसत नाहीत. मीही देवता मानतो. जेव्हा आपल्यावर संकट येते, तेव्हा हनुमान आठवतो. चैतन्य तेच असते. हनुमानाचे रूप घेऊन हेच चैतन्य आपल्याला संकटातून वाचवत असते. देवतांच्या गुणवैशिष्ट्यांमुळे त्यांची विविध नावे पडली आहेत.
११. ज्ञानामुळे बाह्य परिवर्तन होत नसून आंतरिक परिवर्तन होत असणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : आम्हाला गुरुतत्त्व, श्रीकृष्ण इत्यादींकडून ज्ञान मिळते; पण तुमचा निर्गुण ज्ञानयोग आहे. जसा साधनेचा स्तर वाढत जातो, तसा जीवनात पालट होत जातो. आपल्याही जीवनात तसे पालट झाले आहेत का ?
पू. अनंत आठवले : या संदर्भात मी कदाचित् १० – १५ वर्षांपूर्वी लिहिले आहे. तुम्ही छापलेही असेल. जेव्हा आपल्याला ज्ञान होते, तेव्हा आपल्यात बाह्यतः काही पालट घडत नाही. जसे भक्तीमार्गात लहान-मोठे चमत्कार होतात, तसे ज्ञानमार्गात होत नाहीत. ज्ञानमार्गामध्ये व्यक्तीचा इतर व्यक्ती, वस्तू, प्रसंग, घटना, परिस्थिती यांकडे पहाण्याचा दृष्टीकोन पालटतो. केवळ आपल्यात आंतरिक परिवर्तन होते. ज्ञानामुळे बाह्य परिवर्तन होत नाही.
१२. ईश्वराशी एकरूप झाल्यानंतर देवदर्शनाची आवश्यकताच न रहाणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : पू. भाऊकाका, तुम्हाला ज्ञान मिळत असतांना ‘हे आत्मज्ञान आहे’, असे कधी कळले का ?
पू. अनंत आठवले : ‘ईश्वर आणि माझ्यात काही भेद नाही’, हेच आत्मज्ञान असते. दुसरे काही नाही.
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : आत्म्याचा प्रकाश निळा असतो. तसे तुम्हाला प्रकाशाचे दर्शन झाले का ?
पू. अनंत आठवले : ‘श्रीकृष्णाने दर्शन द्यावे किंवा प्रकाश दिसावा’, असे मला वाटत नाही. तसे विचार माझ्या मनातही येत नाहीत. हे भक्तीमार्गामध्ये किंवा योगमार्गामध्ये घडते. ज्ञानमार्गामध्ये आंतरिक परिवर्तन होते. तुमची भावना तीव्र असेल, आत्मशुद्धी झालेली असेल आणि ईश्वराला ‘तुमची योग्यता आहे’, असे वाटले, तर तो त्या रूपात दर्शन देईल. दर्शन क्षणिक असते. तो कायम आपल्या समवेत रहात नाही. तुम्हाला होणारी देवतांची दर्शने खरीच असतात. तुम्हाला दर्शन देण्यासाठी चैतन्यच त्या देवतेचे रूप धारण करत असते. काही वेळानंतर ते समाप्त होते. चैतन्य माझ्यातही आहे. तेव्हा मला दुसरे दर्शन कशाला हवे ? समजा, आता श्रीकृष्णाचे दर्शन झाले, तर तुम्ही त्याच्याकडे काय मागणार आणि तो काही देईल का ? त्याच्या दर्शनाचा काय लाभ ? आपल्यात पात्रता निर्माण झाली, तर तो न मागताच दर्शन देईल.
१३. आता मनातील शंका नष्ट होऊन शांती मिळत असल्याचे जाणवणे
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ : ‘२७ वर्षांपूर्वीची तुमची विचारप्रक्रिया आणि आताची विचारप्रक्रिया’, यांमध्ये काही भेद लक्षात आला का ?
पू. अनंत आठवले : मी काय सांगू ? मला समाधान मिळते. समाधानाचा अर्थ आहे शांती ! जेव्हा आपल्या मनातील शंका नष्ट होतात, तेव्हा आपल्याला शांती मिळते.’
(समाप्त)
– श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२१)
‘आत्मस्वरूपाचे भान सदैव असणे’, हीच खरी अनुभूती आहे ! – पू. अनंत आठवले
‘पू. अनंत आठवले यांचे चरित्र : खंड १ (पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये)’ या ग्रंथाच्या प्रकाशनाचा समारंभ झाल्यानंतर श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ पू. भाऊकाकांची मुलाखत घेत होत्या. त्या वेळी उपस्थितांना फुलांच्या सूक्ष्म गंधाची अनुभूती आली. या अनुभूतीविषयी ‘तुम्हाला काही निराळे जाणवते का ?’, असे पू. भाऊकाकांना विचारले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘ज्ञानयोगामध्ये अनुभूती येत नाही, तर केवळ आंतरिक परिवर्तन होते. अनुभूती आलीच, तर ‘ईश्वर आणि तुम्ही वेगळे नाही’, ही अनुभूती येते. आत्मज्ञान मिळाल्यावर केवळ आत्मस्वरूपाचा अनुभव होतो, तीच अनुभूती आहे. आत्मस्वरूप सोडून अन्य कोणतीही गोष्ट सत्य नाही. अनुभूती खोटी नाही; पण अस्थायी आहे. आता सुगंध आला, तरी तो काहीच काळ टिकेल. त्यामुळे ही गोष्ट अस्थायी आहे. आत्मस्वरूपाचे भान सदैव असते. हीच एक खरी अनुभूती आहे आणि हीच असली पाहिजे.’’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२१)
‘पू. अनंत आठवले यांचे चरित्र : खंड १ (पू. अनंत आठवले यांची गुणवैशिष्ट्ये)’ या नूतन ग्रंथाच्या प्रकाशनाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी व्यक्त केलेले मनोगत !
‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी पू. भाऊकाकांच्या घेतलेल्या मुलाखतीतून माझ्या असे लक्षात आले की, पू. भाऊकाका संपूर्णपणे ज्ञानयोगीच आहेत. ज्ञानयोग्याला ज्ञान मिळण्यात आनंद मिळतो. त्यांना ध्यानावस्था अशी काही नसते. ‘ज्ञान मिळणे’, हीच त्यांची ध्यानावस्था किंवा ईश्वराला समजणे असते.
१. पू. भाऊकाकांसारख्या ज्ञानयोग्याला जिज्ञासेच्या माध्यमातूनच ज्ञान मिळत असणे आणि त्यामुळे त्यांच्या हातून ग्रंथलिखाणाचे कार्य होणे
या मुलाखतीच्या वेळी पू. भाऊकाकांना ‘तुम्हाला मोठमोठे ग्रंथ वाचतांना कंटाळा येत नाही का ?’, असे विचारण्यात आले. या संदर्भात असे वाटते की, ज्ञानयोग्याला जिज्ञासेच्या माध्यमातूनच ज्ञान मिळत असते. जिज्ञासा असल्याने ते ग्रंथ वाचतात आणि त्यातूनच त्यांना ज्ञान प्राप्त होते; कारण त्या माध्यमातूनच ते चिंतन करू शकतात. पू. भाऊकाकांनी एवढ्या वर्षांत अनेक ग्रंथ वाचले. त्यामुळे त्यांच्यावर ईश्वराची कृपा झालीच आहे आणि म्हणून त्यांच्या हातून एवढे ग्रंथ लिहून झाले आहेत.
२. पू. भाऊकाकांनी लिहिलेला ‘अध्यात्मशास्त्रातील विविध अनुभवांचा बोध’ हा ग्रंथ वाचत असतांना पुढचे पुढचे ज्ञान मिळत असल्याची अनुभूती येणे
पू. भाऊकाकांनी आधी ‘गीताज्ञानदर्शन’ हा ग्रंथ लिहिला. त्यानंतर एक मासापूर्वी ‘अध्यात्मशास्त्रातील विविध अनुभवांचा बोध’ हा ग्रंथ लिहिला. तेव्हा ‘त्यांनी एवढा कठीण ग्रंथ कसा काय लिहिला ?’, असे मला वाटले; परंतु तो ग्रंथ वाचतांना अतिशय सोपा असल्याचे माझ्या लक्षात आले. तो वाचत असतांना मला अनुभूती आली. ग्रंथ वाचत असतांना मलाही पुढचे पुढचे ज्ञान मिळत गेले. मला ‘त्यांनी पुढे काय लिहिले आहे ?’, हे आतूनच समजत होते. जे ज्ञान त्यांना मिळाले, तेच मलाही मिळाले.
३. सनातनचे अनेक ग्रंथ प्रकाशित करण्यामागील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा दृष्टीकोन
सनातनने अनेक ग्रंथ प्रकाशित केले आहेत आणि पुढे सहस्रो ग्रंथ होतील, एवढा मजकूर सिद्ध आहे. तेव्हा मला वाटायचे, ‘सनातनचे एवढे सारे ग्रंथ कोण वाचणार ?’ त्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले एकदा म्हणाले, ‘‘पृथ्वीवर एखादा जरी जिज्ञासू असेल, तरी त्याच्यासाठी आपल्याला ग्रंथ लिहायचेच आहेत आणि ते आपले कर्तव्य आहे.’’
४. पू. भाऊकाकांची विनम्रता !
पू. भाऊकाकांच्या ग्रंथामध्ये गीतेच्या माध्यमातून ज्ञान दिले आहे. मी दुसर्याला विवरण देत असतांना व्यावहारिक दृष्टीकोनातून देत होतो; परंतु दोघांचाही सारांश एकच आहे. असे वाटले की, पू. भाऊकाकांना ज्ञान मिळवण्याची तळमळ आहे. त्यामुळे त्यांना इतक्या वर्षांपासून ज्ञान मिळत आहे. माझ्या मते आपला ‘गुरुकृपायोग’ आहे, तर यांचा ‘शुद्ध ज्ञानयोग’ आहे. आता एवढा स्तर झाल्यावर मला थोडेफार ज्ञान मिळत असल्याची अनुभूती येते. याउलट पू. भाऊकाका ज्ञानयोगी असल्याने त्यांना आधीपासूनच एवढे ज्ञान मिळत गेले.
मी वरील सूत्र सांगितल्यावर पू. भाऊकाका म्हणाले, ‘‘मलाही थोडे थोडे ज्ञान मिळते. मी सर्वज्ञ नाही.’’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.१०.२०२१)