धमकी देत ३५ लाख रुपये घेतले
पुणे – ‘मी मोठा पोलीस अधिकारी आहे. मोठमोठे पोलीस अधिकारी माझे मित्र आहेत’, असे खोटे सांगून महिलेसमवेत ९ वर्षे बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले. अश्लिल चित्रफित सिद्ध करून ती सामाजिक प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करू, असे सांगत तिच्याकडून ३५ लाख रुपये घेतले. याविषयी कोठेही वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. मनीष ठाकूर, सौ. हन्ना ठाकूर, संदेश ठाकूर, श्वेता ठाकूर अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पीडितेने यवत पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
मुख्य आरोपी मनीष ठाकूर याने ऑगस्ट २०१५ मध्ये महिलेला ‘मी पोलीस अधिकारी आहे’, असे खोटे सांगून ओळख वाढवली. बळजोरीने शारीरिक संबंध ठेवले. पैसे घेण्यासाठी त्याला कुटुंबियांनी साहाय्य केले. सातत्याने धमकी देत असल्याने पीडितेने तक्रार प्रविष्ट केली नव्हती. यवत पोलीस ठाण्याचे निरीक्षक हेमंत शेडगे यांनी ‘या आरोपींनी यवत आणि दौंड परिसरामध्ये अशा प्रकारे धमकी देऊन कुणाची फसवणूक केली असेल, तर त्यांनी यवत पोलिसांशी संपर्क साधावा’, असे आवाहन केले आहे.
संपादकीय भूमिका
पोलिसांचे भय नसल्याचे द्योतक ! असे गुन्हेगार निर्माण होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ? गुन्हेगारांवर वचक निर्माण होण्यासाठी पोलिसांनी कठोर प्रयत्न करणे आवश्यक ! |