विरोधी पक्षनेत्याकडून पुराव्याचा ‘पेनड्राईव्ह’ सादर !
मुंबई, ४ ऑगस्ट (वार्ता.) – समाजकल्याण विभागात स्थानांतरासाठी प्रत्येकाकडून ४० लाख रुपये घेतले जातात. समाजकल्याण विभागाच्या एका महिला उपायुक्तांचे याविषयीचे १५ मिनिटांचे ध्वनीमुद्रण उपलब्ध असून त्यामध्ये मुख्यमंत्र्यांचेही नाव आहे. याची सत्यता पडताळून कारवाई करण्याची मागणी करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याविषयी ध्वनीमुद्रण असलेला ‘पेनड्राईव्ह’ अध्यक्षांकडे सादर केला. विधानसभेत ४ ऑगस्ट या दिवशी अंतिम आठवडा चर्चेमध्ये ते बोलत होते.
या प्रकरणात महिला अधिकारी सरकारची अपकीर्ती करत असेल, तर त्यांना निलंबित करण्यात यावे. या ध्वनीमुद्रणात राज्यातील एका निवासी आश्रमशाळेतील मुलींचे शोषण होत येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलींचे शोषण करणार्या अधिकार्याचे नावही त्यात देण्यात आले आहे. या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या वेळी केली.