मुंबई – अदिवासी युवक विविध कसरतीचे खेळ खेळतात. या खेळांमधील काही खेळांचा समावेश क्रीडा विभागाच्या स्पर्धेत करण्यात आला आहे. आणखी काही राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळांशी सुसंगत खेळांचा समावेश क्रीडा स्पर्धेत करण्यात येणार असल्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले. मंत्रालयात आयोजित क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या विविध योजनांचा आढावा घेतांना ते बोलत होते. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवळ, क्रीडा विभागाचे उपसचिव सुनील हंजे, सहसंचालक सुधीर मोरे आदी उपस्थित होते. या वेळी त्यांनी क्रीडा आणि युवक कल्याण विभागाच्या सर्व योजनांचा सविस्तर आढावा घेतला. मंत्री बनसोडे पुढे म्हणाले की,
१. खेळाडूंना केंद्रस्थानी मानून क्रीडा विभागाचे निर्णय घेण्यात येत आहेत. सर्वसामान्य, होतकरू आणि गरीब कुटुंबातील खेळाडूंना शासकीय योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यासाठी सराव आणि स्पर्धेसाठी त्यांना आवश्यक ते साहाय्य करण्यात येणार आहे.
२. राज्यातील तालुका, जिल्हा आणि विभागीय स्तरावरील विविध क्रीडा संकुलांची बांधकामे चालू असून ती दर्जेदार करून घेण्यासाठी संबंधित अधिकार्यांनी दक्ष रहावे. कामे नियोजित वेळेत पूर्ण करून घ्यावीत. खेळाडूंना सरावासाठी देण्यात येणारा निधी अल्प पडणार नाही आणि तो वेळेत मिळेल, याकडे लक्ष द्यावे.
३. विभागाकडे निधीविषयी संमतीसाठी प्रस्ताव असतील, तर ते सादर करावेत. नवीन योजना आणण्यासाठी आणि खेळाडूंची बाजू समजून घेण्यासाठी अनुभवी व्यक्तींचे मार्गदर्शन घ्यावे.
४. आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ चालू करण्यासाठी प्रयत्न चालू आहेत. कुलगुरूंची नेमणूक करण्यात आली आहे. आरंभी साधनसामुग्री असलेल्या ठिकाणी विद्यापीठ चालू करावे. इमारतीसह पायाभूत सुविधा ज्या ठिकाणी उपलब्ध होतील, त्या ठिकाणी स्वतंत्र्यरित्या विद्यापीठ चालू करण्यात येणार आहे.