श्री गणेशमूर्ती स्थापना १९ सप्टेंबर २०२३ या दिवशीच करा ! – ‘दाते पंचांग’कर्ते मोहन दाते

काही पंचांगांची गणित पद्धत भिन्न असल्यामुळे वर्षभरातील काही सणवारांमध्ये एक दिवसाची तफावत येत असते. ‘अशा वेळेस सणाच्या काही दिवस आधी लोकांमध्ये सण-उत्सवाविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम गेल्या काही वर्षांपासून केले जात आहे; पण त्याकडे दुर्लक्ष करावे. ‘धर्मसिंधु’ या ग्रंथात गणेशचतुर्थी साजरी करण्याविषयी निर्णय दिला आहे. १८ सप्टेंबर २०२३ या दिवशी तृतीया समाप्ती दुपारी १२.४० वाजता असून दुसर्‍या दिवशी, म्हणजेच १९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी समाप्ती दुपारी १३.४५ वाजता आहे.

श्री. मोहन दाते

१९ सप्टेंबर २०२३ या दिवशी चतुर्थी संपूर्ण मध्यान्हव्यापिनी असल्याने आणि मंगळवार असल्याने या दिवशी पंचांगात दिलेली श्री गणेशचतुर्थी योग्यच आहे. (यापूर्वी २६.८.१९९८ या दिवशी अशीच परिस्थिती असतांना याच पद्धतीने निर्णय केलेला होता.)

श्रुंगेरीच्या शंकराचार्यांनी प्रत्यक्ष भेटीत आणि पू. गणेश्‍वर द्रविडशास्त्री यांनी ‘पंचांगविषयक मतमतांतरे रहाणार आहेत; म्हणून आपण जे पंचांग नेहमी वापरत आहात त्याप्रमाणे आचरण करावे’, असे सांगितलेले आहे. आपण दाते पंचांग गेली अनेक वर्षे वापरत आहात, तेव्हा अचूक गणित आणि धर्मशास्त्रीय निर्णय असलेल्या दाते पंचांगाप्रमाणे अन्य अनेक पंचांगांमध्ये दिल्याप्रमाणे मंगळवार, १९ सप्टेंबर या दिवशी ‘अंगारक योगा’वर गणपतीची स्थापना करणे योग्य होईल.