जळगाव येथे ३३ गोवंशियांचे पाय बांधून त्यांची अवैध वाहतूक करणार्‍या तिघांना अटक !

१३ गोवंशियांचा गुदमरून मृत्यू !

प्रतिकात्मक चित्र

जळगाव – विना परवाना ३३ गोवंशियांचे पाय बांधून त्यांना ट्रकमधून कोंबून नेणार्‍या मध्यप्रदेशातील तिघांना अटक करण्यात आली. या वेळी पोलिसांनी ट्रकमधून गुरे कह्यात घेतली आहेत. बाजारात या गुरांची किंमत  १ लाख १३ सहस्र रुपये इतकी आहे. पशूवैद्यकीय अधिकार्‍यांच्या तपासणीनंतर १३ गोवंशियांचा गुदमरल्याने श्‍वास कोंडला जाऊन मृत्यू झाल्याचे समोर आले. पोलिसांनी ट्रक जमा करून संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे. (गोवंशियांचे हाल करणार्‍यांना कठोर शिक्षा द्यायलाच हवी ! – संपादक)

पहाटे गस्तीच्या वेळी पोलिसांना एक ट्रक आढळला. त्याच्या चालकाला काही लोक मारत असल्याचे आढळल्याने पोलिसांनी गाडी थांबवली. त्या वेळी मारहाण करणारे अचानक पळू लागले. ट्रकमध्ये गोवंशियांना कोंबून भरल्याचे आणि त्यांचे पाय बांधल्याचे पोलिसांना दिसले. ट्रकचा चालक रशीद नथेखा पठाण (वय ३५ वर्षे) हा होता.यासह दयाल देविदास बैरागी (वय ३८ वर्षे) आणि महंमद सद्दाम महंमद बजारोद्दीन (वय २६ वर्षे) हेही दोघेही त्याच्यासमवेत होते. त्यांच्याजवळ गोवंशियांच्या वाहतुकीचा परवाना नव्हता. पंचनामा करून गोवंशियांची सुटका करण्यात आली.

संपादकीय भूमिका

आणखी किती गोवंशियांचा मृत्यू झाल्यावर गोवंशहत्या बंदी कायद्याची कठोर कार्यवाही करण्यात येणार आहे ?