नवी मुंबईतील अनधिकृत शाळांच्‍या संचालकांवर अद्याप गुन्‍हे नोंद नाहीत !

नवी मुंबई, १० ऑगस्‍ट (वार्ता.) – नवी मुंबई महापालिकेच्‍या क्षेत्रातील ४ अनधिकृत शाळांच्‍या संचालकांवर फौजदारी गुन्‍हे नोंद करण्‍यात यावेत, असे आदेश महापालिकेचे आयुक्‍त राजेश नार्वेकर यांनी दिले होते; मात्र हे आदेश देऊन १५ दिवस झाले, तरी पोलिसांनी अद्याप एकाही शाळेच्‍या संचालकांवर फौजदारी गुन्‍हा नोंद केला नाही. या संदर्भात महानगरपालिकेच्‍या शिक्षणाधिकारी अरुणा यादव यांनी स्‍थानिक पोलीस ठाण्‍यात तक्रार नोंद केली आहे. शाळांना वारंवार नोटिसा देऊनही शाळांचे संचालक गांभीर्याने घेत नसल्‍याचे आढळून आले आहे.

नवी मुंबईमध्‍ये सी.बी.डी. सेक्‍टर ८ बी येथील ‘इस्‍माइल एज्‍युकेशन ट्रस्‍ट’ची अल मोमीन स्‍कूल, नेरूळ सेक्‍टर २७ येथील इकरा ईस्‍लामिक स्‍कूल, सीवूड सेक्‍टर ४० येथील द ऑर्चिड इंटरनॅशनल स्‍कुल, रबाळे आंबेडकर नगर येथील इलिम इंग्‍लिश स्‍कुल या ४ अनधिकृत शाळा असल्‍याचे शिक्षण विभागाने घोषित केले आहे.

संपादकीय भूमिका

अनधिकृत शाळांवर कारवाई न करणार्‍या पोलीस प्रशासनाला जाब कोण विचारणार ?