वाढते प्रदूषण, पर्यावरणाचा र्हास, ग्लोबल वॉर्मिंग (जागतिक तापमान वाढ) आदींमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्याचे आव्हान आपल्यापुढे उभे आहे. पर्यावरणाची हानी रोखण्यासाठी ‘पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यात यावा’, असा आग्रह गेल्या काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्था, शासकीय विभाग करतांना दिसतात. गणेशमूर्ती पर्यावरणपूरक करण्यासाठी कागदाच्या लगद्याचा वापर करण्याचे आवाहन केले जाते. ‘प्रत्यक्षात कागदाच्या मूर्ती पर्यावरणपूरक नसून उलट त्यामुळे पाण्यातील प्रदूषण वाढते’, असे संशोधनाअंती पुढे आले आहे; परंतु यातच भर म्हणून कि काय, आता ‘कोकोपीट’ आणि माती यांचे मिश्रण करून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती सिद्ध करण्याचा प्रयोग एका व्यक्तीने केला आहे. धर्माविषयी अज्ञान असलेले त्याला प्रतिसाद देत आहेत.
काय आहे हे ‘कोकोपीट ?’ ‘कोकोपीट’ हा नारळाचा भुसा आहे. तो नारळाच्या तंतुमय करवंटीचा चुरा करून सिद्ध केलेला एक प्रकारचा कृत्रिम पोषक घटक आहे. तो सामान्यपणे जळाऊ म्हणून वापरला जातो किंवा कचर्यात टाकला जातो. ज्याप्रमाणे पर्यावरणाचे संतुलन राखणे, हे आपले दायित्व आहे; त्याचप्रमाणे गणेशोत्सवाचे पावित्र्य टिकवून ठेवणे, हेही आपले त्याहीपेक्षा अधिक परमकर्तव्य आहे. गणेशोत्सव हा आपल्या परंपरेचा आणि संस्कृतीचा ठेवा आहे. तो साजरा करतांना धर्माने घालून दिलेले मापदंड झुगारून दिल्यास पावित्र्य टिकणे संभव आहे का ? श्री गणेशाची मूर्ती जर मूर्तीशास्त्रानुसार योग्य प्रकारे सिद्ध केली असेल, तरच भाविकांना त्यातील चैतन्याचा पुरेपूर लाभ होऊ शकतो. धर्मशास्त्रानुसार शाडूच्या मातीची श्री गणेशमूर्ती असल्यास तिच्या पूजनानंतर भक्तांना अधिक प्रमाणात गणेशतत्त्व ग्रहण होऊन चैतन्य प्राप्त करता येते. शाडूच्या मातीच्या मूर्तीचे विसर्जनही नैसर्गिक स्रोतांमध्ये केल्यास पर्यावरणाला किंचितही धोका निर्माण होत नाही. असे असतांना पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या नावाखाली हिंदूंच्या धर्मशास्त्रावर आक्षेप का ? वर्षभर नद्यांमध्ये रसायने आणि सांडपाणी सोडल्याने प्रदूषण वाढून जलजीवही मृत्यूमुखी पडतात; मात्र केवळ गणेशोत्सवाच्या कालावधीतच पर्यावरणाला धोका संभवतो हे कसे ? गणेशोत्सवाचा खरा उद्देश सफल आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी धर्मशास्त्रानुसार गणेशोत्सव साजरा करणे आवश्यक आहे.
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.