लव्‍ह जिहादविरोधी कायदा तात्‍काळ संमत करण्‍यासाठी ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’ संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन !

महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्‍वामी शांतिगिरीजी महाराज यांचे भेटीद्वारे आंदोलनाला समर्थन!

आंदोलनाला पाठिंबा देणारे महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्‍वामी शांतिगिरीजी महाराज (डावीकडून) आणि शिवप्रहार संघटनेचे श्री. सूरज आगे (डावीकडून दुसरे)

मुंबई – श्रीरामपूर येथील शिवप्रहार प्रतिष्‍ठान संघटनेच्‍या वतीने लव्‍ह जिहादविरोधी कायदा संमत व्‍हावा, प्रभु श्रीरामाच्‍या नावाने वसलेल्‍या श्रीरामपूरला जिल्‍हा घोषित करावे यांसह अन्‍य मागण्‍यांसाठी ५ जुलैपासून मुंबई येथील आझाद मैदानात धरणे आंदोलन चालू करण्‍यात आले आहे. (या मागण्‍यांसाठी हिंदूबहुल भारतातील हिंदूंना आंदोलन करावे लागणे दुर्दैवी ! – संपादक) या आंदोलनाच्‍या ७ व्‍या दिवशी महामंडलेश्‍वर श्री श्री १००८ स्‍वामी शांतिगिरीजी महाराज यांनी येथे भेट दिली आणि ‘शिवप्रहार’ संघटनेच्‍या या आंदोलनाला स्‍वतःचे समर्थन असल्‍याचे सांगितले.

या वेळी छत्रपती संभाजीनगर नामकरणाची थांबलेली शासकीय प्रक्रिया पुन्‍हा चालू  करावी, श्रीरामपूर शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात भव्‍य शिवस्‍मारकास शासनाने संमती द्यावी, तसेच देशभक्‍त अधिकारी समीर वानखेडे यांच्‍यावरील षड्‌यंत्रपूर्वक नोंदवलेला गुन्‍हा मागे घेण्‍यात यावा, या आणि इतर मागण्‍या करण्‍यात आलेल्‍या आहेत.

पूर्वी पोलीस अधिकारी असलेल्‍या हिंदुत्‍वनिष्‍ठ श्री. सूरज आगे यांना ‘लव्‍ह जिहाद’ या षड्‌यंत्राविषयी समजल्‍याने त्‍यांनी पुढे पोलीस अधिकारी पदाचा त्‍याग केला आणि ते पूर्णपणे हिंदुत्‍वाच्‍या कार्यात स्‍वतः सहभागी झाले. आतापर्यंत त्‍यांनी आपल्‍या सहकार्‍यांसह १२५ हून अधिक लव्‍ह जिहादची प्रकरणे उघडकीस आणलेली असून ‘शिवप्रहार प्रतिष्‍ठान’च्‍या वतीने महाराष्‍ट्रातील १० जिल्‍ह्यांमध्‍ये ५० पेक्षा अधिक ठिकाणी ‘लव्‍ह जिहाद षड्‌यंत्र विरोधी’ जनजागृतीचे कार्यक्रम घेण्‍यात आले आहेत. मागील ४ मासांपासून पासून माय-लेकींचे संरक्षण व्‍हावे आणि लव्‍ह जिहादसंदर्भात जनजागृती व्‍हावी; म्‍हणून ‘भवानी रक्षा मोहीम’ चालू करण्‍यात आलेली आहे. (धर्मरक्षणासाठी स्‍वतःच्‍या पदाचा त्‍याग करून प्रत्‍यक्ष कृती करणारे माजी पोलीस अधिकारी सूरज आगे यांचे कार्य कौतुकास्‍पद ! – संपादक)