चीनचे ‘न्‍युरो वॉरफेअर’ (मानसिक युद्ध) आणि त्‍याचा भारतावरील परिणाम !

सौजन्य . Oneindia English

१. ‘न्‍युरो वॉरफेअर’ म्‍हणजे काय ?

‘चीन हा भारत, अमेरिका आणि पाश्‍चात्त्य देश यांच्‍या विरुद्ध एक ‘मल्‍टी डोमेन वॉर’ (विविध क्षेत्रांमधील युद्ध) लढत आहे. ज्‍याला ‘अनिर्बंध युद्ध’ (अनरिस्‍ट्रिक्‍टेड वॉर) असेही म्‍हटले जाते. युद्ध चालू नसतांना शांतता काळात आपल्‍या प्रतिस्‍पर्धी देशांना ‘आपण लढाई हरलो. आपण चीनशी लढू शकत नाही. चीन फार शक्‍तीशाली आहे. त्‍यामुळे आपण चीनचे ऐकले पाहिजे, असे वाटण्‍यास भाग पाडायचे’, हा या ‘न्‍युरो वॉरफेअर’ चा उद्देश असतो. हे एक मानसिक युद्धही आहे. चीनच्‍या मानसिक युद्धाचा अनुभव भारताने गलवान युद्धाच्‍या वेळी घेतला आहे. त्‍या वेळी ‘गलवानमध्‍ये चीनचे बळ पुष्‍कळ आहे. चीनकडे पुष्‍कळ शस्‍त्रे आहेत. त्‍यांचे ५० ते ६० सहस्र सैनिक सीमेवर आले आहेत. त्‍यांची हेलिकॉप्‍टर्स आणि विमानेही तेथे आहेत. चीन भारताहून वरचढ आहे’, असे सांगण्‍यात येत होते; पण चीनला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी भारताचीही सिद्धता आहे, असे सांगितले जात नव्‍हते. अर्थात् या मानसिक युद्धाचा परिणाम भारताचे राजकीय नेतृत्‍व आणि सैन्‍य यांच्‍यावर झाला नाही; पण आपल्‍या प्रसिद्धी माध्‍यमांवर निश्‍चित झाला. त्‍यामुळे माध्‍यमांमध्‍ये ‘चीन भारताहून वरचढ आहे’, अशा प्रकारचे लेख प्रकाशित झाले होते.

आता चीनने नवीन युद्ध चालू केले आहे. हे ‘न्‍युरोलॉजिकल वेपन्‍स’च्‍या (व्‍यक्‍तीच्‍या मेंदूवर प्रयोग करून सूक्ष्म किरणांद्वारे त्‍याची विचारसरणी पालटणे) साहाय्‍याने जग किंवा भारत यांच्‍या विरुद्ध लढण्‍याचे युद्ध आहे. शास्‍त्रज्ञ व्‍यक्‍तीच्‍या मेंदूवर प्रयोग करून त्‍याची विचारसरणी पालटण्‍याचे प्रयोग करतात. त्‍याप्रमाणे व्‍यक्‍तीच्‍या मेंदूवर परिणाम करणारी प्रकाशाची सूक्ष्म किरणे (लाईट रेडियशन्‍स) सोडली जातात. त्‍या माध्‍यमातून संबंधित व्‍यक्‍तीची विचारसरणी पालटली जाते. त्‍यासाठी व्‍यक्‍तीच्‍या संपर्कात येण्‍याची आवश्‍यकता नसते. चीनने अशा प्रकारची काही शस्‍त्रे विकसित केली आहेत. त्‍याला ‘न्‍युरो वेपन्‍स’ (मेंदूच्‍या विरुद्ध वापरली जाणारी शस्‍त्रे) असे म्‍हटले जाते.

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

२. ‘न्‍युरो वॉरफेअर’चा उद्देश आणि त्‍याचे परिणाम

चीनची ‘पीपल्‍स लिबरेशन आर्मी’ अशा प्रकारच्‍या उच्‍च तंत्रज्ञानाची शस्‍त्रे सिद्ध करत आहे. कुठल्‍याही एका महत्त्वाच्‍या व्‍यक्‍तीच्‍या मेंदूवर परिणाम करण्‍याचे काम हे शस्‍त्र करू शकतील. चीन हा विरोधी देशांचे राजकीय नेते, नोकरशहा, सैन्‍याचे प्रमुख आदी महत्त्वाच्‍या लोकांच्‍या विरोधात ही शस्‍त्रे वापरू शकतो. त्‍यांच्‍या मनावर परिणाम केला, तर ते चीनशी लढाई करण्‍यास घाबरतील आणि लढण्‍यापूर्वीच चीन ही लढाई जिंकू शकेल. ही शस्‍त्रे थोड्या काळासाठी वापरता येतात. ज्‍याच्‍या मेंदूवर या शस्‍त्राचा वापर करण्‍यात येतो, त्‍याच्‍या मेंदूवर परिणाम होतो. विशिष्‍ट बंदुकीच्‍या माध्‍यमातून व्‍यक्‍तीच्‍या मेंदूवर किरण सोडले, तर त्‍याच्‍या मेंदूवर परिणाम होऊ शकतो.

चिनी कम्‍युनिस्‍ट (साम्‍यवादी) पक्ष आणि चीनचे सैन्‍य ही शस्‍त्रे विकसित करत आहे. यावर नुकताच १२ पानांचा एक अहवाल सिद्ध करण्‍यात आला आहे. ‘इन्‍युमरेटींग टार्गेटींग अँड कोल्‍याप्‍सिंग चायनीज कम्‍युनिस्‍ट पार्टीज न्‍युरोस्‍ट्राईक प्रोग्रॅम’ हे जे मेंदूच्‍या विरोधातील शस्‍त्र आहे, त्‍या शस्‍त्राचे काही उद्देश आहेत. शत्रू राष्‍ट्रातील लोकांच्‍या मनशक्‍तीवर परिणाम करायचा. त्‍यांना असे वाटले पाहिजे, ‘आपले सरकार अकार्यक्षम आहे, ते चांगले काम करत नाही आणि त्‍याचा पराभवच होणार आहे.’ या शस्‍त्राच्‍या माध्‍यमातून देशाची लढण्‍याची शक्‍ती खच्‍ची करण्‍यात येते. देशाची शक्‍ती त्‍याच्‍या सैन्‍याच्‍या पाठीशी उभी असेल, तर ते सैन्‍य अधिक चांगली लढाई करू शकते. याउलट जनतेने सैन्‍याच्‍या कामात अडथळे आणले, तर युद्ध परिस्‍थितीवर फार प्रतिकूल परिणाम होतो. त्‍यामुळे अशा शस्‍त्रांच्‍या माध्‍यमातून ‘आपले सरकार निष्‍क्रीय असून चीनची प्रगती वेगाने होत आहे’, अशी भावना लोकांच्‍या मनात निर्माण करण्‍याचा प्रयत्न केला जात आहे. राजकीय नेते, नोकरशाही, सैन्‍याचे अतीउच्‍च अधिकारी यांचे खच्‍चीकरण करायचे आणि युद्ध चालू होण्‍यापूर्वीच युद्धात पराभव होणार आहे, हे त्‍यांना मान्‍य करायला लावायचे, असे उद्देश या ‘न्‍युरो वॉरफेअर’चे असतात.

३. ‘न्‍युरो वेपन्‍स’ शस्‍त्राचा वापर चीन कुणाच्‍या विरोधात करू शकतो ?

‘न्‍युरो वेपन्‍स’विषयी ‘वॉशिंग्‍टन पोस्‍ट’ आणि अन्‍य वर्तमानपत्रांमध्‍ये लेख प्रकाशित झाले आहेत. ते सार्वजनिक क्षेत्रांमध्‍ये उपलब्‍ध आहेत. असे म्‍हटले जाते की, या विषयामध्‍ये चीन सर्वांत पुढे आहे. चीन या शस्‍त्राचा वापर तिबेटी, उघूर मुसलमान, मंगोलियन या देशांतर्गत शत्रूंच्‍या विरोधात करील. चीनचे ५ कोटींहून अधिक नागरिक देशाबाहेर रहातात. ते चीनच्‍या विरोधात काम करत असतील, तर त्‍यांच्‍या विरोधातही हे शस्‍त्र वापरले जाऊ शकते. चीनचा पहिल्‍या क्रमांकाचा शत्रू अमेरिका आहे. त्‍यामुळे त्‍याच्‍या विरोधात या शस्‍त्राचा वापर केला जाऊ शकतोे. त्‍यानंतर तैवान, तसेच दक्षिण आशियातील कोरिया आणि जपान हेही चीनचे शत्रू आहेत. त्‍यामुळे त्‍यांचे राज्‍यकर्ते आणि जनता यांच्‍या विरोधातही चीन हे शस्‍त्र वापरू शकतो.

४. ‘न्‍युरो वॉरफेअर’चा भारताच्‍या विरोधात वापर आणि परिणाम

भारत फार मोठा देश आहे. भारताची सीमा पुष्‍कळ मोठी आहे, लोकसंख्‍या पुष्‍कळ आहे आणि भारताचे सैन्‍यही अतिशय सक्षम आहे. त्‍यामुळे भारताला सर्व बाजूंनी वेढण्‍याची शक्‍ती चीनकडे नाही. हे लक्षात घेऊन चीन भारताच्‍या विरोधात ‘न्‍युरो वॉरफेअर’ करू शकतो. ‘न्‍युरो वेपन्‍स’च्‍या माध्‍यमातून ‘अमेरिकेशी मैत्री करून भारताला काहीही लाभ होणार नाही; कारण अमेरिका केवळ त्‍याच्‍या हिताचे पाहिल’, असे विचार भारतियांच्‍या मनात निर्माण केले जाऊ शकतात. थोड्या प्रमाणात हे खरे असले, तरी अमेरिकेशी मैत्री केल्‍याने भारताला पुष्‍कळ लाभ आहेत आणि यात चीनला फारसे यश मिळालेले नाही. या शस्‍त्राच्‍या माध्‍यमातून चीनला केवळ भारताची आर्थिक प्रगती थांबवायची आहे, हा मुख्‍य उद्देश आहे. त्‍यामुळे चीन हे शस्‍त्र भारतीय माहिती तंत्रज्ञानाच्‍या विरोधात वापरू शकतो. बहुतेकांच्‍या भ्रमणभाष संचामध्‍ये ‘जीपीएस्’ यंत्रणा असते. या यंत्रणेमुळे आपण कुठेही सहजपणे प्रवास करू शकतो. भारताच्‍या यंत्रणेला ‘इंडियन रिजनल नेविगेशन सॅटेलाईट सिस्‍टिम’, असे म्‍हटले जाते. त्‍याचा वापर भारतीय सैन्‍य करते. तसेच याचा उपयोग भारताबाहेर १ सहस्र ५०० किलोमीटरपर्यंत होऊ शकतो. त्‍यामुळे ही यंत्रणा बंद पाडली, तर याचा भारतावर मोठा परिणाम होऊ शकतो. त्‍यामुळे चीन अशा प्रकारचे प्रयोग येणार्‍या काळात करतच रहाणार आहे.

लढाई न करता आपणच कसे शक्‍तीशाली आहोत, हे चीनला दाखवून द्यायचे आहे. चीन अशी शस्‍त्रे वापरत आहे आणि वापरत राहील. त्‍यामुळे भारतानेही त्‍याला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी ‘न्‍युरो वॉरफेअर’ करायचे का ?’, असा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो. निश्‍चितच हे युद्ध भारतालाही करता आले पाहिजे. ती क्षमता निर्माण होण्‍यास वेळ लागेल; पण ती वाढवत ठेवायला हवी. चीन जसे विविध शस्‍त्र भारताच्‍या विरोधात वापरतो, तसे भारतानेही त्‍याच्‍या विरोधात ही शस्‍त्रे वापरली पाहिजेत. यातून या विषयातील आपली सिद्धताही लक्षात येईल. चीनला ‘जशास तसे’ ही भाषा कळते. त्‍यामुळे चीनच्‍या शस्‍त्राला प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी भारतानेही तशी शस्‍त्रे सिद्ध करायला पाहिजेत.’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.

संपादकीय भूमिका

चीनला ‘जशास तसे’ प्रत्‍युत्तर देण्‍यासाठी भारतानेही तशी शस्‍त्रे सिद्ध करून त्‍याचा वापर करावा, ही राष्‍ट्रप्रेमींची अपेक्षा !