केंद्रीय दक्षता आयोगाकडे वर्ष २०२२ मध्ये भ्रष्टाचाराच्या १ लाख १५ सहस्र तक्रारी

गृहमंत्रालयातील कर्मचार्‍यांविरुद्ध सर्वाधिक ४६ सहस्र तक्रारी !

नवी देहली – केंद्रीय दक्षता आयोगाने केंद्र सरकारच्या सर्वाधिक भ्रष्ट कर्मचार्‍यांचा वर्ष २०२२ चा अहवाल घोषित केला आहे. केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांविरुद्ध एकूण १ लाख १५ सहस्र २०३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक ४६ सहस्र ६४३ तक्रारी गृह मंत्रालयाच्या होत्या. यामध्ये केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचार्‍यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या सर्वाधिक ४६ सहस्र तक्रारी प्राप्त झाल्याचे म्हटले आहे. तसेच रेेल्वे दुसर्‍या, तर बँकिंग क्षेत्र तिसर्‍या क्रमांकावर आहे.

१. एकूण तक्रारींपैकी ८५ सहस्र ४३७ तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली आहे, तर २९ सहस्र ७६६ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. यांपैकी २२ सहस्र ३४ तक्रारींचे ३ मासांहून अधिक काळ निराकरण झालेले नाही. भ्रष्टाचाराची तक्रार आल्यावर केंद्रीय दक्षता आयोग मुख्य दक्षता अधिकार्‍याची नियुक्ती करते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ३ मासांचा कालावधी दिला जातो.

केंद्र सरकारच्या सर्वाधिक भ्रष्ट कर्मचार्‍यांचा वर्ष २०२२ चा अहवाल –

२. या अहवालानुसार रेल्वे कर्मचार्‍यांच्या विरोधात १० सहस्र ५८०, तर बँक कर्मचार्‍यांच्या विरोधात ८ सहस्र १२९ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

देहलीच्या सरकारी कर्मचार्‍यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या ७ सहस्र तक्रारी

वर्ष २०२२ मध्ये देहली सरकारी कर्मचार्‍यांच्या विरोधात भ्रष्टाचाराच्या ७ सहस्र ३७० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यांपैकी ६ सहस्र ८०४ तक्रारी निकाली निघाल्या आहेत. ५६६ तक्रारी अद्याप प्रलंबित असून त्यांपैकी १८ तक्रारी ३ मासांहून अधिक जुन्या आहेत.

संपादकीय भूमिका 

देशात एका वर्षांत भ्रष्टाचाराच्या १ लाखाहून अधिक तक्रारी येतात, यावरून तक्रारी न येण्याचे प्रमाण किती असणार आणि देशात भ्रष्टाचार किती प्रमाणात होत असणार, हे लक्षात येते !