राजापूर – पर्यटनदृष्ट्या विकास आणि सोयी-सुविधांच्या उभारणीच्या अनुषंगाने आमदार डॉ. राजन साळवी यांच्या मागणीनुसार राज्याच्या पर्यटन विभागाचे सचिव हनुमंत हेडे, उपअभियंता ऋषीकेश नारकर यांनी राजापूर शहरानजीकच्या उन्हाळे येथील गंगातीर्थक्षेत्रासह गरम पाण्याचा झरा या ठिकाणी भेट दिली. या वेळी स्थानिक ग्रामस्थ आणि ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्यांशी चर्चा केल्यानंतर गरम पाण्याच्या झर्याच्या ठिकाणी संरक्षण भिंत आणि कपडे पालटण्याची खोली (चेजिंग रूम) उभारणीसाठी तात्काळ निधी देण्याचे आश्वासित केले.
या वेळी त्यांनी आमदार डॉ. साळवी यांच्या उपस्थितीमध्ये पर्यटन निधीअंतर्गंत गंगातीर्थ विकासासाठी उपलब्ध झालेल्या निधीच्या विनियोगासंबंधित बांधकाम विभागाच्या अधिकार्यांशी सविस्तर चर्चाही केली. या वेळी उन्हाळे येथील ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष शिवसेनेचे विधानसभा समन्वयक प्रकाश कुवळेकर, तालुकाप्रमुख कमलाकर कदम, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष रामचंद्र बाईत, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. रखडलेली विकासकामे तात्काळ होण्याच्या अनुषंगाने योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना बांधकाम विभागाला या वेळी देण्यात आल्या.