वाशी आणि तुर्भे येथे मोठ्या प्रमाणात लावलेले विज्ञापनांचे फलक अनधिकृत !

  • अतिक्रमणविरोधी पथकाचे अधिकारी आणि कर्मचारी, तसेच महानगरपालिकेतील संबंधित यांच्‍या उदासीनतेचा परिणाम !

  • महानगरपालिकेच्‍या लाखो रुपयांची हानी !

रस्‍त्‍यावर लावलेला अनधिकृत विज्ञापन फलक

नवी मुंबई, २९ ऑगस्‍ट (वार्ता.) – येथील महानगरपालिकेच्‍या वाशी आणि तुर्भे विभागात मोठ्या प्रमाणात अनधिकृत विज्ञापन फलक लावण्‍यात येत आहेत. यामुळे महानगरपालिकेचा लाखो रुपयांचा महसूल प्रतिवर्षी बुडतो; मात्र तरीही महापालिका प्रशासन त्‍याकडे कानाडोळा करते.

राजकीय लोकांच्‍या विज्ञापन फलकांवर कारवाई होत नसल्‍याने नोकर्‍या देणारी आस्‍थापने, तसेच वाणिज्‍य आस्‍थापने त्‍यांच्‍या उत्‍पादनाचे विज्ञापन करतात. या प्रकरणी संबंधित विभाग कार्यालयातील वरिष्‍ठ लिपिक किंवा अधीक्षक यांनी यावर गुन्‍हे नोंद करण्‍याची किंवा दंडात्‍मक कारवाई करण्‍याचे प्रावधान आहेे; मात्र अतिक्रमण विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात. ‘कर्तव्‍यात कसूर केल्‍याप्रकरणी आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी उपायुक्‍तसह सर्व संबंधितांवर कारणे दाखवा नोटीस बजावून कारवाई करावी’, अशी मागणी नागरिक करत आहेत. (अशी मागणी का करावी लागते ? आयुक्‍त स्‍वतः कारवाई का करत नाहीत ? – संपादक)