उमदी (जिल्हा सांगली) येथील आश्रमशाळेत अनेक विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा !

अनेक  विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा

सांगली – जत तालुक्यातील उमदी येथील समता अनुदानित आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना २७ ऑगस्टला रात्री ८ वाजता एका कार्यक्रमातील शिल्लक राहिलेले भोजन देण्यात आले. रात्री १० वाजेनंतर काही विद्यार्थ्यांना चक्कर येणे, मळमळणे, उलट्या, जुलाब अशी लक्षणे दिसू लागली. तातडीने या विद्यार्थ्यांना रुग्णवाहिका आणि खासगी वाहने यांमधून विविध रुग्णालयांत भरती करण्यात आले. भरती केलेल्या विद्यार्थ्यांवर उपचार चालू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.

(आश्रमशाळेत आलेले भोजन कुठून आले होते ? आणि त्याची स्थिती कशी होती ? याची पडताळणी आश्रमव्यवस्थापनाने केली होती का ? – संपादक)

जिल्हाधिकार्‍यांनी या घटनेची माहिती घेतली असून विद्यार्थ्यांच्या उपचारांत कुठलीही उणीव राहू नये, अशा दृष्टीने त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सकांना सूचना दिली आहे. यासह सदर घटनेची संपूर्ण चौकशी करून २४ घंट्याच्या आत अहवाल सादर करण्याची आणि दोषींवर कारवाई करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांनी समाजकल्याण विभागाच्या साहाय्यक आयुक्तांना दिली आहे.