कोल्हापूर – पारंपरिक वाद्यांच्या गजरात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या आगमन मिरवणुकीच्या वेळी कार्यकर्ते आणि पारंपरिक वाद्ये वाजवणारे कार्यकर्ते यांच्यावर नोंद झालेले गुन्हे हे निषेधार्ह आहेत. असे झाल्यास भविष्यात तरुण पिढी पारंपरिक वाद्यांकडे वळणार नाही. यापुढेही असे गुन्हे अन्य मंडळांवरही नोंद होऊ शकतात. तरी पारंपरिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढणार्या मंडळांवरील गुन्हे मागे घ्या या मागणीसह अन्य मागण्यांचे निवेदन भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिले. या वेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव, महाराष्ट्र प्रदेश सचिव महेश जाधव, नाना कदम, गायत्री राऊत यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी करण्यात आलेल्या अन्य मागण्या
१. शहरांमध्ये रस्ते दुरुस्ती, इतर सुविधा आणि विविध विकास कामे यांकरिता ४० कोटी रुपयांचा निधी संमत करावा.
२. मनकर्णिका कुंडाचे काम भारतीय पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली चालू असून पहिल्या १ वर्षात जेवढे काम झाले, त्यानंतर पुढील २ वर्षांत १ टक्केही काम झाले नाही. तरी त्याकडे लक्ष देऊन कुंडाच्या सुशोभिकरणाचे काम तात्काळ पूर्ण करावे.
३. गरुड मंडपाचे काम त्वरित निधी संमत करून पूर्ण करावे.