उत्सवांत भक्तीऐवजी शक्तीचे प्रदर्शन करणारी मंदिरे बंद केली पाहिजेत ! – मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – मद्रास उच्च न्यायालयाने २१ जुलैला एका याचिकेवर सुनावणी करतांना ‘मंदिरांचे उत्सव भक्तीऐवजी शक्ती प्रदर्शनापर्यंत मर्यादित रहात असतील आणि त्यातून हिंसेला प्रोत्साहन मिळत असेल, तर अशी मंदिरे बंद केली पाहिजे’, अशी टीपणी केली. अरुलमिघ श्री रूथरा महा कलियाम्मन् अलयम् या मंदिरातील उत्सवाला संरक्षण द्यावे, या मागणीसाठी मंदिराचे विश्‍वस्त थंगाराज यांनी याचिका प्रविष्ट केली होती. ‘उत्सवाच्या संदर्भात २ गटांमध्ये वाद आहे. तो सोडवण्यासाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती; मात्र त्यातून काही निष्पन्न झाले नाही’, असे थंगाराज यांनी म्हटले होते. त्यावर न्यायालयाने वरील टीपणी केली.

मंदिरामध्ये मूर्ती कोण ठेवणार ? यावरून हा वाद आहे. तहसीलदारांनी उत्सव साजरा करण्याची अनुमती दिली होती; मात्र मंदिरामध्ये मूर्ती ठेवण्यास दोन्ही गटांना बंदी घातली होती.

हिंदूंची मंदिरे आणि न्यायालयांच्या पूर्वीच्या टीपण्या !

१. वर्ष २०२२ मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका सार्वजनिक भूमीवर बांधण्यात आलेले मंदिर हटवण्याच्या कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिला होता. तेव्हा न्यायालयाने म्हटले होते की, ईश्‍वर सर्वव्यापी आहे आणि त्याच्या दैवीय उपस्थितीसाठी कोणत्याही विशेष स्थानाची आवश्यकता नाही.

२. वर्ष २०२१ मध्ये देहलीतील साकेत न्यायालयाने कुतुब मिनार येथे पूर्वी पाडण्यात आलेल्या २७ हिंदु आणि जैन मंदिरांविषयीची याचिका फेटाळली होती. न्यायालयाने म्हटले होते की, भूतकाळातील चुका या वर्तमान आणि भविष्य यांच्या शांतता भंगास कारणीभूत ठरू शकत नाहीत.

संपादकीय भूमिका 

हिंदूंची मंदिरे बंद करण्याविषयीचा निर्णय हिंदूंच्या धर्मगुरूंना आहे, अशी हिंदूंची श्रद्धा आहे !