‘हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी गुरुकृपायोगानुसार साधना करून अल्पावधीत आध्यात्मिक उन्नती साध्य केली. हिंदु राष्ट्र-स्थापनेसाठी ते हिंदूसंघटन अन् धर्मजागृती यांचे कार्य करत आहेत. श्रावण शुक्ल प्रतिपदा (१७.८.२०२३) या दिवशी त्यांचा ५६ वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त त्यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्यांचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढील लेखात दिले आहे.
सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या चरणी वाढदिवसानिमित्त कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सामान्य माहिती
अ. जन्मदिनांक : ६.८.१९६७
आ. जन्मवेळ : सकाळी ९.३७ वा.
इ. जन्मस्थळ : बुलढाणा, महाराष्ट्र
२. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे व्यक्तीमत्त्व दर्शवणारे घटक
अ. लग्नरास (कुंडलीतील प्रथम स्थानातील रास) : कुंडलीत प्रथम स्थानात ‘कन्या’ रास आहे. कन्या रास प्रथम स्थानी असल्यास व्यक्ती अभ्यासक प्रवृत्तीची असते. मनन, चिंतन, विश्लेषण, चिकित्सा करणे इत्यादी वैशिष्ट्ये तिच्यात मूलतः असतात. व्यक्ती बौद्धिकदृष्ट्या प्रगल्भ असते, तसेच तिच्यात तर्कशक्ती, ज्ञानप्राप्तीची तळमळ, विवेकशक्ती इत्यादी वैशिष्ट्ये असतात. अशा कुंडलीत बुध (बुद्धी) आणि गुरु (ज्ञान) हे ग्रह प्रभावी असतात.
आ. जन्मरास (कुंडलीतील चंद्राची रास) : कुंडलीत चंद्र ‘कर्क’ राशीत आहे. या राशीत निर्मितीक्षमता, प्रेमभाव, परिस्थितीशी जुळवून घेणे, कर्तव्यदक्षता इत्यादी वैशिष्ट्ये आहेत. कर्क राशीच्या व्यक्ती प्रसंगी सौम्य, तर प्रसंगी कठोर होतात. कर्क राशीत नेतृत्वगुण, संघटनकुशलता, समयसूचकता इत्यादी समष्टीशी संबंधित वैशिष्ट्ये आहेत.
३. सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या जन्मकुंडलीतील आध्यात्मिक वैशिष्ट्ये
३ अ. सात्त्विक व्यक्तीमत्त्व दर्शवणारी गुरु आणि चंद्र यांची युती : सद़्गुरु डॉ. पिंगळे यांच्या कुंडलीत गुरु आणि चंद्र यांची युती आहे. गुरु ग्रह सत्त्वगुणाचा कारक असल्याने ही युती सात्त्विकता दर्शवते. ही युती असल्यास व्यक्तीत नम्रता, साधेपणा, प्रेमभाव, साधक-बाधक विचार करण्याची क्षमता, इतरांचा विचार करणे आदी गुण असतात. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांचे व्यक्तीमत्त्व मुळात सात्त्विक आहे. त्यांच्यामध्ये ‘नम्रता’ हा गुण विशेषत्वाने आहे. ते ‘कान-नाक-घसा तज्ञ’ असूनही तशी श्रेष्ठत्वाची भावना साधकांना कधी जाणवली नाही. त्यांच्या देहबोलीतूनही नम्रता आणि सात्त्विकता दिसून येते. त्यांच्या या वैशिष्ट्यामुळे हिंदुत्वनिष्ठ, मान्यवर, साधक आदी त्यांच्याकडे आकर्षित होतात अन् कार्याशी जोडले जातात.
३ आ. ज्ञानमार्ग दर्शवणारी रवि आणि गुरु यांची युती : कुंडलीत रवि आणि गुरु यांची युती आहे. हा योग असल्यास व्यक्तीत विवेक, तर्कशक्ती, स्वयंशिस्त, गांभीर्य आदी दुर्लभ गुण असतात. रवि ग्रह तेजाचा आणि गुरु ग्रह ज्ञानाचा कारक आहे. हे दोन ग्रह एकत्र आल्यावर ज्ञानाचा उदय होतो. व्यक्तीला आत्मज्ञान प्राप्त करण्याची ओढ लागते. त्यादृष्टीने प्रयत्न होऊन वाचन, मनन आणि चिंतन यांद्वारे अध्यात्माचे ज्ञान प्राप्त होते. रवि आणि गुरु यांची युती ज्ञानमार्गाची दर्शक आहे. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांची मूळ प्रकृती ज्ञानमार्गाला पूरक आहे. विवेक, वैराग्य, अंतर्मुखता आदी ज्ञानमार्गियांची लक्षणे त्यांच्या व्यक्तीमत्त्वात जाणवतात.
३ आ १. ज्ञानयोगाला भक्ती आणि कर्म यांची जोड देणे : सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांची मूळ प्रकृती ज्ञानयोगाला पूरक असली, तरी त्यांनी क्रियमाण कर्म वापरून त्यांच्या साधनेला भक्ती आणि कर्म यांची जोड दिली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी सांगितलेल्या गुरुकृपायोगात ज्ञान, भक्ती आणि कर्म या तिन्ही योगमार्गांचा समन्वय आहे.
सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका म्हणतात, ‘‘माझा श्वास, हृदयाचे स्पंदन, नाडीचे ठोके, मनातील विचार, बुद्धीचे विश्लेषण, घडणारे कर्म या सर्वांचे कर्ते केवळ परात्पर गुरु डॉक्टरच आहेत’, हा भाव परात्पर गुरु डॉक्टरांनी माझ्या मनात जागृत केला आहे. हीच त्यांची माझ्यावरील असीम कृपा आहे.’’ सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांनी गुरुचरणी संपूर्णपणे समर्पित होऊन ‘भक्तीयोग’ साधला, तर गुरूंनी सांगितल्याप्रमाणे विविध स्वरूपाच्या समष्टी सेवा कर्तेपणाविरहित करून ‘कर्मयोग’ साधला. गुरुकृपायोगाविषयी सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका म्हणतात, ‘‘परात्पर गुरु डॉक्टरांचे अवयव म्हणजे एकेका योगाचे प्रतीक आहेत. त्या सर्वांचा संगम म्हणजे अखंड गुरुकृपा आणि गुरुकृपायोग होय.’’
४. आध्यात्मिक त्रासावर मात करणे
कुंडलीत मंगळ आणि केतू यांची द्वितीय स्थानात युती आहे. ही युती जीवनात अनपेक्षित घटना, अपघाती प्रसंग आदी दर्शवते, तसेच ही युती आध्यात्मिक त्रासाशी संबंधित आहे. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांना आरंभी अनिष्ट शक्तींचा त्रास होता; परंतु त्यांनी साधनेद्वारे आध्यात्मिक त्रासावर मात केली.
५. आध्यात्मिक स्तरावरील जीवन दर्शवणारा गुरु आणि शनि यांचा शुभयोग
कुंडलीतील गुरु आणि शनि यांचा नवपंचमयोग (शुभयोग) आहे. गुरु आणि शनि हे दोन्ही आध्यात्मिक स्वरूपाचे ग्रह आहेत. त्यामुळे त्यांच्यात शुभयोग असल्यास व्यक्तीचे जीवन आध्यात्मिक स्तरावरील असते. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका आरंभीपासून मायेपासून अलिप्त आहेत. ‘कान-नाक-घसा तज्ञ’ ही प्रतिष्ठेची उपजीविका असतांनाही सनातन संस्थेच्या संपर्कात आल्यानंतर अवघ्या ३ वर्षांतच त्यांनी पूर्णवेळ साधनेला आरंभ केला. ते त्यांच्या कुटुंबियांना आध्यात्मिक स्तरावर हाताळत. साधनेसाठी कुटुंबियांचे साहाय्य लाभल्याविषयी त्यांच्या मनात कुटुंबियांप्रती कृतज्ञताभाव आहे.
६. धर्मजागृतीचे कार्य करण्याची क्षमता दर्शवणारी रवि, चंद्र आणि गुरु यांची युती
कुंडलीत रवि, चंद्र आणि गुरु यांची युती ११ व्या स्थानात आहे. ही युती धर्मजागृतीचे कार्य तसेच समाजाला साधनेविषयी मार्गदर्शन करण्याची क्षमता दर्शवते. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका ‘हिंदु राष्ट्रा’च्या स्थापनेसाठी कार्य करणार्या हिंदुत्वनिष्ठांचे दिशादर्शन करत आहेत. ‘हिंदु राष्ट्र’ ही केवळ भावनांवर आधारित संकल्पना नसून ईश्वरी अधिष्ठान असलेली आध्यात्मिक संकल्पना आहे. ‘हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात सहभागी असलेल्या हिंदुत्वनिष्ठांनी साधना म्हणून हे कार्य कसे करायला हवे ?’, याविषयी सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका त्यांना मार्गदर्शन करतात. त्यामुळे सर्वत्रच्या हिंदुत्वनिष्ठांचे ते आधारस्तंभ आहेत. सर्व हिंदुत्वनिष्ठांना सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका पितृतुल्य वाटतात. प्रतिवर्षी गोवा येथे होणारे ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या मार्गदर्शनाखाली पार पडते.
७. सारांश
सद़्गुरु डॉ. पिंगळेकाकांच्या कुंडलीत अध्यात्माला पूरक असे योग आहेत. त्यामुळे त्यांना जन्मतः आध्यात्मिक प्रगल्भता लाभली. त्याचा लाभ करून घेऊन त्यांनी अध्यात्मातील पुढील वाटचाल करून गुरुकृपा प्राप्त केली. त्यांनी ज्ञानयोगाला भक्ती आणि कर्म यांची जोड दिली. त्यामुळे त्यांच्यात व्यापकता येऊन ते समष्टीशी एकरूप झाले. ‘धर्मशिक्षण देणे’ ही काळाची आवश्यकता आहे. सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका समाजाला धर्मशिक्षण देत आहेत. हिंदु राष्ट्र-स्थापनेच्या कार्यात त्यांचे मोठे योगदान आहे. भविष्यातही सद़्गुरु डॉ. पिंगळेकाका हे समाजाला धर्माचा मार्ग दाखवण्याचे महान कार्य करतील.’
कृतज्ञता : सद़्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांच्या जन्मकुंडलीचे विश्लेषण करण्याची संधी मिळाली, याविषयी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्री. यशवंत कणगलेकर (ज्योतिष विशारद) आणि श्री. राज कर्वे (ज्योतिष विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.६.२०२३)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |