आजपासून जवळपास ५ सहस्र वर्षांपूर्वी या पृथ्वीतलावर एक अतिशय अलौकिक अदभूत घटना घडली ! धर्म, न्याय आणि नीती यांसाठी साक्षात् पूर्णावताराने या भारतवर्षामध्ये जन्म घेतला ! निर्गुण, निराकार अशा या शक्तीने वसुदेव-देवकीचा आठवा पुत्र म्हणून समस्त भारतियांच्या हृदयसिंहासनावर राज्य केले ! खरे तर ‘काळापुढे प्रत्येक वस्तू निष्प्रभ ठरते’, असे म्हटले जाते; परंतु आजही अद्भूत ‘श्रीकृष्ण चरित्रा’पुढे काळाचा पुरुषार्थ विराम पावला आहे ! आजही समस्त भारतवर्षावर श्रीकृष्णाचे साम्राज्य चालत आहे ! कथा-कीर्तनकार, बुद्धिमानी, तत्त्वज्ञानी कृष्णलीलांचे वर्णन करतांना थकतच नाहीत. नारद, शुकदेव यांच्यासारखे महान मुनीही त्याच्या लीलांचे वर्णन करतांना तल्लीन होतात, अशी त्याची मोहिनी आहे ! त्याची भूमी आज पूजनीय झाली आहे !
स्वाध्याय परिवारचे प्रणेते पूजनीय पांडुरंगशास्त्री आठवले यांनी समग्र गीतेच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि प्रसार स्वाध्याय परिवाराच्या माध्यमातून केला. जगभरामध्ये कृष्णाचे तत्त्वज्ञान, कृष्णाचे जीवनदर्शन, वैदिक संस्कृतीचे महात्म्य वेगवेगळ्या प्रयोगांद्वारे सर्वसामान्य जनतेला पचेल, रुचेल, समजेल अशा भाषेमध्ये सांगितले. ‘डीबीटी’ म्हणजे ‘डिव्हाईन ब्रेन ट्रस्ट’च्या माध्यमातून आज लाखोंच्या संख्येने युवक देश-विदेशांत सृजनात्मक सांस्कृतिक कार्य करत आहेत. स्वाध्याय परिवाराच्या आदरणीय दीदींच्या मार्गदर्शनाखाली युवक श्रीकृष्ण जयंती एका वैचारिक दृष्टीकोनातून साजरी करतात. ‘फॅशन’च्या आहारी गेलेली युवा पिढी, राजकारणाचा खालावलेला स्तर यांविषयी या वर्षीही पथनाट्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार आहे. हे पथनाट्य सादर करणारे २० सहस्रांहून अधिक गट निर्माण करण्यात आले आहेत. या माध्यमातून गीतेच्या तत्त्वज्ञानाचा आणि वैदिक संस्कृतीचाही प्रसार होणार आहे.
– अनिल दत्तात्रेय साखरे, कोपरी, ठाणे पूर्व.